आनंदघर लेख - २४ ' फिनलंड (युरोप) अभ्यास दौरा...भाग - ३'
मागच्या लेखात फिनलँडच्या शाळाभेटीविषयी लिहिलं. या लेखात भारत-फिनलंड तौलनिक अभ्यास व कॉन्फरन्सविषयी लिहिलं आहे.....
भारत-फिनलंड एक तौलानिक अभ्यास---
गेल्या दहा अकरा वर्षांपासून मी कायदा व शिक्षण या विषयाची अभ्यासक आहे. त्याचाच एक भाग म्हणून आनंदघर- बालसंगोपन केंद्र, लर्निंग अँड रिसर्च सेंटर सुरू केलं. याच कामाचा एक भाग म्हणून फिनलंड शिक्षणपद्धती जाणून घेण्याची, अभ्यासण्याची, अनुभवण्याची संधी मिळाली.....
फिनलंडची
शिक्षणपद्धती बघताना, अभ्यासताना, अनुभवताना आपसूकच माझ्या मनात भारत व फिनलंड यांचा
तौलानिक विचार, अभ्यास सुरू झाला. दोन्ही देशांची शिक्षणपद्धती अभ्यासताना ऐतिहासिक,
सांस्कृतिक, भौगोलिक, सामाजिक परिस्थिती समजावून घेणं अनिवार्य आहे असं वाटतं.
क्षेत्रफळाच्या
दृष्टीने जर हा देश बघितला तर तो साधारणतः महाराष्ट्र एवढा आहे. या देशाची लोकसंख्या
बघितली तर ती साधारणपणे पुण्याच्या लोकसंख्येएवढी आहे. आज फिनलंड व तिथली शिक्षणपद्धती
जगातील सर्वोत्तम होण्यात तीस-चाळीस वर्षांचा प्रवास आहे. तिथल्या राज्यकर्त्यांनी
शासन कुणाचंही असलं तरी शिक्षणपद्धतीत ढवळाढवळ करायची नाही असं ठरवल्यामुळे त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण साध्य
झालं. कुठल्याही पक्षाचं राजकारण शिक्षणाच्या आड येत नाही. भारतात कित्येकदा सत्ता
बदलली की धोरणंही बदलतात. फिनलंडमध्ये ज्या प्रकारची शिक्षणपद्धती आहे ती भारताला अपरिचित
नाही. भारतभर शिक्षणाचे उत्तमोत्तम प्रयोग झाले आहेत. रवींद्रनाथ टागोर यांचं शांतिनिकेतन,
महात्मा गांधींचं नयी तालिम, जे पी नाईक यांचं शिक्षणातील योगदान. यादी मोठी आहे. अनेक
शिक्षणतज्ञांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं काम केलेलं आहे, ही शिक्षणपद्धती, व्यवस्था,
या विषयाची मेथोडोलॉजी, फिलॉसॉफी, पेडॉगॉजी मांडली आहे. देशभरातही विविध शिक्षणतज्ञांनी
शिक्षणातील सुंदर प्रयोग केले आहेत, परंतु हे प्रयोग प्रयोग म्हणून मुख्य प्रवाहाबाहेरच
राहीले. मुख्य प्रवाहाचा भाग, मुख्य अभ्यासाक्रमाचा भाग झाले नाही. शासन निर्णयाचा
भाग झाले नाही. याचे सार्वत्रिकीकरण झाले नाही. फिनलंड मध्ये फिनिश आणि स्वीडिश लोक
राहतात आणि त्यांची मातृभाषा फिनिश आणि स्वीडिश यांना प्राधान्य आहे. भारताबद्दल बोलायचं
झालं तर भारतीय समाज विविधतेने नटलेला आहे मग त्यात विविध धर्म आहेत, भरपूर जाती-जमाती
आहेत, हजारो भाषा आहेत, वेगवेगळी ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक पार्श्वभूमी आहे. अशा
विविध बाबींमध्ये भारतीय समाज विभागला गेला आहे. कदाचित त्यामुळे एक सारखी व्यवस्था,
शिक्षणपद्धती अंमलात आणणं अवघड होऊन बसलं आहे. त्यामुळे भारतीय शिक्षणपद्धतीतही अनेकानेक
स्तर निर्माण झाले आहेत.
