Tuesday, June 23, 2020

आनंदघर लेख - २९ 'आनंदघरच्या कामाचा आत्मा-सातत्यपूर्ण प्रशिक्षण... भाग-१'




आनंदघर लेख - २९ 'आनंदघरच्या कामाचा आत्मा-सातत्यपूर्ण प्रशिक्षण... भाग-१'

आनंदघरच्या कामाविषयी लिहिताना या आधीच्या लेखात मुलांसोबतच काम, कामाचं स्वरूप, उपक्रम, सण-उत्सव, शिबीरं, दैनंदिन कामकाज, मुलांशी- पालकांशी संवाद, ताई- मावशींसोबत (मदतनीस) संवाद... अशा विविध पैलूंवर लिहिलं... अर्थात अशा सर्व पैलूंवर काम करणारी, कार्यरत असलेली आनंदघरची टीम आहे... आनंदघरसोबत कार्यरत असणाऱ्या ताई-मावशी हा या टीमचा महत्वाचा भाग आहे. आनंदघरच्या तायांनी बालविकासाचा अभ्यास पूर्ण केलेला असणं गरजेचं आहे. तरीसुद्धा आनंदघरच्या कामाचे वेगळंपण जाणून घेण्यासाठी, समजून-उमजून त्यावर काम करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रशिक्षण अत्यावश्यक आहे, हे आनंदघरच्या कामाचं वैशिष्ट्यही आहे. त्यानुसार तायांना जरी त्यांनी बालविकासाचा कोर्स पूर्ण केलेला असला तरी आनंदघरी सातत्यपूर्ण प्रशिक्षण दिलं जातं. यात उपक्रम कसे घ्यायचे इथपासून ते मुलांसोबत बोलायचं कसं, संवाद कसा साधायचा, पालकांशी संवाद कसा साधायचा, असं सर्व घेतलं जातं.

त्याच बरोबर असंच सातत्यपूर्ण प्रशिक्षण मावशींचही घेतलं जातं. मावशींचं कुठलंही शिक्षण- प्रशिक्षण झालेलं नसतं. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणावर जास्त भर द्यावा लागतो. ताई- मावशी कोणाचीही नियुक्ती करताना प्रशिक्षण घ्यावे लागेल असं सांगितलं जातं. शिकण्याची तयारी असणाऱ्यांनाच प्राधान्य दिलं जातं.

कित्येकांना असा प्रश्न पडेल की, बालविकास शिक्षण- प्रशिक्षण, सातत्यपूर्ण प्रशिक्षणाची गरज काय आहे? का यावर जास्त भर द्यायला हवा? आपण वर्तमानपत्रात बातम्यांवर बघतो- ऐकतो- वाचतो,

"अमुक-अमुक पाळणाघरात दोन वर्षाच्या मुलाला मारहाण झाली",

 "अमुक-अमुक पाळणाघरात एक वर्षाच्या मुलाला तोंडावर चिकटपट्टी लावण्यात आली",

"अमुक-अमुक पाळणाघरात मुलांना झोपवण्यासाठी औषध देण्यात आलं, असा संशय....."

या बातम्यांनुसार आरोप-प्रत्यारोप सुरू होतात... मावशीचं चुकलं, संचालकांची जबाबदारी, पालकांचं चुकलं, मुळात आईने मुलांकडे लक्ष द्यायला हवं, पोलिसांचा- कायद्याचा धाक हवा इत्यादी चर्चा घडतात. पोलीस, कायदे- न्यायव्यवस्था आपले काम करतील, पण अशा घटनांचं मूळ काय आहे... हे समजून त्यावर काम करायला हवं.

याप्रकारे काम करण्याचा प्रयत्न आनंदघरी केला जातो, तो काही उदाहरणाद्वारे समजावून घेवू.....

