आनंदघर लेख - १८ ' भावंडं भाग - २'
सव्वा
दोन वर्षांची स्वरा आनंदघरी यायला लागली. पहिल्या भेटीत तिचा खेळकरपणा बघून असं वाटलं
की लवकर रुळेल. दोन-चार दिवस छान खेळली. त्यानंतर मात्र तिने अचानक यू टर्न घेतला.
खूप रडू लागली, आईला सोडत नव्हती. रडणं सुद्धा साधंसुधं नव्हतं, पूर्ण अंग सोडून जमिनीवर
गडाबडा लोळायची. जोरजोरात ओरडायची. कोणालाही हात लावून देत नसे. मावशींकडे, ताईंकडे
कुणाकडेही ती जाईना. वेगवेगळ्या पद्धतींनी प्रयत्न करून झाले परंतु स्वरा कशालाच दाद
देईना. ती अस्वस्थ म्हणून आई अस्वस्थ, आई अस्वस्थ म्हणून ती अस्वस्थ हे चक्र संपेचना!
शेवटी असं ठरवलं तिला सोडवायला बाबांना येऊ दे. हा उपाय मात्र लागू पडला. बाबा सोडवायला
आले की सुरुवातीला बाबांना चिकटून राहणं, जाऊ न देणं हे होत होतं. परंतु बाबा स्वतः
अस्वस्थ न होता ठामपणे तिला सांगून सोडून जायचे. बाबांच्या ठाम भूमिकेमुळे तिला आनंदघरी
रुळण सोप्प झालं. स्वराच्या मनात असलेली अस्वस्थता, असुरक्षितता, वाईट वाटणं या भावनांमुळे
आनंदघरातील इतर मुलांना ढकलणं, मारणं असे प्रकार ती करत असे. वारंवार सांगूनही बराच
काळ हे असंच चाललं होतं. सुरुवातीपासून आणखी एक गोष्ट आम्ही बघितली, स्वरा डाव्या हाताचा
अंगठा कायम चोखत असायची. तूर्तास यासाठी काही करायला नको असं ठरवलं. पालकांनाही तसं
सांगितलं.
तिच्या
आई-बाबांशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं,'तिला मोठी बहीण आहे. ती शांत आहे,
हिच्या हट्टीपणा मुळे ती जास्त शांत झाली आहे. हिच्यामध्येच आमचा एवढा वेळ जातो की
मोठ्या मुलीकडे आम्हाला लक्ष देता येत नाही. हिचं तिला मारणं, ढकलणं असे प्रकारही चाललेले
असतात. शिवाय सतत अंगठा चोखणं आणि शु-शी न सांगणं.'
हे सर्व ऐकल्यानंतर मी म्हटलं, 'आपण टप्प्याटप्प्याने एक एका गोष्टीवर काम करु. सध्या अंगठा चोखणं आणि शी-शू यावर काही करायला नको. तुम्हीसुद्धा घरी काही बोलू नका. फक्त तिला एकदा आठवण द्या की शी-शु आली की सांग. दुसरी गोष्ट तिने कितीही हट्टीपणा केला, आक्रस्ताळेपणा केला तरी तिला मोठ्या बहिणीच्या वस्तू द्यायच्या नाहीत. तिच्याशी ठामपणे बोलायला हवं की तुझी ताई सुद्धा लहान आहे आणि आत्ता तिचं महत्त्वाचं काम चालू आहे. सुरुवातीला लगेच तिला या सूचना कळणार नाहीत, परंतु हळूहळू तिला समजायला लागेल. तिनं दंगा केला, रडली की तिला हवं ते मिळतं. हे तिला माहित आहे. तुम्ही सर्व घाबरून जातात व तिच्या मनासारखं करतात हेही तिला माहित आहे. म्हणूनच तिची ही सवय मोडण्यासाठी ती कितीही रडली, तरी तुम्ही ठाम राहायला हवं. तिच्या अवास्तव मागण्या पूर्ण होणार नाहीत हे तिच्यापर्यंत पोहोचवायला हवं."
