वाळवणाचं शिबिर ठरवलं पण एक धाकधूक होती, मुलांना आवडेल का? या शिबिराचा उद्देश सफल होईल का? पालकांचा प्रतिसाद कसा असेल? शिबीर रद्द तर करावं लागणार नाही ना?-असे एक ना अनेक प्रश्न आमच्यासमोर होते। तरीही हे शिबिर करायचं ठरवलं। कारण या शिबिरात वाळवण बनवायला शिकवण हा उद्देश नव्हता, नाही। तर वाळवण बनवण्याची प्रक्रिया काय आहे? त्यातलं विज्ञान, भूगोल, नीटनेटकेपणा, कष्ट, चव, रंग, भाषा, पदार्थातील वैविध्य इत्यादी गोष्टी कळाव्या हा एक हेतू। विविध साधन, मशिन सोबत (किसणी, सोऱ्या, इत्यादी) ओळख, त्याचा उपयोग जाणून घेणं, करणं। याशिवाय पदार्थ बनवताना कच्चं पीठ खाणं, अर्धवट शिजलेल, वाळलेल खाणं, बनलेला पदार्थ भाजून, तळून खाणं या सर्व प्रक्रियेतून जाणं असा विचार यामागे होता।
चौकशीचे फोन आले तेव्हा, बरं झालं तुम्ही असं शिबीर घेताय असा एक सूर होता, तर आजकाल पालकच वाळवण करत नाहीत तर मुलांना शिकवून काय उपयोग, असाही एक सूर होता।
पालक का करत नाहीत हा एक वेगळा मुद्दा आहे। जागा नसणं, वेळ नसणं अशीही कारण आहेत। दुसरं असं की मुलांना शिकवावं, त्यांनी ते करावं यासाठी हे शिबीर नाही। मुलांनी या प्रक्रियेतून सहजपणे जाणं मला महत्वाचं वाटतं।
शिबिराच्या या 5 दिवसात बटाटा चिप्स, कुरडई, पापडया, वडे, खारुड्या, चिक हाटण, पोहे व साबुदाण्याची चकली इत्यादी बनवलं प्रत्येक वेळी चव बघत काम केलं।
जेवढे पदार्थ बनवले त्या त्या दिवशी। मुलांशी त्या सर्व प्रक्रियेबद्दल छान बोलणं झालं।
ही प्रक्रिया/अनुभव सविस्तर जाणून घेऊ...
शिबिराची नियोजनानुसार पूर्वतयारी पूर्ण झाली. शिबिराच्या पहिल्या दिवशी बटाट्याचे चिप्स करायचे ठरले होते. बटाट्याचे चिप्स करण्याचा क्रम काय, तर बटाटे स्वच्छ धुवून घेणं, बटाट्याचे साल काढणं, ती पाण्यात टाकणं, त्या पाण्यात तुरटी फिरवणं, त्यानंतर किसणीच्या साहाय्याने बटाट्याचे चिप्स पाडणं, ते पाडताना बटाट्याचे चिप्स व बटाटे पाण्यातच बुडलेले असतील याची काळजी घेणं. बटाटे आणि चिप्स काळे पडू नये यासाठीची ही काळजी. त्यानंतर गॅसवर एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळण्यासाठी ठेवलं, त्या पाण्यात अंदाजाने मीठ घातलं व पाण्याला उकळी आल्यानंतर बटाट्याचे चिप्स हळुहळू त्या पाण्यात सोडले. सगळे चिप्स उकळत्या पाण्यात टाकून झाल्यावर चांगले ढवळून घेतले व पाच मिनिटे शिजू दिले, त्यानंतर अंगणात मोठं प्लास्टिक सावलीत अंथरलं. हे शिजलेले चिप्स झाऱ्याच्या साह्याने एका भांड्यात काढले व बाहेर प्लास्टिक वर वाळवण्यास सुरुवात केली. एकेक चिप्स वेगळ करून रांगेत वाळविण्यासाठी ठेवला. सर्व मुले अवतीभोवतीने चिप्स वाळत घालू लागली.
