Tuesday, June 23, 2020

आनंदघर लेख - १७ ' भावंडं...भाग-१'




आनंदघर लेख - १७ ' भावंडं...भाग-१'

 

एके दिवशी घाई-घाईने एक आई आपल्या पाच वर्षाच्या मुलाला, सोहमला घेऊन आली. सोहमच्या पाठीवर तीन वर्षांची मुलगी होती. आईला कामानिमित्त बाहेर पडायचं होतं म्हणून सोहमला आनंदघरी प्रवेश घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

सोहम अत्यंत चुळबूळा उत्साही मुलगा! पहिल्यांदाच आलेला आणि खेळणी बघून हरखून गेला. त्याला काय खेळू आणि किती खेळू असं झालं होतं. त्याच्या सवयी मात्र फारच वेगळ्या होत्या; जेवताना पाय पसरून बसणं, मूठभर अन्न हातात घेणं ते तोंडात कोंबणं, त्यातलं अर्ध पोटात आणि अर्ध सांडणं, मोठमोठ्याने ओरडून बोलणं. भांडणं मारामारी करणं, दुसऱ्यांच्या हातातली वस्तू हिसकावून घेणं, शी- शु सांगता न येणं, व्यवस्थित स्पष्ट बोलता न येणं, घाबरणं, घाबरून लपून बसणं असं सर्व दिसत होतं.

त्याच्या आईशी बोलून घरात आणखी कोण कोण असतं असं मी विचारलं त्यावर त्या म्हणाल्या, "एकत्र कुटुंब आहे. त्याचे आजी, आजोबा काका, काकू, त्यांची दोन मुलं आणि छोटी बहीण आणि आम्ही. त्या पुढे सांगू लागल्या, तो छोट्या बहिणीला खूप त्रास देतो, मारतो, ओरडतो ढकलून देतो, तिच्या हातातलं ओढून घेतो. असं करू नको म्हटलं तर रागवतो, चिडचिड करतो काहीवेळा ऐकतच नाही. मग मार खातो घरातली मोठी माणसं मारतात, मग आणखी चिडचिड करतो".

आई बरीच त्रस्त झाली होती. वैतागली होती. त्यांचं सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर त्यांना सांगितलं, "पहिल्यांदा त्याला रागावणं आणि मारणं बंद करा."

लगेच त्या म्हणाल्या, "पण तो ऐकतच नाही."

मी: "तो का ऐकत नाही? काय कारण असेल याचा विचार करायला हवा. आनंदघरी आम्ही त्याच्यासोबत जे काम करू जे उपक्रम घेऊन त्याचा त्याला निश्चितच फायदा होईल. त्याचा बराचसा त्रास कमी होईल पण आमच्यासोबत तुम्हीही घरी काही गोष्टी करायला हव्यात. म्हणूनच पहिलं काम मारणं आणि रागावणं बंद करायला हवं." घरातली मोठी माणसं त्याला रागावतात, ओरडतात त्यामुळे तो बिथरतो आहे. घाबरतो आहे आणि आणखी जास्त त्रास देतो आहे. हट्टी झाला आहे.

त्यांचं सर्व सांगून झाल्यावर मी पुन्हा एकदा त्यांना सांगितलं की त्याला मारणं आणि रागावणं बंद करा. आणि घरातले जे जे लोक समजदार आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्याला मारण्यापासून परावृत्त करा. त्याची फार काही अवघड समस्या नाहीये. त्याची बहीण लहान आहे तीन वर्षाची म्हणून घरातल्या सर्वांचं तिच्याकडे जास्त लक्ष जातं. ती या जगात येण्याआधी तुमचं सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे होतं. आता पूर्वीसारखं अटेंशन त्याला मिळत नाहीये त्यात त्याची बहीण वाटेकरी आहे. छोटी बहिण हवी आहे, बाळ आवडतय परंतु त्यासोबतच आपल्याकडे दुर्लक्ष होतंय. तिच्यापेक्षा आपले लाड कमी होत आहेत हे त्याला जाणवतं. त्याला ते शब्दात सांगता येणे अवघड आहे कारण त्याच्याकडे तेवढा शब्दसंग्रह ही नाही. म्हणून त्याच्यात वर नमूद केलेली लक्षणे दिसत आहेत. आणि मोठ्या माणसांना ती लक्षण दिसून येतात पण कळत नाही. तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यातल्या बऱ्याच गोष्टी तो करत आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट! तुमची मुलगी जरी लहान असली तरी तोही लहान आहे, पाच वर्षांचा. हेही लक्षात घ्यायला हवं. कित्येकदा मोठ्या मुलांबरोबर ज्या पद्धतीने बोललं, जातं वागलं जातं त्यामुळे मुलं दुखावली जातात.

