Monday, June 22, 2020

आनंदघर लेख - ६ ' भित्तीचित्रं... मोठ्या कॅनव्हासवर छोट्यांचं चित्रं...'



आनंदघर लेख - ६ ' भित्तीचित्रं... मोठ्या कॅनव्हासवर छोट्यांचं चित्रं...'

 

आनंदघर सुरू झालं त्या जागेतल्या भिंती अगदी निर्जीव होत्या. त्यावर कुठलाही रंग नव्हता, प्रायमर देखील नव्हता.  सर्वप्रथम एक रंगारी शोधून  प्रायमर मारून घेतला. साहिलही (माझा मुलगा तेव्हाचं वय 8 वर्षे)  माझ्यासोबतच असल्यामुळे त्यालाही प्रायमर द्यायला आवडलं. त्याचं विविध प्रयोग करत  भिंतीला प्रायमर मारणं चालू होतं.

 25, 26, 27 एप्रिल 2016 ला, आनंदघर सुरू झाल्यानंतरचं, पहिलं सुंदर शिबिर, (wall painting) भित्तीचित्र शिबिर.

या शिबिराच्या तज्ञ मार्गदर्शक आभा भागवत - आर्टिस्ट अँड चाइल्ड आर्ट फॅसिलिटेटर. त्याचं झालं असं की एक दिवस सहजच मी व आभा वॉल पेंटिंग या विषयावर बोलत होतो. बोलता-बोलता शिबिर घेऊया का? मग काय विषय निघाला तर शिबिर ठरलंच. त्याविषयी आखणी सुरू झाली. आनंदघरची अंदाजे 60- 65 फूट लांब व दहा फूट उंच, एवढी मोठी भिंत व बाल्कनी तसेच बाहेरच्या कंपाऊंडचा भाग. एवढ्या मोठ्या कॅनव्हासवर भित्तीचित्र काढायचं ठरलं. आभानं माझं मत विचारलं, "काय काढू या? कशी चित्रं तुला अपेक्षित आहेत."

 मी म्हटलं, "आनंदघर ही लहान मुलांची जागा आहे त्यामुळे इथलं भित्तीचित्र सुद्धा मुलांना आवडेल, त्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेलं असेल अस हवं. मुलांच्या विश्वातलं जंगल, प्राणी, किटक असं काढूया का? म्हणजे ही छोटी मुलं त्या चित्रांसोबत व आपापसात चित्रांविषयी गप्पा मारतील.

 मुलांच्या विश्वात चिऊ काऊ माऊ, मुंग्या, झाडं, मासे असं सगळं असतं. तेच चितारू या का? तूही सांग, काय छान वाटेल? कसे घ्यायचे?"

आभाला जंगल, प्राणी, पक्षी, कीटक ही कल्पना आवडली, तिलाही जंगल काढायचं होतं. ती म्हणाली, "ठीक आहे. एकदा कम्प्युटरवर तयार करून बघते. कसं दिसेल याचा अंदाज घेते."

चित्र ठरलं, प्रायमर देऊन झालं. शिबिराच्या आदल्या दिवशी आभानं भित्तीचित्राची एक आउटलाइन भिंतीवर काढून घेतली. शिबिर तीन दिवस पूर्णवेळ होतं. 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलं या शिबिरात सहभागी झाली. त्यातली एक दोन मुलं अगदी पाच साडेपाच वर्षांचीही होती.

मुलं लहानपणापासून चित्र काढत असतात. त्यांचं चित्र सुरु होतं ते रेघोट्यातून, रंगांशी खेळण्यातून. जास्तीत जास्त चित्र कागदावर, काढली जातात. भिंतीसारखा प्रचंड मोठा कॅनव्हास मुलांना जेव्हा उपलब्ध करून दिला जातो त्यावेळी त्यांचे चित्र मनगटाभोवती न फिरता संपूर्ण शरीराचा वापर करून खांद्यापासून अख्खा हात फिरत असतो. खरंतर जितकं छोटं मूल, तितका मोठा कॅनव्हास हवा. परंतु प्रत्यक्षात घडतं वेगळंच! छोटं मूल छोटा कॅनव्हास दिला जातो. या चौकटीबाहेर विचार करून भित्तीचित्र मुलांना वेगळ्या विश्वाची सफर घडवून आणतं. यामुळेच भिंतीचा कॅनव्हास म्हणून वापर करणं ही कल्पनाच भन्नाट आहे.

शिबिरात तीन दिवस रोज 30 मुलांनी सहभाग घेतला. आणखी काही मुलांना यायचं होतं, परंतु एवढी संख्या घेणं शक्य नव्हतं. शिबिराच्या पहिल्या दिवशी आभाने सर्व मुलांशी संवाद साधला. भित्तीचित्र काय आहे? ती कशाप्रकारे काढतात? रंगांची निवड कशी करतात? एकात एक मिळून विविध शेड्स कसे बनवतात? कुठला आकार काढण्यासाठी कुठला ब्रश वापरतात. रंग घट्ट असेल तर त्याला पातळ करण्यासाठी कुठलं सोल्युशन वापरतात. हे भित्तीचित्र काढताना काय काळजी घ्यायची? अशा महत्त्वाच्या सूचनाही दिल्या.

