आनंदघर लेख - ९ ' आनंदघरची
इतर वैविध्यपूर्ण शिबिरं...'
१) उन्हाळी शिबिर:
आनंदघरच्या
सुरुवातीच्या (मे 2016) काळातलं हे शिबिर. 6 ते 12 या वयोगटासाठी हे शिबिर आयोजित केलेलं.
शिबिराचा
उद्देश -
-काही
कलात्मक वस्तू बनवता बनवता नेत्रहस्त समन्वय, मोटरस्किल्स डेव्हलप होणं,
-त्याचबरोबर
मुलांमधील सर्जनशीलतेला, कल्पकतेला वाव देणं,
हा त्यामागचा विचार होता.
शिबिराच्या सुरुवातीलाच असं ठरवलं होतं की, 'मोठ्यांच्या दृष्टीने सुंदर असलेल्या वस्तू न बनवणं, प्रत्येक मुलं जे काही आणि जेवढं मनापासून करत आहे ते स्वीकारणं.' अशा सूचना पालकांनाही दिल्या. आठवड्याभराच्या या शिबिरात मुलांनी नारळाच्या करवंटीत मोहरी पेरली व तिला रोज पाणी दिलं व रोज किती व कशी वाढ होते हे बघणं, हा सुंदर उपक्रम होता. याशिवाय मुलांनी पपेट, बुकमार्क, रांगोळी, कागदाच्या पिशव्या, ससुला अशा अनेक वस्तू बनवल्या. या वस्तू एकसारख्या न बनवता प्रत्येकाने आपल्या कल्पनेनुसार बनवल्या.
काहीतरी शिकवण्यासाठी हे शिबीर नव्हतं, तर मुलांनी विविध गोष्टी हाताने करून बघण्यासाठी हे शिबीर होतं. का करून बघायचं? तर करून बघण्यात एक प्रकारे स्व-अभ्यास, स्व-अध्यय असतं. उदाहरणार्थ ; बुकमार्क बनवायचा आहे तर त्यासाठी कागद कुठला वापरायचा, त्यावर डिझाइन कसं हवं, त्याला सजवण्यासाठी इतर काय साहित्य वापरायचं, असा सगळा विचार मुलं करतात आणि स्वतःच्या कल्पनेतल्या गोष्टी हाताने करत, स्वतःची कल्पना आणि वस्तू यातलं साम्य स्वतः अनुभवतात. अशा करून बघण्यातनं मुलं किती तरी नव्या गोष्टी शोधतात आणि ते शोधल्यावर त्यांचा आनंद, डोळ्यातली चमक निराळी असते.
२) फिरंगी संस्कार वर्ग:
शिबिराचं नाव खूप वेगळं आहे ना? शिबिरही तितकच वेगळं होतं. 6 ते 12 या वयोगटासाठी हे शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात जर्मन भाषेची व तिथल्या (जर्मनी) संस्कृतीची, लोकजीवनाची मुलांना समजेल अशा पद्धतीने ओळख करून देण्यात आली. हे शिबिर फ्लॅटवल्डचे नेहा महाजन, सौमित्र, प्रणव यांनी घेतले. शिबिराची रचना सुंदर होती. मूल भाषा कसं शकतं? याचा विचार करून, अभ्यास करून शिबिराचे आखणी केली होती. भाषा शिकण्याचा एक क्रम आहे; भाषा ऐकण, बोलण्याचा प्रयत्न करण त्यानंतर लिखाण. मूल कसं शकतं? मूल भाषा कसं शिकतं? याविषयीचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे, एकदा ते लक्षात आलं की मोठ्यांची एन्झायटी व त्यामुळे निर्माण होणारे मुलांच्या शिक्षणातले अडथळे कमी होतात. मूल भाषा लवकर शिकतं. मुलांच्या आसपास, परिसरातील ही भाषा असेल तर त्यांना ती चटकन समजते. या शिबिरात या पद्धतीनेच जर्मन भाषेची, तिथल्या जीवनशैलीची छान ओळख करून देण्यात आली. शिबिराच्या शेवटी जर्मन लोकांचा एक पदार्थही बनवून सर्वांनी मेजवानीचा आनंद लुटला. आठवडाभरात मुलं जर्मन भाषेतली वाक्य बोलत होती. सर्वात महत्त्वाचे या शिबिरामुळे त्यांच्या मनात भाषेविषयी व तिथल्या लोकांविषयी कुतूहल निर्माण झालं.
३) शाडू मातीचा गणपती:
'गणपती मुलांचा अत्यंत प्रिय, लाडका आहे. परिसरात गणेशोत्सव साजरा होताना मुलं बघत असतात. त्यांच्या मनात काही प्रश्न असतात परंतु त्या प्रश्नांना उत्तर मिळेलच असं नाही. त्यांचं कुतूहल शमेल असंही नाही. प्रचंड विरोधाभासांनी भारलेल्या वातावरणात त्यांच्या कल्पकतेला क्वचितच वाव मिळतो म्हणूनच गणपती बनवण्याच्या या शिबिराचं हे प्रयोजन'. गणेशमूर्ती बनवण्याबरोबरच गणपतीची गोष्ट, परिसरात गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, त्यातलं काय आवडतं, काय आवडत नाही, अशा सर्व गप्पा रंगतात. मुलांना मोठे आवाज, लाऊडस्पीकर अजिबात आवडत नाही, मोठ्या आवाजांची भीती वाटते, हे या गप्पांमधून कळलं. अशा कितीतरी गोष्टी या गप्पांमधून कळतात. म्हणून असे उपक्रम व त्या जोडीला गप्पा, गोष्टी, गाणी खूप महत्त्वाची आहेत.