उदा.

१)"तू  मोठा आहेस ना! तू दादा आहेस ना! मग दे तिला."

२) "ती रडतीये ना! समजत नाही  तुला! लहान आहे तुझ्यापेक्षा!"

लहान भावंडं ही हुशार असतात. घरातलं कोण कोणाशी कसं वागतंय हे त्यांना नीट कळतं. बऱ्याचदा लहान भावंड आदळ आपट, आरडाओरडा रडून-पडून हवं ते मोठ्या भावंडांकडून मिळवतात. लहान भावंडांना खात्री असते की त्यांना मारलं, ओरडलं जाणार नाही. काही वेळा तर घरातल्या इतर सदस्यांच बघून मोठ्या भावंडांना मारत असतात. इथे नातेसंबंधांवर काम करणं आवश्यक आहे. म्हणजे काय? तर लहान भावंडं आणि मोठी माणसं विरुद्ध मोठं भावंडं असं चित्र तयार न होऊ देता, आपल्या सगळ्यांचं हे छोटे बाळ आहे हे वारंवार मुलांसोबत वेगवेगळ्या टप्प्यांवर बोललं गेलं पाहिजे. लहान भावंड आणि मोठं भावंडं यांच्यात नातं तयार होण्यासाठी शिक्के मारणं, तुलना करणं टाळायला हवं. घराघरांमध्ये जर आपण निरीक्षण केलं तर असे प्रकार आढळतात.

उदा. "हा बघ किती छान करतो! तू ऐकतच नाही!"" तुला जमतच नाही". खरंतर काही वेळा मुलं गोंधळलेल्या स्थितीत असतं आणि त्याचा हा गोंधळ काहीवेळा मोठ्यांच्या वागण्यामुळे आणखी वाढतो. मुलाची भावनिक स्थिती समजावून न घेता तो हट्टीचं आहे, ऐकतच नाही, त्रास देतो या प्रकारे बोललं जातं. मोठ्यांच्या अश्या वागण्या -बोलण्यामुळे मुलांच्या त्रासात अधिकच भर पडते. भावनिक गुंतागुंत आणखी वाढते. खरंतर यात त्यांचाही तितका दोष नाही. बालसंगोपन व शिक्षणाबद्दल त्यांच्याकडेही फारशी माहिती नसते. पालकत्वाच्या प्रवासाबद्दल, अभ्यासाबद्दल ते अनभिज्ञ असतात. त्यामुळे मात्र मुलं बिचारी भरडली जातात म्हणूनच पालकत्व ही शिकण्याची गोष्ट आहे.

सोहम आनंदघरला रोज येऊ लागला. सुरुवातीचे तीन-चार दिवस त्याची आई "सोहमनं त्रास तर दिला नाही ना! असं विचारायची व त्याने त्रास दिला तर तुम्ही त्याला मारलं तरी हरकत नाही".

मी त्यांना विचारलं, "तुम्ही असं का म्हणताय? तो जे काही करतो त्या गोष्टींना आपण त्रास म्हणणं चुकीचं आहे. त्यासाठी मारणं तर अजून चुकीच आहे. आनंदघरी आम्ही म्हणजे मी, इथल्या ताई, मावशी मुलांना मारत नाही, रागवत नाही, अपमानास्पद किंवा नकारार्थी बोलत नाही.

मुलांच्या वाढीचे व विकासाचे टप्पे लक्षात घेऊन बालमानसशास्त्राची दखल घेऊन आम्ही सर्व कार्यरत आहोत. त्यामुळे आमच्या या अभ्यासात व कार्यात शिक्षेला स्थान नाही. मुलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने ठाम भूमिका मात्र आम्ही नक्की घेतो. म्हणून सोहमला आम्ही इथे मारण्याचा प्रश्नच नाही आणि तुम्हीही असं म्हणू नका. कायद्याने सुद्धा तो गुन्हा आहे. सोहमचं मी निरीक्षण करत होते आणि आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्यातली लक्षणे दिसत होती. त्याच्या आईसोबत झालेलं बोलणं व माझं निरीक्षण याच्या सविस्तर नोंदी घेतल्या. आनंदघरच्या ताई व मावशी यांच्यासोबत मीटिंग घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. सोहम सोबत काय व कसं काम करायचं, कसं बोलायचं यावर काम सुरू झालं. पाय पसरून खाणारा सोहम व्यवस्थित मांडी घालून एक एक घास जेवायला शिकला. इतर मुलांशी आरडाओरडा न करता हसून बोलू लागला. खेळणी हिसकावून न घेता शेअर करू लागला, विचारून घेऊ लागला. मात्र शी व शूवर नियंत्रण यायला त्याला बराच काळ लागला.

