...मागच्या लेखात आनंदघरच्या काही उपक्रमांबद्दल सांगितलं, या लेखात त्याचाच उर्वरित भाग...
आनंदघरी
दिवाळीची धम्माल, भरपूर उत्साहपूर्ण वातावरण असतं. दिवाळीचे वेळी किमान आठ दिवस आधी
उपक्रम चाललेले असतात. यात विविध तऱ्हेचे आकाश कंदील बनवणं, पणत्या रंगवणं, ग्रीटिंग
कार्ड बनवणं, सर्वात आवडीचा किल्ला बनवणं, त्यावर मावळे व त्यांचं कार्य वाटप करणं
आणि अत्यंत महत्त्वाचं दिवाळीचा फराळ बनवणं. सर्व बाळ गोपाळ दिवाळीचा फराळ आनंदाने
बनवतात. लाडू बनवताना तो हातात घेऊन वळवणं याची फार मजा येते आणि सुरुवातीला तो बनतच
नाही आणि मग ताई माझा बनत नाहीये असं सुरू असतं. थोड्या प्रयत्नान लाडू बनतोही त्याचं समाधान वेगळच असतं. बनवण्यापेक्षा
खाण्याकडे जास्त लक्ष असतं. शंकरपाळी बनवताना लाटण्यापेक्षा कापायला जास्त आवडतं आणि
चिवडा बनवताना तो मिक्स करणं जास्त आवडतं. या सर्व पदार्थात काय काय घातलं आहे व किती
प्रमाणात अशा गप्पा सुरू असतात. दिवाळीच्या फराळासहित आकाश कंदील, ग्रीटिंग, पणत्या
रंगवून, घरी नेऊन सजवायच्या असतात. या बनवलेल्या सर्व वस्तूंसहित दिवाळी साजरी केली
जाते. दिवाळी म्हटलं की अर्थात फटाक्यांचा विषय निघतोच. आनंदघरची मुलं तशी लहान आहेत.
त्यामुळे फटाक्यांचा काही हट्टही नसतो आणि
त्याबद्दल त्यांना विशेष कौतुकही नाही. मागच्या वर्षी तर पाच वर्षाच्या नीलने सुंदर
कल्पना सांगितली. कागदाचा फटाका बनवूया. मग काय दिवाळी साजरी करण्याच्या दिवशी सर्वांच्या
हातात कागदाचे फटाके आणि प्रचंड मस्ती, मजा चालू होती.
आनंदघरी
बालदिन साजरा केला जातो, तसा तर प्रत्येक दिवसच बालदिन आहे. ईद साजरी केली जाते. शिरखुर्मा
आणि पकोडे हमखास बनवले जातात. ख्रिसमस पार्टीलाही मजा येते. अंगणातलंच एखादं झाड ख्रिसमस
ट्री बनवून सजावट केली जाते. आवडीचा केक हाच खाऊ असतो. त्याबरोबर सांताक्लॉज म्हणजे
एखादी ताई सर्व मुलांना चॉकलेट्स वाटतात.
त्यानंतर मकरसंक्रांती , संक्रांतीचं मुख्य आकर्षण
पतंग. स्वतः च्या हाताने आपापले पतंग बनवणं, तिळाचे लाडू बनवणं असे उपक्रम होतात. पतंग
उडवणं हा आवडीचा खेळ आहे. हिवाळा असल्यामुळे गाजर, हरभरा, हुरडा, बोरं, आवळे असा सगळा
रानमेवा खाण्याचे हे दिवस. आवर्जून रानमेवा पार्टी केली जाते. याचा मुख्य उद्देश मुलांनी
या आरोग्यदायी नैसर्गिक भाज्या फळांचं सेवन करावे. त्यांची taste develop व्हावी.
15
ऑगस्ट व 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण उत्सव साजरे केले जातात. यात तिरंग्या विषयीचे
चित्र, रांगोळी असे उपक्रम घेतले जातात व गाणी, गप्पा गोष्टी होतात.
मुलांना होळी अत्यंत प्रिय आहे
पुरणपोळी खाण्याबरोबरच रंगांची उधळण चालू असते. विविध रंग पिचकारी भाजीपासून बनणारे, फळांपासून बनणारे नैसर्गिक रंग अशा सगळ्या गोष्टींची रेलचेल असते. मराठी नवीन वर्षाचं स्वागत म्हणून गुढीपाडव्याचा एक छोटासा उपक्रम घेतला जातो.
