आनंदघर लेख - १५ 'आनंदघर मूलभूत काम: मूल रुळताना...'
आनंदघरचे
सुरुवातीचे दिवस होते. विविध वयोगटातील मुलं येत होती. प्रत्येक मुलाचं निरीक्षण चालू
होतं. कुठल्या गोष्टीला मूलं कसा प्रतिसाद देतं हे बघणं चालू होतं. प्रत्येक मुलं किती
वेगळं आहे हे जाणवत होतं. प्रत्येक मुलाच्या रुळण्याच्या पद्धती थोड्या वेगळ्या होत्या.
माझं निरीक्षण आणि विचार करणं चालू होतं. माणसाची ती छोटीशी प्रतिकृती माझं कुतूहल
जागृत करीत असे, मुलांच्या भावविश्वात डोकावून बघण्याचा मी प्रयत्न करायचे. आईला-बाबाला
सोडून राहणं म्हणजे काय? एक विशिष्ट जागा तिथली माणसं आजूबाजूचा परिसर सगळंच वेगळं!
काय प्रश्न पडत असतील मुलांना? माझं घर, माझ्या घरातली माणसं, आजूबाजूचा परिसर सोडून
या नव्या ठिकाणी मला का सोडलं आहे? माझ्या ओळखीच्या परिसरातनं या अनोळखी परिसरात मी
का आहे? आई-बाबा आजी-आजोबा मला इथे सोडून का जात आहेत?
बरं
अशी भीती सुद्धा असू शकते, की आई मला इथे सोडून जात आहे ते नेहमीसाठी की परत घ्यायला
येणार आहे? ही कोण लोकं आहेत? मी इथे का थांबायचं? हे सर्व प्रश्न व त्यांचे शब्द रूप
अर्थात माझ्या मनातलं आहे. मुलांच्या निरीक्षणातून त्यांच्या भावविश्वात असं घडत असावं
असं वाटतं. कदाचित त्याच्याकडे असे शब्द नाहीत व्यक्त होण्यासाठी. त्यांच्या हावभावावरून,
रडण्या वरून, वागण्यावरून काही अंदाज बांधता येतात. ते शंभर टक्के असंच घडत असेल असंही
नाही.
मला
जे जाणवलं ते मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. काही मुलं रुळताना रडतात, गडाबडा लोळतात,
तर काही शांत बसतात, काही मुलं झोपी जातात. मला असं वाटतं त्यांच्या झोपण्यामागचं कारण
नवीन जागी राहण्याचा ताण असावा. तो त्यांना असह्य होत असावा व ते दमून झोपी जात असावे,
यातून सुटका करून घेत असावेत. आणखी एक भाग म्हणजे काही मुलं रुळताना एखादी ताई किंवा मावशी यांना चिकटून राहतात. काही दिवस तरी
इतर कोणाकडे जात नाहीत. असुरक्षितता हे त्यामागचं कारण असावं. वातावरण सुरक्षित, आश्वासक
वाटू लागेल, तसतशी मुलं इतर मुलांमध्ये, इतर ताई, मावशी यांच्याकडे जाऊ लागतात. हा
रुळण्याचा काळ प्रत्येक मुलाचा वेगवेगळा आहे. त्याबद्दल निश्चितपणे सांगणं थोडं कठीण
आहे. काही मुलं चार दिवसात रुळतात तर काहींना चार महिनेही लागतात. काहींना थोड्याफार
परिचयाने रुळण सोपं जातं. आतापर्यंतच्या निरीक्षणातून, कामातून असं लक्षात आलं, मूल
ज्यावेळी पहिल्यांदाच घराबाहेर पडतं, म्हणजे पहिल्यांदा आई-बाबांना, आपलं घर सोडून
नव्या ठिकाणी जातं, त्यावेळी त्याच्या रुळण्यासाठी घाई करायला नको. अगदी साधी गोष्ट
आहे नवीन ठिकाणी मोठ्या माणसांनाही संकोचल्यासारखं होतं, तसंच मुलांनाही संकोचल्यासारखं
होणं अस्वस्थ वाटणं, स्वाभाविक आहे. मुलांची ही परिस्थिती लक्षात घेऊन मोठ्यांनी शांतपणे
मुलांच्या रुळण्यासाठी प्रयत्न करायला हवे.