कोठारी
कमिशनने सुचवलेले बदल, एनसीएफ 2005 यावर आधारित आलेला 2009 चा शिक्षण हक्क कायदा या
घडामोडी होऊन देखील प्रयोगशील शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले नाही, जे होणं अत्यावश्यक
आहे.
फिनलंडच्या
शिक्षण पद्धतीचा आदर्श जरूर घ्यावा, त्याचबरोबर भारताच्या या मातीत गेली अनेक दशकं
जे काम झालं आहे तेही बघणं- अनुभवणं, अभ्यासणं व त्याची अंमलबजावणी करणं अत्यावश्यक
आहे. शिक्षण हक्क कायदा आला तरी गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून आपण अजूनही फार दूर आहोत.
भारताच्या
शिक्षणपद्धती समोर विविध अडथळे आहेत.
उदाहरणार्थ----
१)
मातृभाषेला महत्व न देता इंग्रजी माध्यमाला महत्त्व आलं आहे.
२)
६ वर्षाखालील मुलं पूर्व-प्राथमिक शाळा, अभ्यास यात अडकली आहेत.
३)
सरकारी शाळेपेक्षा खाजगी
शाळेला महत्व आलं आहे.
४)
भरमसाठ फी, फी मध्ये तफावत.
५)
विविध बोर्ड SSC, ICSE, CBSE इत्यादी
यासारखे
अनेकानेक मुद्दे आहेत.
शिक्षण
हक्क कायद्यात असलेले शब्द व त्याची होणारी अंमलबजावणी यात तफावत आहे.
एकीकडे
फिनलंडसारख्या विकसित देशांच्या शिक्षणपद्धती आदर्श म्हणायची आणि त्याच्या उलट दिशेनं
जाणारी धोरणं आखायची. शिक्षणातील परिवर्तन हा एक प्रवास आहे जो फिनलँडने केला. शैक्षणिक
परिवर्तनासाठी भारतानेही तो करावा व इथल्या मातीसाठी अनुकूल शिक्षणपद्धती निवडावी,
तिची काटेकोर अंमलबजावणी करावी. सर्वात मुख्य मुद्दा असा आहे की जे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे
प्रयोग प्रयोगशील शाळांनी केले त्याचं सार्वत्रिकीकरण व्हायला हवं. हा महत्त्वाचा मुद्दा
आहे.
फिनलँडच्या
शाळा बघताना जसं सुतारकाम, शिवणकाम इत्यादी त्यांच्या मुख्य अभ्यासक्रमाचा भाग आहे.
तसं भारतात काम आणि शिक्षण (वर्क अँड एज्युकेशन) हा मुख्य अभ्यासक्रमाचा भाग नाही आणि
त्याच सार्वत्रिकीकरण केवळ शासन निर्णयावर होऊ शकतं. भारताच्या शिक्षणविषयक धोरणांमध्ये
व कायद्यांमध्ये आमूलाग्र परिवर्तनाची गरज आहे. फिनलंडने शिक्षणात परिवर्तन करण्यासाठी
जो प्रवास केला तो प्रवास अभ्यासण्याची जास्त गरज आहे.
कॉन्फरन्सविषयी...
फिनलंड
अभ्यास दौऱ्यात शाळा भेटीबरोबरच कॉन्फरन्स आयोजित केली होती. कॉन्फरन्सच्या गाभ्याचा
विषय होता- सर्जनशीलता (Creativity). या विषयाला अनुसरून विविध देशातील तज्ञ मंडळींनी
आपले विचार मांडले.
शिक्षण
कसे असावे, सर्जनशीलतेचं शिक्षणातील स्थान याविषयीचे सविस्तर मुद्दे या सत्रात होते.
कॉन्फरन्समध्ये गॉडी केलर, शिक्षणतज्ञ, यांनी आपले एकंदर शिक्षणपद्धतीविषयी विचार मांडले.
त्यांची एक गोष्ट मला फार आवडली, 'आज-काल शाळा-कॉलेज, व्यवसायिक मिटींग्स, कॉन्फरन्स
अशा ठिकाणी पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन अनिवार्य झाले आहे. परंतु गॉडी केलर यांच्या मते
पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनपेक्षा वक्ताआणि श्रोता यांनी एकमेकांच्या डोळ्यात बघणं जास्त
महत्त्वाचं आहे. उत्तम संवादासाठी एकमेकांचे विचार कळणं आवश्यक आहे. पावरपॉइंट प्रेझेंटेशन
द्वारे वक्ता व श्रोता दोघांचंही लक्ष स्क्रीन कडे जास्त असतं. त्यांचं हे माणसांशी
जोडले पण खूपच भावलं.