आनंदघरी ज्या ताई - मावशी कार्यरत होत्या आणि आहेत त्या कशा प्रकारे काम करतात त्यानुसार प्रशिक्षणात बालविकासाच्या मूलभूत बाबींसोबतच इतर कुठल्या मुद्द्यांवर भर द्यायचा हे ठरतं... कुणी खाऊ छान बनवतं, कुणी उत्तम स्वछता करतात, कुणी मुलांशी छान गप्पा गोष्टी करतात इत्यादी... थोडक्यात त्यांच्या आवडीनुसार, कलानुसार, क्षमतेनुसार प्रशिक्षण दिलं जातं... त्यांचं निरीक्षण करणं चालू असतं. त्या मुलांसोबत कसं बोलतात, मुलांची गाणी गप्पा-गोष्टी- उपक्रम कसे घेतात, मुलांचं शी-शु, त्यांना जेवू घालणं, झोपवणं कशा प्रकारे करतात... त्यांचा पालकांशी आणि आपापसात व्यवहार कसा आहे. अशा सर्व बाबींची नोंद घेतली जाते. अशा नोंदींचा प्रशिक्षण देण्यासाठी फार उपयोग होतो. ताई- मावशी स्वयंप्रेरणेने, स्वतःहून काय काय करतात याचा आधी अंदाज घेणे गरजेचं असतं. सुरुवातीला आनंदघरच्या कामाविषयी व्यवस्थित माहिती दिली जाते... परंतु सगळ्या कामाचा आवाका केवळ प्रशिक्षणात सांगणं शक्य नसतं, त्यामुळे निरीक्षण, नोंदी व त्यानुसार सातत्यपूर्ण प्रशिक्षण हे चालू असतं. मावशींचा अंदाज घेत घेत जे काम त्या स्वतःहून उत्तम रीतीने पार पाडतात तिथे काही गोष्टींबद्दल बोलणं पुरेसं असतं. 'छान काम करत आहात' अशी शाब्बासकीही महत्त्वाची असते. परंतु काही वेळा काही कामांमध्ये माहिती नसते, जमत नाही अशा वेळी काय व कसं करायचं हे व्यवस्थित सांगितलं जातं. असं करण्यामागचा उद्देश असा आहे की ताई-मावशींमध्ये असलेली सर्जनशीलता, कल्पकता महत्त्वाची आहे... त्यांनाही तो अवकाश देणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्यावर विश्वास असणं अत्यावश्यक आहे. त्यांच्यावर दाखवलेला अविश्वास मुलांपर्यंतही पोहोचतो त्यामुळे असा अविश्वास नकोच! खरंतरं अविश्वासाचं मूळ काय आहे? याचाही विचार केला पाहिजे. त्यासाठी ताई व मावशी कुठल्या परिस्थितीतून येतात व कशा परिस्थितीत काम करतात हे समजावून घेणं गरजेचं आहे. थोडक्यात समजून घ्यायचं असेल तर आपली समाजरचना समजून घेणं गरजेचं आहे. या समाजरचनेत स्त्रीचं असलेलं स्थान त्यातही मावशी म्हणून जी स्त्री काम करत असते, कित्येकदा ती कुठून येते... छोट्या गावातून शहरात असेल तर एखाद्या वस्तीतून, शिक्षणाची पुरेशी संधी तिला मिळालेली नसते, गरिबी किंवा जेमतेम परिस्थिती असते, लवकर झालेलं लग्न त्यामुळे मातृत्वही लवकर आलेलं असतं. कुटुंबात तिची दखल काही प्रमाणात घेतली जाते किंवा फारशी घेतली जात नाही... कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून कुटुंबासाठी व मुलांसाठीच चार पैसे मिळवायला ती बाहेर पडते. तिचं काम कुठे कमी होतं का? तर नाही! याशिवाय विविध कारणांनी (व्यसन) इत्यादी कुटुंबात असलेले ताणतणाव मतभेद अशा सगळ्या परिस्थितीला तोंड देत ती कामावर येते. या कामाच्या निमित्ताने तिला एक स्व:विकासाची संधी मिळते. या संधीसाठी आपणही प्रशिक्षणाच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करायला हवा.

आनंदघरमध्ये मी खूप गुणी मावश्या (मदतनीस) बघितल्या. सुरुवातीला वैशाली मावशी होत्या. अत्यंत स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं काम, जबाबदारी घेण्याची आणि पार पडण्याचं उत्तम कौशल्य. सुरुवातीला त्यांना काही गोष्टी समजावून सांगितल्या... फोनवर कसं बोलायचं, पालकांशी कसा संवाद साधायचा, पाहुण्यांशी कसं बोलायचं, हे त्यांनी शिकण्यापेक्षा त्यांच्या अंगचीच हुशारी जास्त होती... मला जसजसे त्यांचे हे गुण दिसत होते तसतसे  त्यांच्यावर जास्तीची जबाबदारी मी सोपवू लागले. त्यांचा आवाजही छान, गाणी उत्तम म्हणायच्या, मुलांना गोष्टी सांगायच्या, काही दिवसांमध्ये तर नवीन नवीन गोष्टी रचून सांगू लागल्या. शांत आणि प्रेमळ स्वभाव यामुळे मुलांच्या, पालकांच्या आनंदघरच्या त्या लाडक्या मावशी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाल विकासाविषयी, पालकत्वाविषयी जी पुस्तकं आनंदघरमध्ये आहेत ती त्या वाचायच्या. उत्तमरीतीने काम करणाऱ्या ताई-मावशींना प्रशिक्षणाची जोड मिळाली की त्यांचं काम आणखी खुलतं.

