आनंदघर लेख - २८ 'पालकांशी संवाद'
याआधीच्या
एका लेखात मुलांच्या रुळण्याविषयी लिहिलं आहे. नवीन जागी मुलांचं रुळणं, आई-बाबाला
सोडून राहणं... केवळ मुलं पालकांना सोडून (विशेषतः आईला) राहतात एवढंच नाही तर आई-बाबाला
सुद्धा हे शिकावं लागतं की आपल्या बाळाला सोडून कसं राहायचं? विशेषतः आईला... तिच्यावरही
विविध ताण असतात. आपलं मूल राहील की नाही? रडेल का? त्याला व्यवस्थित सांभाळलं जाईल
का? सर्वजण त्याच्याशी प्रेमाने वागतील का? त्याला रागावणार तर नाही ना? अशा असंख्य
प्रश्नांचं काहूर तिच्या मनात थैमान घालत असतं! त्यासोबतच आपलं चुकत तर नाहीये ना?
आपण खूप लवकर आपल्या मुलाला आपल्यापासून वेगळं तर करत नाहीये ना? नौकरी-व्यवसाय करावा
की सोडून द्यावं? आपण वाईट आई तर नाही ना? असा अपराधी भावही तिच्या मनात येत असतो.
काही वेळा मूलही रडतं आणि आई पण रडते. आईचा कावराबावरा झालेला चेहरा, त्यावरचे ताण
मुलांना नीट कळतात. त्यामुळे मुलंही आणखीन अस्वस्थ होतात. 'माय लेकराची ही डि-टॅचमेंट
इतकी सहज सोपी प्रक्रिया नाही'. त्यात इतरही अनेक घटक असतात, छटा असतात. मुलांचं भलं कशात आहे याचा विचार असतो. मुलांना
इतर मुलांमध्ये खेळता येणं, आईला स्वतः साठी वेळ मिळणं, स्व-विकासाची संधी मिळणं, पुढचं
शिक्षण किंवा नोकरी, व्यवसाय सुरू करता येणं, त्यात कित्येकदा कुटुंबाचा आधार मिळतो
किंवा मिळत नाही. काही कुटुंबात कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नसतं, घेऊ शकत नसतं. काही कुटुंबात काहीच करू नको मुलाला तेवढं सांभाळ
असं म्हणतात, त्यामुळे आईसाठी मूल, कुटुंब व स्व-विकास ही तारेवरची कसरत बनते. त्यात
मूल शाळेत, पाळणाघरात रडत असेल तर आईसुद्धा अस्वस्थ असते. कित्येकदा तिच्या मनात अपराधी
भाव(guilt) दाटून येतात, तिच्या मनात कायम योग्य-अयोग्य असं द्वंद्व चालू राहतं. त्यातूनच
तिचे भावनिक चढ-उतार चालू राहतात. अस्वस्थ, असुरक्षितही वाटू लागतं. शाळेत किंवा पाळणाघरात
मूल रूळलं तरी कमी अधिक प्रमाणात ही भावनिक आंदोलनं चालू राहतात
काही
वेळा ते मूल खुद्द आईच्या आईकडे असलं तरी तिचा अस्वस्थपणा फार कमी होत नाही. अर्थात
तो आपणा सर्वांना दिसत नाही किंवा जाणवत नाही. कारण तिच्या मनातील ही भावनिक आंदोलनं
सांभाळून ती घरीदारी कार्यरत असते. शांतपणे, सूक्ष्मपणे आईचं निरीक्षण केलं तर ही भावनिक
आंदोलनं जाणवू शकतात.
मूल
रुळताना, रुळल्यानंतर कित्येकदा पालकांचे फोन येतात. फोनवर तेच ते प्रश्न विचारले जातात,
म्हणजे मूल काय करतंय? जेवलं का? झोपलं का? बरं नसेल तर औषध दिलं का? त्यानं ते घेतलं
का? शाळेतून वेळेत आला का? काही वेळा तायांना-मावशींना वाटतं की रोज तेच तेच प्रश्न
आहेत. अशा वेळी त्यांच्या प्रशिक्षणा दरम्यान प्रश्न काय विचारले आहेत, त्यापेक्षा
प्रश्न का विचारले आहेत? हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. दूर अंतरावरून जर मला
माझ्या बाळाची काळजी वाटत असेल तर फोन करून, विचारून ती काळजी काही प्रमाणात कमी होते.