कॉन्फरन्सची
सुरुवात फिनलंडची शिक्षणपद्धती, ओळख आणि अभ्यासक्रम या सत्राने झाली. या सत्रामध्ये
फिनलंड शिक्षणपद्धतीचा इतिहास अभ्यासक्रम याबद्दल मांडणी केली गेली. याशिवाय फिनलंडला
भावी नागरिक कसे हवेत यावरही मांडणी केली गेली आणि असे नागरिक घडविण्यासाठी शिक्षणात
काय काय बदल आवश्यक आहे, याविषयीचे सविस्तर मुद्दे या सत्रात होते.
मुलांच्या
शिकण्याबद्दल त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. नॉर्वेचं उदाहरण दिलं. नॉर्वे
अत्यंत श्रीमंत देश आहे. तिथे मुलांकडे सगळं काही आहे. तरीही नॉर्वेतील दर तिसरं मुल
एकटेपणा अनुभवतं. मुलांना सगळं मिळणं अशाप्रकारे विनाशकारी (disastrous) असू शकतं का?
त्यांचा हा प्रश्न अंतर्मुख करणारा होता. त्यांनी हा मुद्दा मांडल्यानंतर मलाही एक
पालक आठवले. त्यांची समस्या होती, "रोज घरी जाताना मूल काही ना काही विकत घ्यायचं
म्हणतं आणि रोज हा हट्ट पुरवून घरात खूप वस्तू जमा झाल्या आहेत. काय करावं कळेना?"
मी म्हटलं, "तुमची आर्थिक स्थिती उत्तम आहे, शिवाय मुलाला दिवसभर वेळ देता येत
नाही मग संध्याकाळी भेटल्यानंतर, नको आता याच रडणं! यामुळे तुम्ही वस्तू घेऊन दिल्या.
वस्तू खरेदी करण्याची गरज आहे की नाही हे मुलाशी बोललं पाहिजे. पैशांचा तुटवडा
(scarcity) नसला तरी मुलांसोबत बोलला पाहिजे. अशी पावलं उचलली नाही तर या मागण्या वाढत
जातील आणि ते मुलांसाठीही योग्य नाही. खरं तर मुलांना काय हवं असतं हे समजून घेणं खूप
गरजेचं असतं. रोज अगदी वस्तू विकत घ्यावी वाटणं याचा अर्थ काय आहे? मूल मनासारखी गोष्ट
घडावी व त्यातून आनंद मिळावा यासाठी असा हट्ट करतं का? पालक, आपण मुलांना योग्य वेळ
देऊ शकत नाही याची नुकसान भरपाई म्हणून वस्तू घेऊन देतात का, त्याचा विचार झाला पाहिजे.
गॉडी
केलर यांनी त्यांच्या मांडणीत आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. जसे की, मुलांच्या
मुक्तखेळावर भर दिला पाहिजे, शांतपणे निसर्गात खेळलं पाहिजे, त्यांच्या खेळण्याचा-
शिकण्याचा जगण्याशी संबंध असला पाहिजे. म्हणजे त्याला एकटे वाटणार नाही. कित्येकदा
मुलांना आयती उत्तर दिली जातात. यापेक्षा मुलांनी भरपूर प्रश्न विचारले पाहिजेत. अशी
प्रश्न मुलांमधील सर्जनशीलतेला वाव देतील.
रचेल
(Rachael) यांनी आपल्या प्रेझेंटेशन मध्ये
एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. वर्गात मुलांना शिकवताना एक शिक्षक ज्यावेळी शिकवत असेल
त्यावेळी दुसऱ्या एका शिक्षकांनी निरीक्षण करणे व नोंदी घेणं आणि वर्ग संपल्यानंतर
त्या दोन्ही शिक्षकांनी त्या निरीक्षण व नोंदीवर चर्चा करण व त्यानुसार पुढचं नियोजन
केलं जातं. ही पद्धत मुलांमधील सर्जनशीलतेला वाव देणारी आहे. अशा प्रकारचं शिक्षण कुठे
होतं का? तुम्हाला माहित आहे का?
मला
एकदम लीलाताई पाटील यांची सृजन-आनंद विद्यालय, कोल्हापूर ही शाळा आठवली आणि मी सांगितलं
अशा प्रकारचे शिक्षण साधारण तीस वर्षांपासून या शाळेत होत आहे. वर्षानुवर्षांच्या नोंदी
या शाळेत आजही आहेत.
