आनंदघर लेख - १३ 'स्नेहसंमेलन-
भाग २'
मागच्या
लेखात म्हटल्याप्रमाणे आनंदघरातील स्नेहसंमेलन एक आनंदोत्सव आहे. आनंदघराच्या तिसऱ्या
वर्धापनदिनानिमित्त (डिसेम्बर, २0१८ ) कार्यक्रम आयोजित केला गेला. या कार्यक्रमाची
आखणी व नियोजन एक महिन्यापूर्वीच झालं. यावेळच्या कार्यक्रमात एक वेगळा प्रयोग करून
बघितला. आनंदघरी वर्षभर ऐश्वर्या ताई संगीत शिक्षक म्हणून येत होती. तिने मुलांना सप्तसुरांची
ओळख व बडबड गीतं हार्मोनियम वर शिकवली.
शिकण्यातील
मजा निराळीच होती. प्रत्यक्ष सादरीकरणाच्या वेळी छोट्या छोट्या मुलांच्या हातात (वय
वर्ष चार ते सात) गाणं म्हणण्यासाठी माईक दिला होता. परंतु मुलं गाणं म्हणता म्हणता
माईक सोबत खेळत होती. त्यामुळे त्यांचा आवाज कमी जास्त होत होता, तर काही वेळा ते ओरडतही
होते. हे जरा अनपेक्षित होतं. त्यांची ही दंगामस्ती
आणि आमचा उडालेला गोंधळ पाहुण्यांच्या आणि प्रेक्षकांच्या डोळ्यात कौतुक, हसू असा सगळा
हा कार्यक्रम झाला. त्यावेळी लक्षात आलं मुलांची माईकवर प्रॅक्टिस घ्यायला हवी होती.
प्रॅक्टिस म्हणजे मुलांना माईक खेळायला द्यायला हवा होता. या कार्यक्रमात मुलांचं नृत्यही
थोडं वेगळं होतं. 'कष्टकरी मुंग्यांची गोष्ट' आधी एका पालकाने सांगितली आणि मग त्या
गाण्यावर मुलांनी सुंदर नाच केला. आजी पालकांनी मुलांसाठी सुंदर गाणी गायली. कार्यक्रमाला
तर पणजीही आलेली.
कार्यक्रमात
बालचमूंनी विविध गाणी, नृत्य सादर केल. यासोबत मुलांनी भरपूर कल्ला केला, गाणी म्हणताना
माईकसोबत खेळत बसले आणि माईक जवळ-दूर करत जोरजोरात गाणी म्हणत होते, म्हणजे पुन्हा
कधी आनंदघरमध्ये कोणी पाहुणे येऊ नाही... हे सर्व तायांना अनपेक्षित होते. पूर्णवेळ सर्वांनी धुमाकूळ घातला, छोटी शुभ्रा शोभाताई बोलत असताना
स्टेजवर जाऊन हात उंचावून प्रेक्षकांना हॅलो" म्हणत होती ।
काही बाकी ठेवलं नाही पोरांनी... बरं मनात काही भीती, संकोच काही नाही... मुलांचं विश्व निराळं असतं, कार्यक्रम आहे, असंच सादरीकरण व्हायला हवं असं काही त्यांच्या मनात नसतं बहुदा...
या वेळच्या कार्यक्रमात मुलांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहम सात वर्षे व साहिल अकरा वर्षे वयाच्या दोन मुलांकडेच दिलं.
स्नेहसंमेलनाच्या
प्रास्ताविकात आनंदघराची संकल्पना, त्याची सुरुवात, शिबिर, उपक्रम, आऊट रिच प्रोग्राम,
बाहेरील संस्थांचे आमंत्रण, व्याख्यान,अहवाल, विशेषांक, कॉन्फरन्स, आनंद घरच्या कामाविषयी
पेपर प्रेझेंटेशन, यासोबतच आनंदघरची भविष्यकाळतील वाटचाल, आनंदघरचे सार्वत्रिकीकरण,
या कामात येणाऱ्या अडचणी, आव्हानं याबाबत संवाद साधला.
आनंदघरची काही उद्दिष्ट सांगताना त्यांनी तीन मुख्य
मुद्दे मांडले-
१-गुणवत्तापूर्ण
बालसंगोपन प्रत्येक मुलाचा हक्क आहे.
२-कुटुंब
समाजासाठी एक सशक्त सपोर्टिंग सिस्टम उभी राहावी.
३-भावनिक
स्थिरता शिकण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग आहे.
आनंदघरच्या
कामाचा भाग म्हणून आनंदघर बाहेर जाऊन आणखी काही काम केली आहेत. यात प्रामुख्याने मुलांच्या
हक्कांवर व्याख्यान व गप्पा, पालकनीती या मासिकाचा पाळणाघर विशेषांक -त्यात दोन लेख
लिहिले, एक लेख पाळणाघर व कायदा याविषयाची मांडणी करणारा आहे. तसेच, बाबा आमटेंच्या
आनंदवनात राहुन तेथील शिक्षणविषयक अभ्यास, चर्चा करून एक अहवाल सादर केला आहे. फिनलंड
या युरोपीय देशात अभ्यास दौरा पूर्ण करून तेथील कॉन्फरन्समध्ये आनंदघर विषयी आणि क्रिएटीव्ह
एज्युकेशन यावर प्रेझेंटेशन केले.