शिवाय आपल्या गैरहजेरीत ज्या वातावरणात मुलं राहत आहे, तिथे काम करणाऱ्या व्यक्तींविषयी
ताई मावशींविषयी जसजसा विश्वास वाढत जाईल तसतशी ही काळजी कमीही होईल व प्रश्नही कमी
होतील. अर्थात प्रत्येक मूल जसं वेगळं असतं, तसं प्रत्येक पालकही वेगळे आहेत. काही
पालकांना विश्वास ठेवणं लवकर जमतं तर काहींना थोडा वेळ लागतो. ते त्या त्या व्यक्तीवर
आणि त्यांच्या भावनिक स्थितीवरही अवलंबून असतं.
आनंदघरचं
काम करताना पालकांच्या विविध छटा जाणवल्या. काही पालक अति काळजी करतात, इतकी की मुलांची
घुसमट व्हायला लागते. कित्येकदा मुलांच्या वेळापत्रकाबाबत खूप काटेकोर असतात म्हणजे
अमुक यावेळी अमुक इतकंच, अमुक हेच खाल्लं पाहिजे, तितकच झोपलं पाहिजे. खेळताना पडायला
नको, लागायला तर अजिबात नको. ते मूल पडेल, त्यामुळे लागेल या विचाराने ते त्याला कधी
पडुच देत नाही, आणि मोकळेपणाने खेळूही देत नाही. मूल रडू नये म्हणून किंवा अकांडतांडव
करू नये म्हणून वेळेआधीच मुलांच्या मागण्या (डिमांड) पूर्ण केल्या जातात. मूल छोटं
असलं तरी पालकांच्या या सगळ्या गोष्टी ओळखून असतं आणि त्यानुसार ते स्वतःच्या मागण्या
पूर्ण करून घेतं. पालक कळत- नकळत का होईना मुलांना स्वतंत्रपणे जगू देण्याच्या आड येतात.
मूल स्वतःच्या अनुभवातून जगण्यासाठी तयार होत असतं.
पालकांना
मला अगदी आवर्जून सांगावं वाटतं, मूल कितीही छोटं असलं तरी मुलांचं स्वतःचं एक अस्तित्व
आहे, ते समजून घ्या, ते स्वीकारा...त्यांना स्वतंत्रपणे अनुभव घेऊ द्या... कारण तो
त्यांच्या शिकण्याचा उत्तम स्त्रोत आहे.
खलील
जिब्रान यांनी या विषयी सुंदर लिहिलं आहे. त्या ओळी मला आठवतात,
"Your children are
not your children,
They are the sons and
daughters of life’s longing for itself,
They come through you but
not from you,
And though they are with
you yet they belong not to you,
You may give them your
love but not your thoughts....."
पालक
कित्येकदा सांगतात मुलं ऐकत नाहीत. काय करावं? काही उदाहरणं बघू...
खरंय,
काही वेळा मुलं ऐकेनाशी होतात. कित्येकदा मुलांनाही नीट कळतं की आपण काय केल्यानंतर
आपल्याला हवं ते मिळणार आहे. तीन वर्षांचा प्रतीक जरासं लागलं खरचटलं. थोडासा पडला
की खूप रडायचा. डोळ्यातून घळाघळा अश्रू धारा सुरु व्हायच्या. असं का होत असावं याचा
मी विचार करायचे. प्रतीक कधी पडूच नये, त्याला लागूच नये अशी काळजी पालक घ्यायचे. या
प्रकारची काळजी प्रतीकपर्यंत पोहोचली होती, त्यामुळे जरा काही झालं त्याला की खूप दुःख
व्हायचं. खूप रडू यायचं. त्याच्यासोबत खेळणारी इतर मुलं खेळताना जोरात पडली, जखम झाली
तरी उठून खेळायला जायची. मुलांमधील फरक लक्षात घेण्यासारखा आहे... प्रतीकचं न बोलणं,
छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावणं, माझ्याच मनासारखं झालं पाहिजे असा हट्ट करणं, रडत
रडत बोलणं किंवा नुसतंच रडत राहणं अशा गोष्टी दिसत होत्या. हे सर्व घरीपण घडत होतं.
कित्येकदा आनंदघरच्या ताई-मावशी सुद्धा पॅनिक होऊन तात्काळ त्याला शांत करण्यासाठी,
"बरं तुला हे हवंय का? मग घे!" तो म्हणेल तसं करायच्या.