अश्विनी मावशीचं असं वैशिष्ट्य की त्या मुलांसाठी उत्तमोत्तम खाऊ बनवायच्या. अळूवडी, थालीपीठ, धपाटे खमंग बनवायच्या. मावशींनी काय बनवले याचा खमंग सुवास 3 वर्षच्या तन्वीला मावशींकडे, स्वयंपाकघरात घेऊन यायचा.

शुभांगी मावशींनी सुद्धा आनंदघर प्रेमाने सांभाळलं. मुलांसोबत गाणी, गप्पा, गोष्टी, खाऊ बनवणे अशी सर्व काम उत्तमरित्या पार पाडली. सुरुवातीला त्या खूप घाबरायच्या जरा काही अडचण आली की काम सोडते म्हणायच्या. मग त्यांच्याशी बोलणं, समजून सांगणं चालू असायचं. एका वाक्याचा मात्र त्यांच्यावर चांगला परिणाम झाला, कुठलंही काम केलं तरी अडचणी येणारच काम बदलण्यापेक्षा अडचणींमधून मार्ग काढणं महत्त्वाचं आहे असा मार्ग नेहमी काढायला हवा...

 मुलांसोबत काम करणं म्हणजे काही एखाद्या इंडस्ट्रीत काम करण्यासारखं नाही. इथे आपली देवाण-घेवाण एखाद्या चैतन्याशी असते. त्यामुळे इथलं वातावरण मुलांसाठी, ताई-मावशींसाठी आनंदाचं, खेळीमेळीचं आणि जबाबदारीचंही असतं... आनंदघरचं काम सगळ्या टीम च्या साह्याने चालतं त्यामुळे टीम शिक्षित, प्रशिक्षित असणं आवश्यक आहे. केवळ मला एकटीला (संस्थापक-संचालकांना) बालविकास समजून उपयोगाचं नाही. माझ्या सहकाऱ्यांबरोबर चालता येणं महत्त्वाचं... आनंदघर मध्ये उतरंड नाही. सोयीसाठी म्हणून ताई- मावशी शब्द वापरले जातात. परंतु उतरंड मानत नाही आणि पाळत ही नाही. आनंदघरच्या स्नेहसंमेलनात मुलांसोबतच ताई-मावशींचाही सहभाग असतो. एका वर्षीच्या स्नेहसम्मेलनात शुभांगी मावशींनी मनोगत मांडलं. स्वतः कागदावर लिहून आणलं होतं. खूप भीती वाटत होती म्हणाल्या," नाही जमणार!" पण प्रत्यक्ष स्टेजवर गेल्यावर कागदही न बघता आत्मविश्वासाने मनोगत व्यक्त केलं.

 

सरिता मावशी उत्तम काम करतं. पण त्यांचं मन मात्र कायम तळ्यात-मळ्यात असायचं. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कामं केली होती.

तिथल्या अनुभवानुसार त्या एक दिवस मला म्हणाल्या, "ताई तुमच्याकडे अजिबात शिस्त नाहीये."

मला आश्चर्य वाटलं.

मी विचारलं, "म्हणजे काय?"

मग त्यांनी सांगितलं, "याआधी मी जिथे काम केलं, तिथल्या त्या मुख्य ताई तर आम्हाला दिसायच्या पण नाही. त्यांच्या हाताखालच्या ताई आम्हाला खूप ओरडायच्या, रागवायच्या, त्यांचं बोलणं ऐकावं वाटायचं नाही."

मी मनात म्हटलं मग बरं आहे आपल्याकडे शिस्त नाही ती."

त्या मावशींना मी इतकंच म्हटलं, "आपली कामाची पद्धत वेगळी आहे, ताई- मावशी यांच्यावर रागावून, त्यांना अपमानित करून आपण काम करत नाही."

आनंदघरच्या तायाही अशाच गुणी आहेत. बालविकासाचा कोर्स पूर्ण केलेल्या व्यक्तींना ताई म्हणून

आनंदघरात काम करता येतं. त्यासोबत आनंदघरचं सातत्यपूर्ण प्रशिक्षण असतं... मुलांशी बोलायचं कसं याबद्दल तर हमखास सांगायला लागतं.  तायांनासुद्धा तयार गोष्टी दिल्या जात नाहीत. त्यांना स्वतः एक्सप्लोर करावं लागतं. (नो स्पून फीडिंग) विविध उपक्रम असो, शिबिर असो, स्नेहसंमेलन असो, तायांवर विश्वासाने काही सोपवलं तर त्या उत्तमरीतीने जबाबदारी पार पडतात.


No comments:

Post a Comment