ही सर्व पाककृती करताना वेगवेगळ्या टप्प्यांवर मुलं काही प्रश्न विचारत होती, एकमेकांशी बोलत होती, एकमेकांना काहीतरी वेगळं करून दाखवत होती. मग बटाटा धुवून घेणं, त्यांची साल काढणं, चिप्स पांढरे दिसण्यासाठी, काळे न पडण्यासाठी पाणी व तुरटीचा योग्य वापर करणं. गॅसवर उकळणाऱ्या पाण्यात चिप्स कसे सोडायचे, स्वतःला चटका बसू न देता गॅसवरची काम कशी करायची, बटाटा सोलण्यासाठी, किसण्यासाठी वापरलेले टूल्स कसे वापरायचे, ते काळजीपूर्वक न वापरल्याने हाताला इजा होऊ शकते. तसेच नीटनेटकेपणाने वापरले नाही तर आपलं कामही सुंदर नीटनेटकं होणार नाही. उकळलेल्या पाण्यात मीठ किती घालायचं हा एक अंदाज आहे आणि अंदाज कसा घ्यायचा हे शिकवणे कठीण आहे; अंदाज घेणं निरीक्षणाने आणि स्वतः काम केल्याने जमू शकेल. बटाट्याचे चिप्स किती वेळ शिजू द्यायचे, कमी शिजवलं तर काय होईल (कच्चं राहिल) जास्त शिजलं तर काय होईल (लगदा तयार होईल) अशा भरभरून गप्पा चिप्स बनवते वेळी चालू होत्या. नुसता चिवचिवाट.
चिप्स वाळवताना, ते वाळत घालण्यापेक्षा शिजलेले गरम चिप्स खाण्यात मजा आली. असे हे चवदार चिप्स मनोसक्त खात खात चिप्स वाळत घालण्याचा कार्यक्रम पार पडला. प्लास्टिकवरचे ते चिप्स जणू एक सुंदर नक्षीकामचं. चिप्स वाळत घालायला जास्त वेळ लागणार म्हणून प्लास्टिक सावलीत अंथरलं, चिप्स वाळत घातल्यानंतर ते प्लास्टिक उन्हात अंथरलं. काही वेळाने अर्धवट ओले, अर्धवट वाळलेले चिप्स तेही खाण्यात मुलांना मजा आली.
मग प्रश्न विचारला की हे चिप्स आपण का वाळत घालतो आहोत? काही मुलांनी सांगितलं वर्षभर टिकवण्यासाठी. वर्षभर कशामुळे टिकतात? मुलं म्हणू लागली वाळवल्यामुळे... हो, म्हणजे काय झालं? तर त्यातल्या पाण्याचा अंश पूर्णपणे वाळला, नाहीसा झाला, त्यात जर पाणी शिल्लक राहिलं तर ते वर्षभर टिकणार नाही, त्यामुळे आपण हे चिप्स आणखी दोन दिवस पूर्ण वाळेपर्यंत उन्हात ठेवणार आहोत.
मग मुलांना विचारलं, "वाळवण आपण उन्हाळ्यातच का करतो? पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात का करत नाही?"
मुलं, "कारण वाळवण्यासाठी ऊन हवं असतं".
मग मी विचारलं, "हिवाळ्यात असतं की ऊन".
मुलं शांत बसली. हिवाळ्यात ऊन असतं परंतु वातावरण थंड असतं आणि वाळवण्यासाठी त्या पदार्थातील पाण्याचा अंश पूर्णपणे जाण्यासाठी, कडक ऊन हव असतं. त्यामुळे पदार्थ वेगाने वाळतो व जास्त वेळ ओला राहून खराब वास येण्याचा धोका टळतो.
असे हे वाळलेले कच्चे चिप्स दोन दिवसांनी खायलाही मजा आली आणि ते तळून खायला सुद्धा मुलांना खूप आवडले.
शिबिराच्या दुसऱ्या दिवशी उडदाचे पापड बनवले ते बनवण्याचाही क्रम होता. त्यानुसार पापडाची डाळ दळून आणणं, पीठ मळणं, योग्य प्रमाणात मीठ व पापड मसाला टाकणं, ते पीठ कुटणं. त्याच्या लाट्या बनवणं, पोळपाट लाटन्याच्या साह्याने पापड लाटणं व ते सावलीत वाळवणं. सावलीतच का वाळवायचे? पापड लाटायचा कसा? तो मोठा आणि पातळ कसा होतो? असे सर्व प्रयोग व गमती जमती खूप झाल्या. पापड गोल लाटता येणं हे थोड्या प्रयत्नांनी जमलं, शिवाय पापडाची लाटी खाऊन बघणं, वाळलेला पापड भाजून व तळून खाणं हे मजेशीर होतचं.