कॉन्फरन्समध्ये
विविध वक्त्यांनी अभ्यासपूर्ण दृष्टिकोन मांडले. या लेखात उदाहरणादाखल काहीच वक्त्यांचे
विचार मांडले आहेत. परंतु इतरही वक्त्यांची मांडणी एक चांगलं बौद्धिक खाद्य होती.
यासोबतच कॉन्फरन्समध्ये विविध देशातील शिक्षक व शिक्षणविषयक
अभ्यासक यांनी वेगवेगळ्या विषयांवर प्रेझेंटेशन्स केले, आपले विचार मांडले. या कॉन्फरन्सचा
आणखी एक सुंदर व महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे क्रिएटिव्ह क्लासरूमस(Creative
Classrooms). म्हणजे मुलांना एखादा विषय त्याच त्या पद्धतीने शिकवण्यापेक्षा खेळाद्वारे,
गाण्याद्वारे एकदा उपक्रम घेऊन वर्ग घेता येईल का? अशाप्रकारे त्या वर्गाची मांडणी
करायची होती. मोठ्यांची सर्जनशीलता यात दिसून येत होती. सर्जनशीलता या विषयाला किती
वैविध्यपूर्ण पद्धतीने सर्वांनी मांडले त्याची कल्पना तुम्हाला खाली दिलेल्या काही
प्रेझेंटेशन्स व क्रिएटिव्ह क्लासरूमसच्या
शीर्षकाने
येईल.
उदाहरणार्थ---
1)Clay modelling as a pedagogical tool in
medical schools.
2) Thinking out of box- technology
integration into preservice physical education teachers' education on inclusive
physical education.
3) STEM and Robotics
4) Creativity Brain and Art.
5) Harnessing Imagination through Digital
story telling in the History and Science classrooms.
या
कॉन्फरन्समध्ये आनंदघरच्या कामाविषयी पेपर प्रेझेंट करणं माझ्यासाठी सुंदर अनुभव होता.
या अनुभवासाठी हेरंब व शिरीन कुलकर्णी 'CCE - कौन्सिल फॉर क्रिएटिव एज्युकेशन' या संस्थेचे
व संपूर्ण टीमचे मनापासून आभार. या अभ्यासदौऱ्यात मी हेरंब, धनिका सावरकर, शिरीन यांची
धडपड, नियोजन, प्रचंड मेहनत बघत होते. 22 देशांतील लोकांनी येणं, त्यांचं आदरातिथ्य,
त्यांच्या अडचणी दूर करणं, त्यांना शाळा भेटीसाठी नेणं, कॉन्फरन्समध्ये सगळ्यांचे प्रेझेंटेशन्स
, क्रिएटिव क्लास रूम्स व्यवस्थित पार पडणं तसेच, सर्वांचं चहा, कॉफी, नाश्ता, जेवण
(व्हेज- नॉनव्हेज) सगळं व्यवस्थित होतंय ना,
याकडे लक्ष देणं. या सर्व गोष्टींसाठी जे मिनिट टू मिनिट नियोजन लागतं, ते अतिशय उत्तम
होतं. आणि सर्वात महत्वाचं त्या दोघांचाही आणि त्यांच्या टीमचा फिनलंड शिक्षणपद्धतीबरोबरच
इतर देशातील शिक्षणपद्धतींचा अभ्यास वाखाणण्याजोगा होता. कॉन्फरन्स व शाळा भेटी व्यतिरिक्त
आमच्या विविध विषयांवर चर्चा झाल्या. त्यामुळेच मला वाटतं मला कमी वेळातही फिनलंडच्या
शिक्षणपद्धतीची, त्याच्या पार्श्वभूमीची चांगली ओळख झाली. हे सर्व छान अनुभवता आलं.
विविध देशातील लोकांबरोबर छान देवाण-घेवाण झाली. अशा प्रकारच्या कॉन्फरन्स आणि आणि
शाळा भेटीचे आयोजन CCE दरवर्षी करते. शिक्षणातील सर्जनशीलतेसाठी CCE कार्यरत आहे. यासाठी
हेरंब व शिरीन कुलकर्णी यांचं खूप कौतुक.
अँड.
छाया गोलटगावकर
chhaya.golatgaonkar@gmail.com
No comments:
Post a Comment