मुलं
मोठी होणार आहेच! पाळणाघरात, शाळेत, मैदानावरही जाणार आहेत. आयुष्यात उभं राहणार आहे.
काही ना काही काम करणार आहेत. या गोष्टी काही थांबणार नाहीत. फक्त वेळ कमी अधिक लागू
शकतो. त्यासाठी पालकांनी घाई करण्याची अजिबात गरज नाही. नवीन वातावरणाशी मुलांचा योग्य
रीतीने परिचय करून देणं, त्यांना सुरक्षित वाटेल असा विश्वास देणं, त्यासाठी थोडा वेळ
देणं गरजेचं आहे. असं केलं की मुलांचं रुळणं सहज, सोप्पं, अल्हाददायक, आनंददायक होतं.
कुठल्याही नकारात्मक भावनांचा त्यांना फारसा त्रास न होता बाह्य जगाला सकारात्मकतेने
स्वीकारायला मदत होते. अशी मुलं स्वतःलाही छान स्वीकारतात.
मुलांना
सोडून जाताना काही पालकांचं मुलांशी बोलणे मी ऐकलं आहे. मूल रडत असतं, पालकांना घट्ट
मिठी मारून बसतं, अजिबात सोडायला तयार नसतं अशावेळी काही पालक मुलांना चॉकलेट देईल,
खेळणी घेऊ अशी लालूच दाखवितात. तर काही पालक रागवतात, डॉक्टर, पोलिस, अशा भित्या घालतात,
कित्येकदा खोट बोलून, त्यांना फसवून, न सांगता
निघून जातात. पालकांच्या अशा वागण्यामुळे मुलांचा आणखीच गोंधळ उडतो. या सर्व
नकारात्मक भावना मुलांना अस्वस्थ करतात. खरंतर पालकांचा उद्देश मुलांनी नव्या जागी
थांबावं, खेळाव असा आहे, परंतु संवादात खूपच गडबड आहे. अशा संवादामुळे मुल आणखीच घट्ट
चिकटून बसतं खरंतर वर सांगितल्याप्रमाणे मुलांच्या भावविश्वात जर आपण डोकावून बघितलं
तर आपल्याला अशा प्रकारे मुलांशी बोलणं टाळायला हवं हे लक्षात येईल व त्यांना विश्वासाने
नव्या वातावरणाचा परिचय करून देणं गरजेचे आहे हे ही लक्षात येईल. रुळण्याचे असेच काही
निवडक अनुभव इथे मांडत आहे.
आनंदघरी
ओवी आली ती रडतच! तिला तिच्या आजीकडे सोपवून तिची आई माझ्याशी बोलू लागली, "ओवीला
सवय व्हावी म्हणून आम्ही जवळच्या शाळेत घातलं. त्या शाळेत पालकांना थांबू देत नाहीत.