सोहमची एक अफलातून गोष्ट होती. तो दगड, मणी किंवा इतर कुठल्याही खेळणी मधून रचना छान करायचा. पझल व्यवस्थित सोडवायचा. त्याला चित्र काढायलाही खूप आवडायचं. शिवाय रोज वेगवेगळ्या गोष्टी ऐकण्यात तो मग्न असायचा.

आनंदघरी त्याला प्राधान्य मिळालं. तो काय म्हणतो आहे हे ऐकणाऱ्या व्यक्ती त्याला येथे मिळाल्या. त्याला जे हवं आहे ते त्याला आकांड-तांडव न करता मिळू लागलं. आनंदघरचे विविध उपक्रम मित्र-मैत्रिणी, खाऊ, अंगणातील खेळणं, वाळू, माती, पाणी या सर्व गोष्टींमुळे एकत्रित परिणाम असा झाला की तो हळूहळू शांत होऊ लागला आणि सगळ्यात महत्त्वाचं कुणीही मोठ्या आवाजात, रागावून, ओरडून त्याच्याशी बोलत नव्हतं. अगदी पॅंट्मध्ये शि- शु झाली तरी! महिन्याभरातच त्याला आनंदघराविषयी आपलेपणा व विश्वास वाटू लागला. त्याची आई सांगायची रोज सकाळी लवकर उठून आनंदघरी यायला तो तयार असतो. शाळेत जायला नको म्हणतो.

आनंदघरी मुख्यतः कशावर काम केलं.

१)सिबलींग इशू

२)यासाठी त्याच्याशी व (आईच येत होती) आईशी सातत्याने बोलणं होत होतं.

३) त्याची ऊर्जा योग्य प्रकारे वापरली जाईल असं नियोजन केलं.

४)नकारात्मक सूचना, शिक्के कटाक्षाने टाळले.

५)तो काय म्हणतो त्याला काय हवं या गोष्टीला प्राधान्य दिलं.

६)ज्या गोष्टी त्याला छान येतात आणि आवडतात त्याविषयी त्याच्याशी बोललो. त्या गोष्टी त्याला जास्तीत जास्त करायला दिल्या. त्याच्या चुकीच्या गोष्टींसाठी न रागावता, न मारता केवळ यापुढे असं करायला नको असं सांगत गेलो. अशा प्रकारचं काम म्हणजे त्याच्या भावनिक स्थिरतेसाठीचे आमचे प्रयत्न चालू होते.

भावनिक दृष्ट्या अस्थिर असलेलं मूल आपलं म्हणणं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतं. कारण त्यालाच खूप काही म्हणायचं असतं. त्याच्याच मनात भावनांचा कल्लोळ असतो म्हणून वेगवेगळ्या प्रकारे त्याचं ऐकून, त्याला प्राधान्य देऊन, ते मुलं भावनिक स्थिरतेकडे वाटचाल करायला लागतं.

मग चिडचिड करणं, खेळणी हिसकावून घेणं, रडणं, ओरडणं या ऐवजी ते मुलं आनंदी राहू लागतं, संवाद साधू लागतं. यानंतरच मूल इतरांचं म्हणणं ऐकण्याच्या स्थितीत असतं. इतरांचं म्हणणं समजणं, ऐकणं, स्वीकारणं या सर्व गोष्टी मुलं भावनिक दृष्ट्या स्थिर झाल्यावरच घडतात. इतकच नव्हे तर भावनिक दृष्ट्या स्थिर असलेल्या मुलांचं शिक्षण उत्तम प्रकारे होतं. सोहममधील बदल बघून सोहमची आई खुश झाली. शिवाय बालसंगोपनाच्या काही गोष्टीही त्यांनी आत्मसात केल्या. सोहमला, त्याच्या लहान बहिणीला व घरातल्या माणसांना कसं हाताळायचं याविषयी थोडी कल्पना त्यांना नक्कीच आली असणार.

 

 

अँड. छाया गोलटगावकर

chhaya.golatgaonkar@gmail.com


No comments:

Post a Comment