कोणाचा हात किती सफाईदारपणे फिरतो, त्यानुसार ती मुलांना भित्तीचित्रातले वेगवेगळे भाग करायला देत होती. मुलंही आनंदाने वेगवेगळे रंग घेऊन चित्र पूर्ण करत होती. कोणी आपल्या आवडीचा रंग घेतला होता तर कुणी वेगळा ट्राय करून बघूया म्हणून वेगळाच रंग घेतला होता. चित्र काढताना काही काळजी घ्यायला लागत होती. रंग सांडून फरशी खराब होऊ नये म्हणून खाली प्लास्टिक अंथरलं होतं. मुलांचा हात उंचावर पोहोचत नाही म्हणून टेबल, खुर्ची, शिडी असं सगळं वापरणं चालू होतं. चित्र काढता काढता सर्व मुलांनी स्वतःला सुद्धा व्यवस्थित रंगवलं. तीनही दिवस मुलं पूर्णवेळ सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 चित्र काढत होती. मला प्रश्न पडत होता मुलांना काय काय मिळत असेल यातून? किती मग्न होऊन सगळे चित्र काढत आहेत. त्यांच्या मनात काय विचार व कल्पना असतील? त्यांच्यावर काही ताण असतील, कुठल्या गोष्टीचं त्यांना वाईट वाटत असेल तर हे चित्र त्यांना त्यातून बाहेर पडायला मदत करत असेल का? तर अशाप्रकारे रंगांशी खेळणं ही एक थेरपी असू शकेल का?

विविध रंगांची सुंदर उधळण चालू होती निळा, हिरवा, लाल, केशरी शिवाय या रंगांचे वेगवेगळे शेड्स... शेड्स कसे बनतात? कुठल्या रंगात कुठला रंग किती प्रमाणात मिसळला तर कुठला रंग तयार होतो, हे बघण्यातही एक मजा होती. भिंतीवर मुक्तपणे फिरणारे हात, आपापसात चाललेली कुजबूज, मध्येच काहीतरी झालं म्हणून हसण्याची खळखळ अशी धम्माल चालली होती.

भित्तीचित्र हळूहळू आकार घेत होत. बेस कलर देऊन झाला की चित्रांचं detailing सुरू झालं. त्यात पक्षी, मासे, किटक, मुंग्या, साप इत्यादी आकार घेऊ लागला. आभानं मुलांना असं सांगितलं की प्रत्येकाने एक सेल्फपोट्रेट काढायचं आहे. म्हणजे मी कशी दिसते किंवा मी कशी दिसायला हवी अशी कल्पना करून चित्र काढायचं आहे. तिनं स्वतःचं पोर्ट्रेट काढून दाखवलं. त्याबरोबर "मुलांनी स्वतःचे पोर्ट्रेट बनवायला सुरुवात केली. अफलातून पोट्रेट बनायला सुरुवात झाली, त्यांची क्रिएटिव्हिटी, कल्पकता फारच सुंदर!

भित्तीचित्र जसं जसं पूर्णत्वाकडे येऊ लागलं तसतसा त्याचा आकार कळू लागलं. चित्राच्या एका भागात सुंदर झाड, त्यावरची बसलेल्या चिमण्या. प्रत्येक मुलानं चिमणी रंगवली, तिला नावही दिलं. चित्राच्या दुसऱ्या भागात पाण्याचं तळं, त्यात विविध आकाराचे, रंगांचे "मासे मुलांनी काढले.

 चित्राच्या आणखी एका भागात जंगल, कीटक, प्राणी, यात तर मुलांनी धमालच केली! आपापल्या मनानं कुणी साप, फुलं, बिटल्स, काळा मुंग्या, लाल मुंग्या, कोळ्याचं जाळं असं काय काय काढलं! त्यांची कल्पकता,  क्रिएटिव्हिटी अगदी उफाळून आली.

भित्तीचित्रांची ही प्रक्रिया  अनुभवता आली ती केवळ  आभाताईमुळे.... आभाताई खूप उत्तम चित्रकर्ती (आर्टिस्ट) आहे. त्याहीपेक्षा जास्त उत्तम संवादक आहे. मुलांसोबतचं तिचं वावरणं अगदी सहज आणि ताण रहित असतं.

मुलं आनंदानं त्यांना दिलेले चित्र पूर्ण करून आभाकडे धावत येतात आणि आम्हाला पुढचं करायला दे असं सांगतात. चुकेल याची भीतीही कुणाच्या चेहऱ्यावर दिसत नाही. चुकून एखाद्या मुलाकडून वेगळा रंग किंवा काहीतरी वेगळं काही झालं तर नकारार्थी सूचना/कमेंट/रिमार्क जात नाही. अरे! हे काय केलंस? असं करायला नको होतंस, अश्याने चित्र खराब होईल अशी कुठलीही वाक्य मी तिच्या तोंडून ऐकलेली नाहीत. याउलट अच्छा! तू हे असं केलंस का? पण तिथे आपल्याला वेगळं करायचं होतं. बर! ठीक आहे, असा वेगळा विचार कल्पनाही छान दिसत आहे. आपल्याला वाटतं, किती साधी वाक्य आहेत. परंतु या प्रकारचा संवाद मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो, त्यांना प्रोत्साहन(motivation) देतो. बोलतानासुद्धा तिचा सोफ्टनेस भावतो. तार स्वर अजिबात नसतो, त्याचा अर्थ असा अजिबात नाही की ती मुलांना रागवत नाही. रागावणं म्हणण्यापेक्षा ठामपणे काही सूचना नक्की देते. त्या ठामपणात नकारार्थी सूचना, आरडाओरडा, मुलांचा अपमान असं काही नसतं.

 मला वाटतं, मुलांसोबत काम करणाऱ्या व्यक्तींमधील हे महत्वाचे गुण आहेत.

  

 

अँड. छाया गोलटगावकर

chhaya.golatgaonkar@gmail.com


No comments:

Post a Comment