Tuesday, June 23, 2020

आनंदघर लेख - ३० 'आनंदघरच्या कामाचा आत्मा-सातत्यपूर्ण प्रशिक्षण… (भाग - २)'




आनंदघर लेख - ३० 'आनंदघरच्या कामाचा आत्मा-सातत्यपूर्ण प्रशिक्षण… (भाग - २)'

आनंदघरच्या सुरुवातीलाच आनंदघर सोबत काम करणाऱ्या ताई व मावशींना प्रशिक्षण द्यावं लागेल असा विचार मनात होता. मग त्या प्रशिक्षणाचे स्वरुप, उद्देश काय असेल यावरही विचार झाला. यातून प्रशिक्षणासंबंधी एक आराखडाच तयार झाला. त्याचा उपयोग प्रत्यक्ष काम करताना झाला. प्रत्यक्ष काम करताना ही प्रशिक्षण संबंधीच्या महत्त्वपूर्ण बाबी लक्षात येऊ लागल्या. महत्त्वपूर्ण प्रशिक्षणासाठी कामातून येणारे अनुभव खूप उपयोगी ठरू लागले. त्यातील काही मुद्दे--

१) सुरक्षितता : मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य आहे. त्यासाठी परिसर सुरक्षित असणं आवश्यक आहे. मुलांना इजा होवू नये यासाठी ताई मावशींनी कात्री, चाकू इ. वस्तू त्या त्या वेळी जागेवर ठेवणे आवश्यक आहे. छोट्या मुलांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. खेळताना एखादा मणी, दगड ते तोंडात, नाकात घालू शकतात. मुलांची आपापसातील भांडणं, एकमेकांवर माती, वाळू फेकणं, त्यातून इजा होऊ नये यासाठी खबरदारी घेणं, अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी प्रशिक्षणात बोलल्या जातात. रोजच प्रशिक्षण आणि 15 दिवसांनंतर होणारी मीटिंग दोन्ही महत्वाच्या आहेत. त्यात ताई आणि मावशींना काही विचारायचे असेल किंवा काही समजले नसेल अशा सर्व गोष्टींची चर्चा ठरलेल्या दिवशी होते. अशी चर्चा-मिटिंग मुलांच्या व ताई मावशींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. सुरक्षितता केवळ शारीरिक नाही तर मानसिक, भावनिक याबद्दल आधीच्या लेखात मांडणी केली आहे, पातळीवर सुद्धा असायला हवी याकडे लक्ष द्यायला हवं.

२) स्वच्छता : वैयक्तिक स्वच्छता, मुलांची स्वच्छता, आनंदघरच्या परिसराची स्वच्छता, नीटनेटकेपणा याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही ताई मावशी मुळातच स्वच्छ आणि नीटनेटक काम करतात. परंतु काहींच्या बाबतीत प्रशिक्षणात या गोष्टी सांगाव्या लागतात.

उदा. मुलांचं चित्रकाम करायचं असेल तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, काय पूर्वतयारी लागणार आहे, चित्रकाम कसं घ्यायचा आहे, मुलांसोबत काय बोलायचं आहे अशा कितीतरी गोष्टींची तयारी करावी लागते... शिवाय मावशींची किंवा इतर कोणाची या उपक्रमासाठी काय मदत घ्यावी हेही ताईला माहिती असणं आवश्यक आहे. काही तायांनी असे उपक्रम घेताना या प्रकारे पूर्वतयारी केलेली नसल्याचे आढळून आले. म्हणून सातत्यपूर्ण प्रशिक्षणाची गरज आहे. काही ताई, मावशी मात्र अगदी सर्जनशीलतेने उपक्रम घेतात त्यातून त्यांना नवीन काही गवसत असतं. यामुळे एक लक्षात आलं की काही जणींकडे काही गुण उपजतच छान असतात, काहींना मात्र प्रयत्न करायला लागतात प्रशिक्षण घ्यायला लागतं.

३) प्रथमोपचार-काही उपक्रम घेताना कात्री, सूरी अशा वस्तूंचा वापर केला जातो. त्या वस्तू व्यवस्थित हाताळणं गरजेचं असतं नाही तर इजा होऊ शकते. काही खेळ उपक्रम घेताना मुलांना गंभीर दुखापत होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. अशावेळी मुलांना ठामपणे सांगता येणं आवश्यक असतं.

कितीही काळजी घेतली तरी मुलं धडपडतात. मुळात धडपडणं हा मुलांचा स्वभाव असतो अशावेळी प्रथमोपचार करता येणं हा प्रशिक्षणाचा महत्त्वाचा भाग असतो. यात मलमपट्टी करणं, पालकांच्या सूचनेनुसार औषध देणं, मुलांचा ताप मोजता येणं, गरज पडल्यास मुलांना दवाखान्यात नेणं, पालकांना सुचित करणं असं सगळं प्रशिक्षण गरजेचं असतं. मुक्का मार लागल्यावर बर्फाने  शेकणं, मुलं पडली- त्यांना किती लागलं, रडत आहे, अशावेळी आपण पॅनिक न होता मुलांना शांत करणं. फार प्रश्न- बडबड, आरडाओरडा न करणं व शांतपणे प्रथमोपचार करणं आवश्यक आहे. मूल आधीच घाबरलेलं असतं त्यात आपलं घाबरणं, ओरडणं, प्रश्न विचारणं टाळायला हवं.

