फिनलंड अभ्यास दौऱ्यावेळी सीसीई ने आयोजित केलेल्या कॉन्फरन्स दरम्यान आनंदघरच्या कामाविषयी मांडणी झाली, प्रेझेंटेशन केलं, त्यावर आधारित हा लेख आहे.
माझं
आणि सीसीईच्या संचालक शिरीन कुलकर्णीसोबत झालेल्या चर्चेनुसार, त्यांना कॉन्फरन्स मध्ये
केवळ पुस्तक वाचून केलेलं (आर्म चेअर प्रेझेंटेशन) नको होतं. प्रत्यक्ष काम करणाऱ्या
व्यक्तींनी एखाद्या विषयावर सखोल मांडणी करावी अशी त्यांची अपेक्षा, इच्छा व आग्रह
होता. जे की मलाही मनापासून पटणारं होतं.
आनंदघर - बालसंगोपन केंद्र, लर्निंग अँड रिसर्च सेंटर
मध्ये चालू असलेले प्रयोग त्याही आधीच्या नऊ दहा वर्षांच्या अभ्यासावर अवलंबून आहेत.
तो अभ्यास, ती समज, जाणीव प्रत्यक्षात उतरवून बघणं आणि प्रत्यक्ष येणारे अनुभव, त्याचबरोबर
त्या अनुभवातून काही नवीन गोष्टी हाती लागत होत्या, आहेत.
Theory to Practice (Implementation),
Practice to Theorisation.
असा
दोन्ही बाजूंनी हा समृद्धीकडे नेणारा प्रवास चालू आहे.
या कॉन्फरन्ससाठी माझा विषय होता -क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन अँड ब्रेन आर्ट विथ स्पेशल रेफेरेन्स टू आनंदघर.
सर्जनशीलतेचं शिक्षणातील महत्व निर्विवाद आहे. खरंतर सर्जनशीलता शिक्षणाचा अविभाज्य अंग आहे, ती प्रत्येक मुलात असते. फरक एवढाच आहे की मूल कुठल्या वातावरणात आहे यानुसार ती बहरते किंवा कोमेजते. मुलांमधील वाढ आणि विकास हा सर्जनशीलतेचा अविष्कार आहे. त्यामुळे शिक्षणामध्ये सर्जनशीलता असणं आवश्यक आहे.
"All children are born an artist, the problem is to remain an artist as we grow up" - Picasso
Picasso rightly stated that we don't grow into creativity we grow out of creativity.
शिक्षणाची
सद्यस्थिती बघता वरील वाक्याची खोली आपल्या लक्षात येऊ शकेल. याच पार्श्वभूमीवर बाल
संगोपनात सर्जनशीलतेची काय भूमिका आहे, हे आनंदघर मधील काही उदाहरणांमधून समजून घेऊ.
सर्जनशीलता विविध कलागुण व मेंदूची वाढ आणि विकास यांच्यातील संबंध या उदाहरणांमधून
लक्षात येईल.
आनंदघरच्या अंगणात दोन मुलं खेळत होती. वय नऊ-दहा
वर्षे. त्यांचं धरण बांधणं चालू होतं. हे धरण कसं असावं? त्याचा विचार करून त्यासाठी
काय साहित्य लागणार आहे ते जमा करून त्यांनी धरण बांधलं. मग त्यामध्ये हळूहळू पाणी
ओतलं. पाणी ओतत असताना धरण फुटलं. त्यांची अगदी तारांबळ उडाली आणि खूप वाईटही वाटलं.
दोघांचीही चर्चा सुरू होती, मातीची भिंत असल्यामुळे धरण फुटलं म्हणून त्यांनी असा निष्कर्ष
काढून सिमेंटच्या विटा इ. आणखीन वेगळं साहित्य जमा केलं आणि पुन्हा धरण बांधलं. पुन्हा
त्यात पाणी ओतलं. यावेळी धरण फुटू नये म्हणून योग्य ती काळजी घेतली. ओवरफ्लो झालं तर
ते जास्तीचं पाणी धरणाच्या खाली तळं बांधून तिकडे वळवलं. अशी दोन तळी तयार केली. आत्ता
मात्र त्यांचा धरण फुटलं नाही. त्यांनी बनवलेल्या या धरणावर ते जाम खुश होते. बराच
वेळ त्यांचं धरणाशी खेळणं चालू होतं. या सर्व घडामोडी, प्रक्रिया मी दुरून बघत होते.