पुढची वाटचाल- गुणवत्तापूर्ण बालसंगोपन केंद्राच सार्वत्रिकीकरण व पालक शिक्षक तसेच मुलांसोबत काम करणारे सर्व यांचं सातत्यपूर्ण प्रशिक्षण आवश्यक आहे, त्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारणं आवश्यक आहे.
बालसंगोपन आणि शिक्षण समजून घेण्यासाठी, पालक-शिक्षक संवादासाठी या विषयाचा अभ्यास असणाऱ्या दोन तज्ञ मंडळींना आमंत्रित केलं.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, गरवारे बालभवनच्या
माजी संचालक, 30 वर्षांहून अधिक काळ मुलांसोबत कार्यरत शोभाताई भागवत यांनी "मुलांशी
मैत्री" या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी एक छान मंत्र दिला.
दूध-तूप-शिरा-मासा
म्हणजे
मुलांकडे
दुर्लक्ष नको,
मुलांना
धमक्या नको,
मुलांमध्ये
तुलना नको,
मुलांच्या
अपरोक्ष, परस्पर गोष्टी ठरवण नको,
मुलांवर
शिक्का मारणं नको,
रागावण
नको,
मारणं
नको,
आणि
उगाच सांत्वन नको
असा
हा मुलांशी मैत्रीचा उत्तम मंत्र त्यांनी सर्वांना दिला. त्याबरोबरच गिजुभाई बधेका
यांच्या दिवास्वप्न या पुस्तकातील एक महत्वपूर्ण भाग सांगितला. मुलांसाठी तुम्हाला
काही करायचंच असेल तर दोन गोष्टी करा-
१-
त्यांना मारू नका,
२- त्यांचा अपमान करू नका. याशिवाय मुलांशी मैत्री करताना तू मला आवडतोस किंवा आवडतेस असं व्यक्त होण, त्यांचं कौतुक करण, त्यांचा आपल्यावर आणि आपल्या त्यांच्यावर विश्वास असणं, त्यांचं मत विचारण, आपलं चुकल्यावर त्यांना सॉरी म्हणण या गोष्टी मुलांशी मैत्री करताना महत्त्वाच्या असतात असे त्यांनी विविध उदाहरण देऊन सांगितलं.
कार्यक्रमाच्या आणखी एक प्रमुख पाहुण्या नीलांबरी ताई जोशी, प्रसिद्ध लेखिका यांनी केन रोबिन्सन यांच्या एका गोष्टीपासून पर्यायी शिक्षण या विषयावर बोलायला सुरुवात केली. शाळेने जिथे एका मुलीला नापास ठरविले, तीच मुलगी पुढे उत्कृष्ट बॅले डान्सर बनली, स्वतःचा ग्रुप बनवून देश-विदेशात कार्यक्रम सादर करते. प्रचलित शिक्षण पद्धतीत या वेगळ्या बुद्धिमत्तेला स्थान नाही म्हणून पर्यायी शिक्षणाची गरज व महत्व निर्माण झाले आहे. नॅशनल ग्रॉस हॅप्पीनेस चा थेट संबंध मुलांना हवं ते शिकण्याची मुभा देण्यात आहे. तसेच हॉवर्ड गार्डनर च्या बहुविध बुद्धिमत्तेविषयी त्यांनी सांगितले. हल्ली मुलांमध्ये स्मार्टफोन, सोशल मीडिया फेसबूक, सेल्फी, जंक फूड अशी विविध व्यसन दिसून येत आहे आणि त्यामुळे येणार डिप्रेशन मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच हवं ते मिळालं की मानसिक आजार जडणार नाही असं त्यांनी सांगितलं. शेवटी युवा हरारी यांनी लिहिलेल्या तीन पुस्तकांचा त्यांनी उल्लेख केला. होमो सेपियन, होमो डेअस, ट्वेंटी वन लेसन्स फॉर ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी. यात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर भाष्य केलं आहे. कामाचं स्वरूप, जॉब बदलण्याची सवय, अनिश्चितता, बदलत्या काळात वाढत जाईल. अशा काळात मुलांना काय शिकवण आवश्यक आहे, तर इमोशनल इंटेलिजन्स, चिकाटी आणि माणसाने माणसांसोबत संवाद साधण्याची गरज ही शिकवण आवश्यक आहे असं त्या म्हणाल्या. मानसिक आजारावर 'मनकल्लोळ' या नावाने त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. ते पुस्तक वाचून ज्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया आल्या त्यातूनही त्यांना संवाद साधण, हीच आजची मुख्य गरज आहे असं जाणवलं.
असा
संवाद पालक-शिक्षक सर्वांनाच समृद्ध करणारा असतो...
अँड
छाया गोलटगावकर
chhaya.golatgaonkar@gmail.com
No comments:
Post a Comment