मुलांना आत घेतात व गेट बंद करतात. या प्रकाराला ओवी खूप घाबरली. तेव्हापासून कुठलंही
गेट बघितलं की ती खूप घाबरते व खुप रडते". मी म्हटलं, "कदाचित या प्रकारामुळे
प्रचंड असुरक्षिततेची भावना तिच्या मनात घर करून आहे, ती जोपर्यंत रुळत नाही तोपर्यंत
तुम्ही थांबा! तिचा आधीचा अनुभव तिला आवडलेला नाही. तिच्यासाठी तो वाईट आहे त्यातून
बाहेर पडण्यासाठी किती वेळ घेईल ते बघू." ठरल्याप्रमाणे ओवी येऊ लागली सुरुवातीला
ओवीची आई तिच्या सोबत खेळायची. हळूहळू तिची ओळख ताई व मावशी सोबत झाली. ती त्यांच्याशी
खेळू लागली. त्यानंतर मात्र तिच्या आईला तुम्ही पुस्तक वाचत बसा, ओवीचं खेळणं, खाणं-पिणं
मावशी आणि ताई बघतील असं सांगितलं.ओवी सारखं आईला खेळण्यासाठी बोलवायची, काम आहे सांगितल्यावर
खेळायला जायची. त्यानंतर मात्र साधारण माहिनाभराने ओवीच्या आईला सांगितलं,"थोडा
वेळ बाहेर जा, ओवीला सांगून जा. ओवीला सांगून का जायचं? कारण ओवीचा विश्वास आहे की
आई न सांगता मला सोडून जाणार नाही. या विश्वासाला धक्का पोचायला नको म्हणून ओवीला सांगून
जायचं की मी माझं काम करून तुला घ्यायला येते. जर न सांगता गेलं तर दुसऱ्या दिवसापासून
आई आपल्याला सोडून जाते. या भीतीने मुलं अजिबात खेळत नाही व सतत रडत राहतं. जेव्हा
आई सोडून जावू लागली तेव्हा ओवीनं प्रचंड रडणं सुरू केलं, थोडंसं रडलं की झोपून जायची.
जरा वेळाने उठायची आणि मग खेळायची. कदाचित असं सोडून जाण्याचा ताण सहन होत नसावा. काही
दिवस असं चालू होतं, त्यानंतर मात्र ओवी आईला टाटा म्हणायला लागली.
मुलं
उत्तम निरीक्षक असतात. आपल्या चेहर्यावरचे हावभाव त्यांना कळतात. त्यांना हवं ते कसं
मिळवायचं हे त्यांना काही वेळा माहीत असतं. किती रडलं किती गोंधळ घातला की मिळतं याचीही
त्यांना काही वेळा कल्पना असते. त्यात प्रचंड मोठ्यानं रडणं, गडबडा लोळणं, श्वास रोखणं,
रडून रडून उलटी करणं इत्यादी प्रकार असतात. रुळताना हे सर्व प्रकार ते आजमावून बघतात.
अडीच
वर्षाच्या आर्यने ही असे प्रकार केले. त्यामुळे तीन पाळणाघरात तिथल्या ताईंनी हा रुळत
नाही असे सांगितले. कारण तो रोजच रडून-रडून उलटी करायचा त्याला उलटी झाली की त्या ताई
पालकांना बोलून घरी घेऊन जायला सांगायच्या. हुशार आर्याच्या हे अचूक लक्षात आले की
रडलं की उलटी होते आणि उलटी झाली की घरी, आईकडे जायला मिळतं. आनंदघरीही त्याने हेच
प्रकार सुरू केले. मावशी त्याचे कपडे बदलून त्याला स्वच्छ करून त्याला पुन्हा खेळायला
न्यायच्या. उलटीचा मार्ग काम करे ना म्हणून आर्य झोपायला लागला. रडून रडून झोपी जायचा
उठला की मात्र खेळायचा चार-पाच दिवसातच रडणं आणि झोपणंही बंद झालं व तो इतर मुलांशी
खेळू लागला. ताई व मावशींनी शांतपणे त्याच्या रडण्याला उलटीला न घाबरता त्याला रुळण्यास
मदत केली.
प्रत्येकच
मूल रडतं असंही नाही. कितीतरी मुलं न रडता आनंदाने रुळतात. अशीच शार्वी आहे (तीन वर्ष)
आईसोबत आनंदघर बघायला आली. आम्ही बोलत असताना ती आनंदघरच्या अंगणात खेळू लागली. तिची
आई सांगू लागली बरीच पाळणाघर शोधली, प्रत्येक ठिकाणी ती मला चिटकून उभी होती. इथे पहिल्यांदा
ती मला सोडून खेळायला गेली. त्या पुढे म्हणाल्या, आमच्या शोधाचं हे शेवटचं पाळणाघर,
इथे जर ती नाही म्हणाली, तर मी जॉब करणार नाही असे ठरवलं होतं. आमचं बोलणं झालं तरी
शार्वी घरी जायला तयार नव्हती. त्यांनी तिला विचारलं मग मी एक काम करून येऊ का तुला
घ्यायला? तर ती लगेच हो म्हणाली. दोन तासांनी शार्वीची आई घ्यायला आली तर शार्वी रडूच
लागली. घरी जायचं नाही यासाठी ती रडत होती. झआनंद घरातला हा तिचा पहिलाच दिवस! आम्हालाही
आश्चर्य वाटलं. मी तिच्या आईला सुचवलं की तुम्ही तिला संध्याकाळी घ्यायला या. दिवसभर
मनसोक्त खेळली संध्याकाळी आई तिला घ्यायला आली. पुन्हा रडू लागली घरी जायचं नाही म्हणून.