ही छोटी दिसणारी मुलं उत्तम निरीक्षक असतात. आपल्याला वाटतं त्यांना काय कळतंय, परंतु आठवून बघा तुमच्याकडनं हवं ते कसं मिळवायचं हे त्यांना नीट माहिती असतं. उदा. जोरात रडणं, ओरडणं गडाबडा लोळूणं, पाहुणे आल्यावर मोबाईल मागणं. तुम्ही महत्त्वाच्या कामात असाल त्यावेळी टीव्ही, मोबाईल ज्या गोष्टींना तुम्ही नाही म्हणतात त्या गोष्टींची मागणी करणं. आई, वडील, आजी, आजोबांना कधी, कुठे, कसं, काय मागायचं हे त्यांना ठाऊक असतं. तुम्ही घाई-गडबडीत असतात त्यामुळे तुम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण ही करतात. त्याचा परिणाम असा होतो की या प्रकारे वागण्यामुळे मला हवं ते मिळतं असं मुलांपर्यंत पोहोचतं. आणि ते वारंवार त्याचा वापर करायला लागतं. यातूनच काही वर्तन समस्या निर्माण होतात म्हणून जी गोष्ट, मुलांचा जो हट्ट अयोग्य आहे त्यासाठी ठाम भूमिका आवश्यक आहे. 'ठामभूमिका म्हणजे हट्टीपणा, आक्रस्ताळेपणा याला बळी न पडणं, खतपाणी न घालणं.' त्यापेक्षा थोडा वेळ काढून मुलांशी संवाद साधणं आवश्यक आहे. एखाद्या गोष्टीला आपण नाही म्हणतो तर का नाही म्हणतो हेही टप्प्याटप्प्याने शांतपणे सांगायला हवं.
स्वरासाठी
आम्ही आनंद घरी काय काय करत आहोत आणि तुम्ही घरी काय करत आहात हे आपण मिटिंग मध्ये
बोलत जाऊ अस पालकांना सांगितलं. आनंदघरी बाबा सोडायला येत होते तरीही स्वरा थोडं रडायचीच. विशेष म्हणजे कुणाजवळ जायची नाही आणि रडणं
थांबलं इतर मुलांना ढकलायची, मारायची.
एक दिवस तिला सांगितलं, "तुझं रडणं, ढकलणं, मारणं जोपर्यंत संपत नाही. तोपर्यंत एका ठिकाणी बसून राहायचं. सर्वांसोबत खेळायचं असेल तरच इथून जायचं. या गोष्टीलाही तिने खूप विरोध केला, तरीही तिला मावशी किंवा ताई या नियमाची आठवण करून द्यायच्या, तिच्याजवळ थांबायच्या. जरा वेळाने खेळायला जायची. ताई मावशी तिच्यासोबत असायच्या तिला हवा तो खेळ खेळायला द्यायच्या. विविध उपक्रम घ्यायच्या काही वेळा छान तल्लीन होऊन ती काम करायची. काही वेळ गटात यायचीच नाही, परंतु गटात येण्यासाठी तिला आग्रह केला जात नसे. तिथेच आजूबाजूला राहून ती बघत असे काय चाललंय ते!
तिला
एकदाही अंगठा चोखू नको असं आम्ही म्हटलं नाही. तिला आवडतील अशा उपक्रमात, खेळात जसा
तिचा सहभाग वाढला तसं तिचा अंगठा चोखणं कमी होत गेलं, नंतर बंदच झालं. तिला करण्यासाठी
इतक्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या की तिला अंगठा चोखायचा विसर पडू लागला. शिवाय तिला
सुरक्षित वाटेल विश्वास वाटेल अशा प्रकारे तिच्याशी बोलणं, खेळणं सुरू होतं.