एखादी गोष्ट ठरवून त्याचे नियोजन करणं, त्यासाठी आवश्यक ती सामग्री जमा करणं, आपल्या
कल्पनेतील प्रत्यक्षात उतरवून, त्यात आलेल्या अडचणी सोडवण ही सर्जनशीलता आहे. (क्रिएटिव्ह
इंटलिजन्स). ही मुलांना कोणी शिकवली नाही. जन्मतः ती त्यांच्यात आहे, ती फक्त योग्य
वातावरण दिलं, मोठ्यांनी त्यांच्यात लुडबुड केली नाही, त्यांना सूचना दिल्या नाही तर
भरते. त्यांना अडचण आली, समस्या (प्रॉब्लेम) आली म्हणून मी सोडवायला गेले नाही. जे
काही केलं, त्यांचं त्यांनीच केलं.
मानवी
मेंदू हे करू शकतो हा विश्वास आपण बाळगायला हवा, जर हा विश्वास असेल तर आपण मुलांच्या
मध्ये मध्ये लुडबुड करत नाही. उगाच सूचना द्यायला जात नाही.
असंच एकदा ईशा आणि निशा, तीन ते चार वर्षांच्या मुली
खेळत होत्या. ईशाला निशाच्या हातातलं खेळणं हवं होतं. ते तिनं निशाच्या हातातून ओढू
लागली आणि जोरात ओरडू आणि रडू लागली.
निशानं
तिला सांगितलं, "आधी रडणं आणि ओरडणं थांबाव. तुला माझ्या हातातली खेळणी हवं ना?
मग तू कसं विचारशील?"
ईशा
पण शांत झाली आणि निशाला म्हणाली, "मला ती खेळणी देतेस का? आणि मग ईशाने ती खेळणी
निशाला आनंदाने दिली.
मी
हे दोघींचं संभाषण ऐकत होते. आनंदघरी ज्या पद्धतीने मुलांशी बोललं जातं ते निशानी छान
आत्मसात केलं होतं आणि त्याचा उपयोग समस्या सोडवण्यासाठी केला होता.
खरंतर दोघीही आरडाओरडा करणाऱ्या! मला वाटलं आता जोरदार भांडण होणार आणि मी त्यांच्याकडे जायला निघाले. तेवढ्यात त्यांचं पुढचं संभाषण कानावर पडलं. मी ते थांबून ऐकलं. त्यांनी स्वतःचं ती समस्या सोडवली. त्यावेळी मला असं जाणवलं मुलांच्या वाढीत व विकासात आपली भूमिका मर्यादित आहे. मोठ्यांकडे संयम असणं खूप आवश्यक आहे. या संयमाअभावी मोठी माणसं भराभर तयार उत्तरं मुलांना देतात. खरंतर अशी उत्तरं महत्त्वाची नाहीत. महत्वाच आहे कि ते मुल उत्तरापर्यंत कसं पोहोचतं, ती एक प्रक्रिया आहे आणि अशा प्रक्रियेतून मुलं शिकतं. त्याच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो. वरच्या उदाहरणात समस्या उद्भवणं आणि समस्येचे निराकरण करता येणं महत्त्वाचं आहे. ही एक प्रकारची सर्जनशीलता आहे. (Creativity in problem solving).
तीन वर्षांचं मूल आनंदघरी आलं, तिचं नाव तन्वी. एका
पूर्व-प्राथमिक शाळेतही जात होती. तिला चित्र काढायचं होतं. म्हणून तिला कागद आणि खडू
दिला. बराच वेळ झाला तरी ती चित्रच काढेना. म्हणून मी तिला विचारलं," तुला आणखीन
काही हवंय का?"
ती
म्हणाली,"तुम्ही माझा हात पकडला तरच मी चित्र काढेन". खरंतर या वयाची मुलं
आवडीनं रेघोट्या काढत असतात. आपल्यासाठी त्या रेघोट्या असतात पण त्या मुलाचं ते सुंदर,
विचार करून काढलेले चित्र असतं. माझ्यासमोर प्रश्न होता की तन्वी का चित्र काढत नाहीये?
तिच्या आईसोबत बोलले. तर त्यांनी सांगितलं की शाळेत जाण्याआधी ती स्वतः चित्र काढायची.
शाळेत जायला लागल्यापासून हात पकड तरच चित्र काढेन असं म्हणू लागली. म्हणजे काही शाळांमध्ये
मुलांचे हात पकडून चित्र काढणं, गिरवणं, आकारात रंग भरणं अशा गोष्टी घेतल्या जातात.