रिया
नावाची 2 वर्षांची मुलगी तर हवं ते मिळवण्यासाठी खूप आकांडतांडव करायची. जमिनीवर गडाबडा
लोळायची... कारण या मुलांपर्यंत व्यवस्थित पोहोचलं होतं की
मला
हवं ते मिळवण्यासाठी रडणं, आरडाओरडा केला पाहिजे... खरं तर मुलं थोडी हट्टी असतात हे
मान्यच आहे! परंतु त्या हट्टाचा वारंवार उपयोग करून मुलं पालकांकडून हवं ते मिळवत असतील
किंवा पालकांना वेठीस धरत असतील तर तिथे मात्र पालकांनी थोडी सावधानता बाळगायला हवी.
चॉकलेट, बिस्कीट, जंकफूड, बाहेरचं खाणं, मोबाईल, टीव्ही अशा काही गोष्टी आहेत की जिथे
मुलांनी कितीही हट्ट केला तरी त्या पुरवायला नकोत. कित्येकदा असं होतं; पालक कुठल्यातरी
कामात असतात, घाईत असतात, थकलेले असतात. कुणाशी तरी बोलत असतात. अशावेळी जर मुलांनी
काही मागितलं किंवा मागितलं नाही तरी ते मूल शांत बसावं यासाठी या गोष्टी दिल्या जातात.
पालकांनी स्वतःच्या सोयीसाठी दिलेल्या गोष्टी मुलांच्या सवयीच्या बनतात व नंतर ही सवय
सोडवण अत्यंत कठीण होऊन बसतं. मोबाईल, टीव्हीमुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम आपण बघतच
आहोत. मुलांपर्यंत काय पोहोचतं की मी अमुक एक वागले तर मला या गोष्टी मिळतात आणि मुलांपर्यंत
काय पोहोचवण्याची गरज आहे? तू काहीही केलं, कितीही हट्ट केला तरी तुला हे मिळणार नाही!
हे न रागवता, न मारता सातत्याने मुलांपर्यंत पोहोचवायला हवं. सुरुवातीला ते विरोध करतील
परंतु सतत त्यांच्याशी बोललो, त्यांना समजावून सांगितलं तर हळूहळू त्यांच्या लक्षात
यायला लागतं की आपल्याला काय मिळू शकतं आणि काय नाही. काही बाबतीत पालकांची ठाम व आग्रही
भूमिका आवश्यक असते.
कित्येकदा
पालक असंही म्हणतात, मुलं घरी आली की सारखा मोबाईल आणि टीव्ही यात गुंततात, कितीही
सांगा ऐकतच नाही!
खरं
तर मोबाईल आणि टीव्ही त्याच्याहीपेक्षा आवडीच्या गोष्टी मुलांना करायला मिळाल्या तर
ते स्वतःहूनच टीव्ही मोबाइल याकडे आकर्षित होणार नाही. मुलं ऐकतच नाही असं म्हणण्यापेक्षा
आपल्याला आपलं म्हणणं मुलापर्यंत पोहोचवता येत नाही असं म्हणणं योग्य होईल.
मूल
आपल्याला जसं मोबाईल आणि टीव्ही साठी हट्ट करतं असाच त्याने चाकू खेळायला मागितला,
कडीपेटी मागितली, किंवा गॅसशेगडी सोबत खेळणार असं म्हटलं तर तो आपण देऊ का? मुलाला
या गोष्टी खेळायला मिळणार नाहीत हे आपण विविध
प्रकारे समजावून सांगितलं आहे, व मुलांना ते समजलं आहे, म्हणून मुलं त्यासोबत खेळत
नाहीत. अशी कोणतीही गोष्ट जी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेची आहे, ती आपण
त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि अशा गोष्टी आपण त्यांना देत नाही. आपली ही भूमिका मुलांनाही
कळते त्यामुळे तेही या गोष्टी मागत नाहीत. मग जी भूमिका चाकू इत्यादीबाबत घेणं जर आपल्याला
शक्य आहे तर तशीच भूमिका मोबाईल, टीव्ही किंवा इतर गोष्टींबद्दल घेणं काय अवघड आहे?
आपल्याला हे जमलं की प्रश्न सुटणार आहेत. बाहेरच्या जगात विविध प्रकारची प्रलोभनं मुलांसाठी
आहेत. त्यासाठी ठाम भूमिका व वेळोवेळी मुलांसोबत संवाद साधणं आवश्यक आहे... पालक म्हणून
मला हे शिकणं गरजेचं आहे...
chhaya.golatgaonkar@gmail.com
No comments:
Post a Comment