विविध प्रकारे केलेल्या प्रयत्नांमुळे तिचं रडणं, आक्रस्ताळेपणा, हट्टीपणा इतर मुलांना मारणं, अंगठा चोखणं या सर्व गोष्टींचं प्रमाण अगदी कमी झालं. त्यातल्या काही गोष्टी तर बंद झाल्या. हे इतकं बदललं होतं की ज्या मुलांना ती मारायची, ढकलायची त्यातल्या कुणी तिला मारलं, ढकललं तरी त्यांना मारत, ढकलत नव्हती. हा तिच्यातला फार मोठा बदल होता. शु-शीच्या सवयीत ही थोडा बदल झाला. आनंदाने ती आनंदघरी येऊ लागली. आई-बाबा कोणीही सोडायला आले तरी त्यांना टाटा करू लागली. इतर मुलांशी मैत्री करू लागली, त्यांच्याशी छान खेळू लागली. वाळू, माती, पाणी, बाहुलीघर हे तिच्या अत्यंत आवडीचे खेळ! त्याच बरोबर ओढणीची साडी, ओढणीचे लांब केस, फळ्यावर फरशीवर चित्र या विशेष आवडीच्या गोष्टी! भिंतीवर जे चित्र आहे त्यातले प्राणी, पक्षी याविषयी तिला खूप आवड आहे. स्वराची एक अफलातून गोष्ट आहे ती म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव! आणि तिचे बोलके डोळे, फारच सुंदर आहेत. नाच खुप छान करते आणि करायला आवडतं.
ज्या
पद्धतीने मुलांसोबत आनंदघरी बोललं जातं, ते मुलांपर्यंत कसं पोहोचतं याचा एक छान अनुभव
आला.
एकच
खेळ जर सगळ्यांना हवा असेल तर त्यासाठी एक सूचना दिली जाते. प्रत्येकाने तो खेळ टर्न
बाय टर्न खेळायचा आहे. दुसऱ्या कोणाकडून एखादी वस्तू हवी असेल तर त्या मुलाला विचारणं,
की मला देशील का? त्यांनी थांब म्हटलं तर थांबणं, ती वस्तू त्याच्या हातातून हिसकावून
न घेणं, याप्रकारे बोलणं होतं.
एकदा
स्वरा व स्वरा पेक्षा लहान निशा दोघी खेळत होत्या. मी त्यांचं बोलणं ऐकत होते. इतक्यात
निशाने स्वराच्या हातातली वस्तू खेचून घेतली. स्वराने ती वस्तू पुन्हा स्वतःकडे घेतली.
मला वाटलं आता यांची भांडणं होणार!
मी
त्यांच्याकडे जायला निघाले, इतक्यात स्वरा निशाला म्हणाली,"आधी रडणं थांबव. तुला
ही वस्तू हवी आहे ना! थांब, मग अशी हातातून घ्यायची नाही. मग तू कसे विचारशील?
निशा
ही त्याहून हुशार रडणं थांबवुन डोळे पुसून, हसून तिला म्हणाली, "स्वरा मला ही
वस्तू देशील का?"
स्वराही
हसून म्हणाली" शाब्बास! माझं झालं की तुला देते".
यावर
निशा 'हो' म्हणाली.
त्यांचा छान संवाद मलाही खूप सुखावून गेला. मलाही नवीन गोष्ट शिकायला मिळाली. मुलांना आपपसातील प्रश्न हाताळू द्यावेत. ते कसं सोडवतात, ते बघायला हवं आणि मदतीची, मध्यस्थीची जेवढी गरज असेल तेवढी करावी. मी जर आधीच त्यांच्यामध्ये पडले असते तर मला स्वराचे (प्रॉब्लेम सॉल्व्हिंग) समस्येचे निराकरण दिसलं नसतं, कळलं नसतं आणि अशाप्रकारे समस्येचे निराकरण ही सुंदर क्रिएटिव्हिटी आहे. त्यासाठी मोठ्यांनी संयमी असणं आणि गरज असल्यास मध्यस्थी करणं, लुडबुड नाही.
स्वरा
आता मोठ्या शाळेत जाते. परंतु तिला ती शाळा स्वीकारणं सुरुवातीला थोडं अवघड गेलं. कारण
आनंदघर हीच तिची शाळा असं तिला वाटतं.
अँड.
छाया गोलटगावकर
chhaya.golatgaonkar@gmail.com
No comments:
Post a Comment