तिला इतकं खेळायचं होतं की तिचं मनच भरत नव्हतं. घरी जायचं नाही यासाठीच ती रडत होती.
कशीबशी समजूत घालून तिच्या आईसकट आम्हाला सगळ्यांना यश आलं. हा असा कार्यक्रम घरी जाण्यासाठी
रडू यायचं किमान पंधरा दिवस चालू होता. अर्थात घरी तिला खेळायला कोणी नव्हतं हे मुख्य
कारण त्यामागे होतं. आनंदघरी अशी बरीच मुलं आली जी रुळताना रडली नाही. शिवाय आनंदघरी
इतकं त्यांना खेळायचं असायचं की घरी जायला नाही म्हणायची. मला वाटतं आनंदघरी मुलांना
दिली जाणारी मोकळीक, कमीत कमी सूचना, मुलांच्या म्हणण्याला प्राधान्य, त्यांचं म्हणणं
ऐकणाऱ्या ताई, मावशी त्याचबरोबर मनसोक्त वाळू, माती, पाणी खेळायला मिळणं ही काही कारणं
असावीत. काहीवेळा मुलं रडायची ती भावनिक अस्थिरतेमुळे. घरामधील ताण-तणाव, शाळेत कुणी
रागावलं असेल ओरडलं असेल या कारणासाठी रडायचं, त्यांना काही आठवायचं आणि ते रडायचे.
काही वेळा काही मुलं इतकी रडायची, विविध पर्याय वापरून देखील ती शांत व्हायची नाही.
एकदा अक्षरनंदन शाळेच्या विद्याताई पटवर्धन आनंदघरच काम बघायला आल्या, त्यावेळी त्यांना
काही मुलांच्या खूप रडण्याबद्दल सांगितलं व बरेच "प्रयत्न करूनही ती शांत होत
"नाहीत. त्यावर त्या म्हणाल्या, "प्रत्येक वेळी मुलांना काय त्रास होतो हे
कळेलच असं नाही. कुठून तरी मुलं दुखावलेलं असतं आणि काही वेळा त्याला फक्त रडायचं असतं
आणि आपण त्याच्याजवळ थांबणं एवढंच पुरेसं असतं." विद्याताईंच्या या सल्ल्यामुळे
मला हायसं वाटलं. बालसंगोपनाच्या वाटेवर काही प्रश्न अडचणी भेडसावत होते, त्याबद्दलही
मी विद्याताईंना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, "अडचणी येत आहेत प्रश्न पडत आहेत
म्हणजे तू योग्य मार्गावर चालत आहेस". त्यांचा हा मोलाचा सल्ला आजही माझ्यासाठी
दिशादर्शक आहे.
मुलांचे
रुळणं हा फार कसोटीचा क्षण असतो. मुलांना आई हवी असते. त्यासाठी त्याचं रडणं, आकांडतांडव सुरू असतं. अशा परिस्थितीत त्यांना शांत
करून, गोष्टी, गाणी सांगून रमवण मोठंच आव्हान
असतं. यात सर्वात महत्त्वाच असतं विश्वासाचं, सुरक्षिततेच नातं तयार होणं...
अँड.
छाया गोलटगावकर
chhaya.golatgaonkar@gmail.com
No comments:
Post a Comment