7
ते 14 या वयोगटासाठी 'मुलांचं चित्र शिबिर' आयोजित केलं होतं.आभा भागवत या चित्रकर्तीने
अशी अनेक शिबीर घेतली आहेत. आनंदघरी चार वेळा अशी शिबिरं झालीत. प्रत्येक शिबिराचा
वेगळा अनुभव, त्याचं सार या लेखात शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करते. शिबिरात जे जे घडतं
ते इतकं जिवंत असतं, शब्दबद्ध करणंही आव्हानात्मक आहे.
7
ते 14 हा वयोगट अगदी सुंदर आहे, या वयोगटात नवनवीन गोष्टी करून बघण्याबद्दल कुतूहल
जास्त असतं आणि बऱ्यापैकी ते जमतही!
आभा भागवत या चित्रकर्तीच हे शिबिर मुलांच्या उत्सुकतेला भरपूर वाव देत. स्वतःचे भरपूर मुक्त प्रयोग करून झालेले असतात, मेंदूला आणखी खाद्य हवं असतं आणि ते खाद्य पुरवण्याचं काम शिबिरात केलं जातं. आठवडाभराच्या (६ दिवस) या शिबिरात रोज वैविध्यपूर्ण चित्र काढली जातात. विविध प्रकारचे रंग- क्रेयॉन्स, वॉटर कलर, रांगोळीचे रंग, पोस्टर कलर्स, स्केच पेन्स, काहीवेळा तर माती! 'मातीचा रंग म्हणून वापर केला'. त्याचप्रमाणे विविध माध्यमही हाताळली गेली, जसे की- कागद, फरशी, भिंत इत्यादी. या शिवाय सुप्रसिद्ध चित्रकारांची चित्र बघणं, अभ्यासणं, त्यावर चर्चा करणं, त्यांच्या आयुष्यातल्या घटना व त्यांचे चित्र याविषयीचा अभ्यास, काही फिल्मस्, काही हलके फुलके प्रयोग असं सर्व या शिबिरात अंतर्भूत होतं. शिवाय विविध पुस्तकातून प्राणी, पक्षी बघणं व त्याची हुबेहूब नक्कल न करता आपल्या कल्पनेनं एखादा प्राणी, पक्षी, फुलपाखरू काढून बघणं, हाही या शिबिराचा भाग होता. केवळ (ब्रशने) कुंचल्याने चित्रं न काढता हातांचा, बोटांचा इ. काही वस्तूंचा उपयोग करून चित्र काढलं.
शिबिरात सर्वात भारी काय होतं! तर 'मुलांचे चित्र
बहरतानाची प्रक्रिया बघणं, निरीक्षण करणं, अभ्यासणं. ही प्रक्रिया शब्दात मांडणं थोडं
अवघड आहे. इतक्या सुंदर अनुभवाला शब्दरूप देणं, योग्य शब्द सापडणं थोडसं आव्हानात्मक
आहे.' मला वाटतं, 'ही प्रक्रिया अनुभवणं जास्त मोलाच आहे', प्रक्रिये दरम्यान ज्या
गमती जमती घडतात त्या अफलातून असतात.आभाचं चित्र बघणं आणि चित्रांची प्रक्रिया बघणं,
अनुभवणं यात खूप फरक आहे. ते अनुभवल्याशिवाय नाही कळणार.
उदा. एक दिवस कागदावर एकावर एक (एकाच्या डोक्यावर
एक) चित्र काढायचं होतं. आभा ताई आणि मुलं, एकावर एक वस्तू, प्राणी जे सुचते ते सांगत
होते व सर्वजण ते चित्र एकावर एक असं काढतं होते म्हणजे चेंडू त्यावर सायकल, त्यावर
बादली त्यावर मुंगी, त्यावर हत्ती...... खरं पाहता, चेंडूवर सायकल कशी ठेवता येईल?
मुंगीवर हत्ती कसा बसू शकेलं? मुलं आपापसात बोलत होती व हसत होती, "असं कसं काढू"
? त्यावर आभा ताई म्हणाली, "हीच तर चित्रांची गंमत आहे! तुमच्या कल्पनेत जे काही
येईल ते तुम्हाला चित्रात मांडता येतं, असं प्रत्यक्षात नाही करता येत पण चित्रात करता
येतं".
मलाही
ते फार भारी वाटलं, याप्रकारे चित्र काढण्यापेक्षा त्यामागचा विचार जास्त महत्त्वाचा
आहे. आपल्या कल्पनेत कितीतरी गोष्टी असतात ज्या प्रत्यक्षात येतील की नाही माहित नाही.
परंतु चित्ररूपात त्या साकारता येतात ही अनोखी बाब आहे!