वर्षभर
सर्व प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात. विविध धर्मांचे सण उत्सव साजरे करण्यावर
भर दिला जातो. परिसरात सर्व प्रकारची माणसं आहेत. विविध जाती-धर्मांच्या विविध संस्कृती,
भौगोलिक, आर्थिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली तितक्या प्रकारचे सण उत्सव साजरे होतात.
मुलं ते बघत असतात. ते बघताना त्यांच्या मनात अनेक प्रश्न येतात त्यांच्या प्रश्नांना
काही वेळा योग्य उत्तर मिळतं तर काही वेळा मिळत नाही. मुलं सातत्याने आपण कोण आहोत,
आपल्या आजूबाजूला काय घडत आहे हे जाणून घेण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करत असतात. अशा
वेळी निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची याच्या ती शोधात असतात. कित्येकदा
त्यांचे प्रश्न ऐकून घेणं, समजून घेणं, त्याला योग्य तो प्रतिसाद देणं या गोष्टी घडत
नाही. याचा परिणाम असा होतो की मुलं बंद व्हायला लागतं, म्हणजे प्रश्न विचारेनास होतं.
मुलांचे कुतूहल, प्रश्न विचारण कमी झालं थांबलं की त्याची शिकण्याची प्रक्रिया ही मंदावते,
म्हणूनच मुलांनी विविध उपक्रम करत राहणं, हसणं, खेळणं, प्रश्न विचारणं अतिआवश्यक आहे.
मुलांच्या -वाढीसाठी व विकासासाठी योग्य वातावरण ही मोठ्यांची जबाबदारी आहे.
या सर्व कारणांसाठी परिसरातून प्रश्न घेऊन आलेल्या मुलांना आनंदघरी उत्तर शोधण्यात सहकार्य मिळावं हा मुख्य हेतू आहे हे सर्व सण उत्सव साजरा करण्याचा. प्रत्येक सण उत्सव साजरा करताना तो साजरा का व कसा करायचा, याचा विचार, याविषयी नियोजन असतं, पूर्वतयारी असते. यात प्रामुख्याने बदलत्या काळानुसार धार्मिकता, रूढी परंपरा यांना चिकटून न बसता नवे अर्थ शोधण्याचा /प्रयत्न केला जातो व तो मुलांना समजेल अशा भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचवला जातो . अशा सण /उत्सवाचे निमित्त साधून मुलांशी त्यांना समजेल अशा पद्धतीने गाणी, गप्पा, गोष्टी होतात. मुलांना निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाणं व आपलं व निसर्गाचं नातं याविषयी त्यांच्याशी बोलणं होतं. निसर्गाचं आणि माणसाचं एक जोडलेपण आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आधीच्या लेखात काही उपक्रम तसे आहेत. उदा. झाडाची पूजा, नागाची पूजा, समुद्राची पूजा यामागे त्यांचे संरक्षण करणं व त्यांचे मानवी जीवनासाठीचे सहकार्य याबद्दल आभार मानण. माणसासारखे तेही या निसर्गाचा एक भाग आहेत. आणि माणसाच्या जगण्यात त्यांचं एक स्थान आहे हे सांगणं. ऋतुमानानुसार सर्व सण उत्सव आहेत. त्यानुसार खाद्यपदार्थही बदलतात अशा खाद्य पदार्थांची चव घेणं ही एक मेजवानीच, नाही का? खाद्यपदार्थांची इतकी विविधता आणखी कुठे असेल? यासोबत आणखीन काही सणांविषयी माहिती घेण चालू आहे. शिवाय हे सर्व उत्सव त्याच त्या पद्धतीने केले जातील असं नाही. यात कायम प्रयोगशीलतेला वाव आहे. कारण सण-उत्सव माणसांसाठी आहेत, माणसं सण उत्सवांसाठी नाही. त्यामुळे काळानुरूप त्यात बदल आवश्यक आहे.
अँड.
छाया गोलटगावकर
chhaya.golatgaonkar@gmail.com
No comments:
Post a Comment