हे शिबीर ऐश्वर्या ताईनी (साठे), आर्टिस्ट, घेतलं. या शिबिरात शाडूच्या मातीची मूर्ती बनवायचं ठरलं. मग शाडूची माती, मातीचे गुणधर्म, ती इतर मातींपेक्षा कशी वेगळी आहे? ती कशाप्रकारे वापरावी लागते अशा सर्व गप्पा झाल्या. माती हाताळताना ती किती घट्ट असावी लागते, किती मऊ असावी लागते याचाही अंदाज मुलं घेत होती. शिवाय मातीला गणपतीच्या आकारात वळवणं सोप्प काम नव्हतं. त्यात प्रत्येक मुलाचा गणपती वेगळा! कुणाचा बसलेला, कुणाचा उभा, कुणाचा टेकून बसलेला, कुणाचे दोन हात, कुणाचे चार हात, कुणाचा एक पाय वरती, कुणाचा मांडी घालून बसलेला, कुणाचा मुकुट असलेला, कुणाचा मुकुट नसलेला असे अनेक प्रकार मुलांनी केले. यासोबतच गणपतीचा उंदीर, लाडू ,लाडू ठेवण्याची प्लेट, मोदक असेही अनेक प्रकार मुलांनी स्वतःला सुचेल तसे केले. त्यानंतर आपण बनवलेला गणपती वाळल्यानंतर रंगवून घरी बसवण्याची मज्जा वेगळी होती.
४) विज्ञान शिबीर:
हे
शिबीर आनंदघरने आयोजित केलं नव्हतं. केवळ या शिबिरासाठी आनंदघरची जागा उपलब्ध करून
दिली होती. विज्ञानातील किचकट संकल्पना साध्या सोप्या पद्धतीने स्वतः च्या हातांनी
खेळणी बनवत समजावून घेणं मजेशीर आहे! यामुळे विज्ञानाबद्दलची भीतीही मनात फारशी राहत
नाही तसेच या विषयाची गोडी निर्माण व्हायला, संकल्पना स्पष्ट व्हायला मदत होते.
अक्षरनंदनच्या ६ वी च्या पालकांनी, ६ वी च्या मुलांसाठी शिबीर आयोजित केलेलं. विद्यार्थ्यांच्या विज्ञानातील संकल्पना या शिबिरात घेण्यात आल्या. आयुकाचे शिवाजी माने यांनी मुलांशी छान संवाद साधत हे शिबीर घेतले.
गेल्या
3 वर्षात आनंदघरात 15-16 शिबिरं झाली. शिबिरांचे विषय वैविध्यपूर्ण होते. त्याचबरोबर
शिबिर घेणाऱ्या व्यक्ती ही त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती आहेत. खरंतर तज्ञ व्यक्तींनी
मुलांच्या संपर्कात येणं यामागे काही महत्त्वाचं कारण आहे. फक्त त्या त्या व्यक्तीकडून
त्या विषयातील बाबी समजावून घेण नाही तर ती व्यक्ती कोण आहे, कशी आहे, कशी बोलते काय
सांगते आणि अशा कितीतरी गोष्टी... मुलं या गोष्टींचं सुंदर निरीक्षण करत असतात. हे सगळं शब्दात मांडण्यासारखं
नाही. तज्ञ व्यक्तींच्या सहवासाने मुलांना जे मिळतं ते नक्कीच आयुष्यभर पुरणार असतं.
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, वेगळ्या परिस्थितीमध्ये यातलं काहीही त्यांना आठवून,
त्याचा उपयोग पुढच्या जीवनात होऊ शकतो. असे मी ठामपणे म्हणू शकते कारण हा माझा स्वतःचा
अनुभव आहे. मला शाळेत, शिबिरात भेटलेले विविध तज्ञ लोक, त्यांनी सांगितलेल्या काही
गोष्टी आणि न सांगितलेल्या काही बाबी आजही माझ्यासोबत वाटचाल करत आहेत. नक्की कुठून
काय मिळालं असं बरेचदा सांगता येत नाही परंतु आपल्या आसपासची काही फार गुणी मन असतात
ज्यांचा थोडासा सहवास देखील तुमची आयुष्याची वाटचाल समृद्ध करणारी ठरवतो. यामुळेच मला वाटतं की, वेगवेगळी माणसं, तज्ञ मंडळी
मंडळी मुलांच्या सहवासात यायला हवीत, असा प्रयत्न आनंदघरी चालू असतो. त्या प्रक्रियेत
जे काही घडतं ते सुंदर आहे...आयुष्यभर पुरणार आहे...
अँड.
छाया गोलटगावकर
chhaya.golatgaonkar@gmail.com
No comments:
Post a Comment