यावरून
मला एक सुंदर गोष्ट आठवली. 'The Watermelon Route', याचा मराठी अनुवादही आहे , 'गोड
भेट' या नावाने.
या गोष्टीतला मुलगा आपल्या मैत्रिणीला भेटायला जी दुसऱ्या गावी राहत असते, निघतो. चालून चालून दमतो म्हणून एक गाय विकत घेतो, मग काही अंतर गेल्यानंतर गाय पण चालून चालून दमते, म्हणून हत्ती विकत घेतो, असे एकानंतर एक सगळेच प्राणी दमतात, म्हणून शेवटी तो स्वतःच्या खांद्यावर गाय, गाईवर हत्ती असं त्या प्राण्यांना घेऊन चालतो. या चित्राला बघून खूप हसूही येतं आणि मजाही वाटते, आणि चित्रकाराच्या कल्पकतेचं भारी कौतुक वाटतं! असा कसा हा मुलगा खांद्यावर, एकावर एक प्राणी घेऊन चालतो, प्रत्यक्षात असं घडणं जवळ जवळ अशक्य! पण चित्रात मात्र ते घडतं भारी.....!
चित्र
शिबिरामध्ये विविध रंग, प्रकार व माध्यमं मुलं हाताळतात. तीन तासाच्या शिबिरात मुलं
वेगवेगळ्या प्रकारची तीन-चार चित्र काढतात. या चित्रांमध्ये बिंदू, रेषा, आकार, रंग
हे कुठं, कधी, कसं वापरायचं या विषयाचं काम चालू असतं. नवे प्रयोगही केले जातात जसे
की,
१)
वर्तमानपत्र ओल्या रंगाने रंगवून त्याला फाडून एका कागदावर चिटकवून चित्र बनवलं जातं.
२)
ए -फोर आकाराचा कुठलाही कागद थोडा चुरगळायचा आणि त्यावर कागदाच्या ज्या रेषा तयार झाल्या
आहे, त्याचं चित्र सुचेल तसं बनवत जायचं.
३)
सेल्फ पोट्रेट काढणं- 'आपण स्वतः कसे दिसतो किंवा आपण कसं दिसायला हवं' याचा विचार
करून सेल्फ पोट्रेट काढलं जातं.
४)
हाताची बोटं वेगवेगळ्या ओल्या रंगात बुडवून बिंदूंचं चित्र काढलं जातं.
५)
पांढऱ्या कागदावर ब्रशने रंग शिंपडून वेगळं चित्र काढण्याचा प्रयत्न केला जातो.
६)
प्रसिद्ध चित्रकारांच्या चित्राविषयी, व्यक्तिमत्त्वाविषयी आभा ताई मुलांना माहिती
सांगते.
७)
आणखी एक मजेशीर भाग आहे या शिबिरातला, प्रसिद्ध चित्रकाराचे चित्र कॉपी न करता त्यातला
एखादा भाग, तुकडा आपल्या कल्पनेतून चितारण्याचा छान प्रयत्न केला जातो.
८)
एकदा शिबिरात आभाताईनं प्रसिद्ध चित्रकार व्हॅन गॉ च्या चित्राचे तुकडे देऊन ते चित्र
वाढवत पूर्ण करायला दिलं. मुलांनी त्यातून सुंदर चित्रनिर्मिती केली. मुलांचं रंग निवडणं
ते वापरणं, त्याचे वेगवेगळे टेक्सचर्स तयार करणं अगदी अफलातून होतं, अत्यंत सुंदर प्रक्रिया!
मुलांना
असं चित्र काढताना शांतपणे बघणं हा या सर्व प्रक्रियेचा भाग आहे. हा अनुभव पूर्णपणे
शब्दात उतरवणंही अवघड आहे परंतु मुलांच्या विश्वात चाललेल्या गमती जमती न्याहाळण्यात
भारी मजा आहे. हे चित्र काढणं, त्यातल्या रंगांची निवड, ते भारी दिसतंय असं वाटून त्यांच्या
डोळ्यात दिसणारी अमूल्य चमक, शेजारच्या आपल्या मित्राने किंवा मैत्रिणीने काय व कसे
काढले ते बघणं, त्यावर कमेंट्स देणं, गप्पा, चर्चा याला उधाण येतं! त्याच बरोबर मुलांच्या
मनात जसं चित्र आहे तसं ते नाही झालं तर होणारा हिरमोडही खूप असतो. काही वेळा मुलं
पुन्हा नवीन चित्र करायला घेतात. अशी ही रंगांची उधळण संपूच नये असं वाटतं...
अँड.
छाया गोलटगावकर
chhaya.golatgaonkar@gmail.com
No comments:
Post a Comment