या सर्व गोष्टी मुलांमधील सर्जनशीलतेला मारक आहेत. तन्वीला एक दिवस मी ओले रंग खेळायला
दिले आणि चित्र काढ असं म्हटलंच नाही. आपण या रंगांशी खेळूया, असं म्हटलं. त्यादिवशी
तन्वी मनसोक्त रंग खेळली, हाताला पायाला सगळीकडे रंग लावून झालं. अगदी पायांचे तळवे
रंगवून अंगणात पळत होती. स्वतःच्या पायांचे ठसे बघून खूप आनंदी झाली होती. तिच्या आनंदात
मीही आनंदून गेले. ओले रंग आणि मुक्त खेळ यांनी तिला मुक्त केलं. यानंतर तन्वी भरपूर
चित्र काढायला लागली. तिची कल्पकता ही उत्तम आहे. नैसर्गिकरित्या तिच्यात असलेली सर्जनशीलता,
कल्पकता शाळेच्या चौकटीत बंदिस्त झाली होती.
मुलांमधील कल्पकतेचाही भन्नाट अनुभव आला. चार वर्षांचा
विनय एकदा माझ्याकडे आला आणि म्हणू लागला, "दूध पिल्यानंतर उड्या मारायच्या नाही
ना? नाहीतर उलटी होते ना?
मी
म्हटलं, "हो."
तो
पुढे म्हणाला, "तुम्हाला माहित आहे, उलटी कशी होते?"
मी
विचारलं, "कशी?"
तो
म्हणाला, "कारण की आपण उड्या मारल्या की पोटातलं दूधही उड्या मारतं".
आम्ही
सर्व हे उत्तर ऐकून हसू लागलो. मी कधी असा विचार केला नव्हता. अतिउत्तम कल्पकता! मुलं
मुक्त असली की अशी कल्पकता बहरते.
एकदा एक सहा वर्षांची जान्हवी माझ्याजवळ आली आणि
म्हणाली, "मला खूप बोअर होतंय. मी काय करू?" मी तिला विचारलं, "तुला
काय करायला आवडेल?"
ती
म्हणाली, "काहीच नाही! मला बोअर होतंय." मग मी तिला सुचवलं, "आपल्याकडे
अंगणात खूप छान गोष्टी आहेत. वाळू, माती, खाली पडलेली पानं, फुलं, दगड यातून तू काहीतरी
करू शकते का?" ती बाहेर अंगणात पळाली थोड्या वेळाने तिने मला आवाज दिला. मग मी
अंगणात जाऊन बघितलं तर तिने अंगणातल्या विविध गोष्टी जमवून सुंदर रचना तयार केल्या
होत्या. इतक्या सुंदर रचना बघून असं वाटलं काही वेळा मुलं बोअर व्हायला हवी. आपण एक
गोष्ट लक्षात घ्यायला हवी. मुलांची कायम करमणूक करणं, त्यांना उपक्रम देत राहणं, खेळवणं
ही आपली पूर्ण वेळची जबाबदारी नाही. आपलं असं नियोजन मुलांमधील सर्जनशीलतेला मारक आहे.
त्यामुळे
त्यांना विचार करु द्यावा. त्यांना बोअर होऊ द्यावं.
त्यांना
प्रयत्न करू द्या.
त्यांना
चुका करू द्या.
त्यांना
अनुभव घेऊ द्या.
त्यांना
रडू द्या.
त्यांना
शोधू द्या.
त्यांना
निरीक्षण करू द्या.
त्यांना कृती करू द्या.
त्यामुळे मुलांसाठी विविध उपक्रमांचे नियोजन करणं,
वेळापत्रक बनवणं, जसं गरजेचं आहे, तसंच काही वेळा मूल आपलं आपण खेळणं पण आवश्यक आहे.
मुलांनी स्वतःहून नवनवीन गोष्टी शोधणं आवश्यक आहे. म्हणून काही वेळा मुलांना बोअर होणं
चांगली गोष्ट आहे. ही संधी समजून त्यांना स्वतंत्रपणे स्वतःची करमणूक करण्यास प्रोत्साहन
देणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक वेळी त्यांच्या मेंदूला खाद्य पुरवणं त्यांना परावलंबी
बनवू शकतं. या प्रक्रियेत मूल विचार करतं, बोअरडम मधून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधतं,
प्रयत्न करतं. हा अनुभवसुद्धा त्यांच्यातील सर्जनशीलतेला वाव देणारा ठरतो.
प्रत्येक मूल मुळात सर्जनशील असतं. प्रत्येक मुलाकडे कल्पकता असते. परंतु कित्येकदा मोठी माणसं कळत-नकळतपणे मुलांमधील सर्जनशीलता आक्रसून टाकतात. स्वतःच्या मर्यादित अनुभव विश्वातून मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या माणसांची मुलांच्या विकासातील भूमिका शिकवण्याची नसून मुलांच्या शिकण्यासाठी पूरक वातावरण तयार करणे एवढीच आहे असं वाटतं.
उर्वरित भाग पुढच्या लेखात...
अॅड. छाया गोलटगावकर
chhaya.golatgaonkar@gmail.com
No comments:
Post a Comment