४) मुलांच्या आहाराविषयी : आनंदघरी चॉकलेट, बिस्कीट, बेकरीपदार्थ शक्यतो दिले जात नाहीत. मात्र काही वेळा मुलांच्या डब्यांमध्ये हे पदार्थ असतात त्यावेळी पालकांना हे सूचित करणं गरजेचं असतं. साधारणपणे वय वर्षे दोन पासून मुलांनी स्वतःच्या हाताने जेवण करणं तेही पूर्ण जेवण करणं, त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं आवश्यक असतं. काही मुलं स्वतःच्या हाताने खात नाही, भाज्या खात नाहीत अशावेळी गाणी-गोष्टीसहित मुलांना भरवायला हवं, मुलांनी स्वतःच्या हाताने जेवणं जेवढं महत्वाचं तेवढंच मुलं उपाशी राहायला नको याची काळजी घ्यायला हवी. जेवणाआधी- जेवणानंतरच्या स्वच्छतेविषयी मुलांशी बोलायला हवं.

५) शि-शु-उलटी, झोप : साधारणपणे दीड ते दोन वर्षाच्या मुलांना शि-शु बद्दल सांगता येतं, काहींना सांगता येत नाही. त्यांना ती सवय लावण्यासाठी ठराविक वेळाने शि-शुसाठी नेणं व त्यांना सवय होईपर्यंत रोज सांगणं आवश्यक आहे. (मुलांना बरं नसलं की उलटी होते). काहीही झालं तरी त्यावेळी जी मावशी ताई तिथे आहे, तातडीने तिने मुलांचे कपडे बदलणे साफसफाई करणं अत्यावश्यक आहे. ज्या मुलांना पॅन्टमध्ये शी शु होत असेल झोपेत होत असेल आणि इतर मुलं चिडवत असतील तर मुलांशी बोलणं आवश्यक आहे.

मुलांना दुपारच्यावेळी झोपताना मायेचा स्पर्श हवा असतो. गाणी-गप्पा-गोष्टी करत मुलांना झोपायला आवडतं, हलकसं संगीत मुलांना झोपताना लावायला हवं. त्याचबरोबर मुलांची झोपण्याची खोली, त्यांचं अंथरूण-पांघरूण स्वच्छ व नीटनेटकी असावी लागतात.

वरील सर्व प्रशिक्षणातील काही उदाहरणं झाली अशाप्रकारे बारीक बारीक मुद्द्यांचा विचार करून प्रशिक्षण दिलं जातं. आयत्यावेळेला काही नवीन मुद्देही समोर येतात, त्यावरही चर्चा केली जाते.

६) पालकांशी संवाद : प्रशिक्षणातील हा खूप मोठा भाग असतो.(पालकांशी संवाद या लेखात , लेख क्रमांक - 28, आनंदघर लेखमाला, यात याविषयीचे मुद्दे आलेले आहेत)

७) ताई-मावशी यांचं आपापसातील नातं, प्रशिक्षणामुळे आणि सर्व ताई, मावशींवरील विश्वास यामुळे प्रेमाचं आणि घट्ट आहे. काही अडचण आल्यास एकमेकींना सांभाळून घेतात एकमेकींच्या वेळा ॲडजस्ट करतात.

प्रशिक्षणात आणखीही खूप गोष्टी केल्या जातात. सगळ्यांचा उल्लेख इथे करणे शक्य नाही. त्यामुळे उदाहरणादाखल काही मुद्दे दिले आहेत. प्रशिक्षणाबाबत नवीन विचार येत असतात. आत्तापर्यंत केलेला विचार व त्याची अंमलबजावणी, तसेच प्रत्यक्ष काम करताना ज्या नवीन गोष्टी, मुद्दे समोर येतात त्यांची दखल घेऊन प्रशिक्षणात समाविष्ट करणं अशी ही प्रक्रिया चालू असते. आत्तापर्यंत केलेल्या कामावरून असं म्हणता येईल, काही गोष्टी समजल्या, उमजल्या, काही गोष्टी करून बघता आल्या, काही गोष्टी ठरवल्या तशा नाही झाल्या, अशा या प्रशिक्षण प्रक्रियेच्या विविध छटा आहेत…..

अजून बऱ्याच काही छान छान कल्पना आहेत, वेगवेगळं करून बघायचं आहे, लांबचा पल्ला.....




No comments:

Post a Comment