शिबिराच्या तिसऱ्या व चौथ्या दिवशी कुरडई आणि खारूडी बनवली. यासाठी गहू आधीच भिजत घातले होते आणि रोज त्या गव्हाचं पाणी बदलत होतो. भिजलेले गहू मिक्सरमध्ये बारीककसा करून गहू चुरायला घेतले, अंगणामध्ये सर्व मुलांना गोलात बसवले आणि गव्हाचा चीक कसा बनतो, यासाठी प्रत्येकाला गहू चूरण्यासाठी बोलवले. गव्हाचा चिकट चिक आणि कोंडा वेगळा करणे गमतीचं होतं, काही मुलांना हात घालू की नको असंही होत होतं. त्यानंतर पुढच्या दिवशी चिक हाटण्यासाठी घ्यावी लागणारी काळजी, त्यानंतर लगेचच गरम-गरम चिकाच्या कुरडया घालणं सुरू झालं. त्यात सोऱ्या हातात घेऊन तो कसा फिरवायचा, तो कसा फिरवल्याने कुरडई गोल होते व किती दाब द्यायचा हे सर्व चालू होते. चिकामध्ये हिरवा, लाल, पिवळा रंगही घातला त्यामुळे विविध रंगांचे कुरडई, पापड तयार झाले. उरलेल्या चिकाचे वडेही घातले गेले. चिक काढल्यानंतर जो कोंडा उरला होता तो शिजवून त्याच्या खारोड्या बनवल्या. मग त्यात कांदा, लसून, तिखट, मीठ, तीळ अंदाजे किती घालायचे, ते किती शिजवायचे, ते गरम की गार थापायचे, ते कसे थापायचे, थापण जमणं असं सगळं गमतीशीर होतं.
हे पदार्थ बनवताना कच्चं खाऊन बघणं, शिजलेलं खाऊन बघणं, अर्धवट ओलं खाऊन बघणं असे प्रकार चालू होते. शेवटच्या दिवशी अशाच पद्धतीने पोहे भिजवून त्यात तिखट, मीठ घालून, विविध खाण्याचे रंग घालून, रंगीबेरंगी चकल्या बनवल्या.
सोमवार ते शुक्रवार शिबिराचे पाच दिवस असे विविध प्रकार, पदार्थ बनवले या प्रक्रियेदरम्यान मुलांनी विविध टूल्स, स्वयंपाक घरातील भांडी हाताळण, जसे की, peeler, चाकू, चिप्सची किसनी, तुरटी, झारा, पोळपाट लाटणे, सोऱ्या, गॅस, मिक्सर, पाटा वरवंटा, प्लास्टिक, कापड, मोठमोठी भांडी.
या टूल्सना काय म्हणतात व ती कशी वापरली जातात, काय काळजी घ्यावी लागते हा या सर्व प्रक्रियेचा भाग होता. यात भाषावैविध्य, विज्ञान, इतिहास, भूगोल, गणित, सामान्य ज्ञान असे सर्व विषय व मुळात हाताने, स्वतः काम करणं असे सर्व अंतर्भूत होते.
हे शिकवण्यासाठी शिबिर आयोजित केलं नव्हतं, तर सहजतेने मुलांना एक अनुभव मिळावा आणि या अनुभवाचा त्यांना त्यांच्या आयुष्याच्या विविध टप्प्यावर उपयोग व्हावा असं वाटून ती सहजता या शिबिरात राखली गेली.
सगळ्यात शेवटी महत्त्वाचा कार्यक्रम होता तो म्हणजे केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेणं. सर्व प्रकारच्या पापड, कुरडया तळल्या, भाजल्या. मुलं गोलात बसली आणि एक साथ ताव मारला.
शिबिरांमध्ये सहा ते बारा या वयोगटातील मुलं व त्यांच्या बरोबर दोन ते सहा या वयोगटातील आनंदघरची मुलं धमाल करत होती. अनपेक्षितपणे मुलांच्या गप्पा मधून जेंडर इक्वलिटीचा (gender equality) मुद्दा समोर आला. एका मुलीचा म्हणणं होतं बाबा कधी पोळ्या करत असतो का?
त्यावर एका मुलाने उत्तर दिलं, हो! बाबा पण पोळ्या करतो.
मुलीचं म्हणणं होतं तू करशील का?
मुलगा म्हणाला, हो! मला करायला आवडतं.
मुलगी ठाम होती, पोळ्या आईनेच करायच्या असतात, यावर. या गप्पांना धरून आम्ही गोलात बसून बोलू लागलो. मुलं त्यावर बोलती झाली.
खरंच स्वयंपाकघर एक समृद्ध प्रयोगशाळा आहे, या वाक्याचा अर्थ खरा शिबिरात लक्षात आला. शिक्षणतज्ञांच्या मते मुलांचं सातवीपर्यंतचे शिक्षण औपचारिक (फॉर्मल एज्युकेशन) न घेता या पद्धतीने होऊ शकत.
वाळवण शिबिरादरम्यान मुलांबरोबरच आनंदघर मधल्या ताई -मावशी यांनाही हा अनुभव समृद्ध करणारा होता.
No comments:
Post a Comment