आनंदघर लेख - २३ ' फिनलंड (युरोप) अभ्यास दौरा...भाग - २'
फिनलंडच्या
शिक्षण पद्धतीची ओळख साधारणतः 2011 पासून आहे. 2006 मध्ये PISA च्या सर्वे मध्ये फिनलंड
ची शिक्षण पद्धती जगात सर्वोत्तम ठरली. त्याविषयीचे लेख वर्तमानपत्रात वाचले. सर्वांसाठी
तो उत्सुकतेचा विषय ठरला. 2011 साली विविध लेखांतून, चर्चेतून भेटलेली फिनलंडची शिक्षण
पद्धती आता मी प्रत्यक्ष अनुभवणार होते, त्यामुळे तेव्हाच्या चर्चा, महत्त्वाचे मुद्दे
माझ्या मेंदूमध्ये फेर धरून नाचू लागल्या. भारतीय शिक्षण पद्धतीचा अभ्यास आणि त्याबरोबर
इतर देशातील शिक्षण पद्धतींचा अभ्यास, चर्चा त्यावेळी झाल्या. याविषयी आणखी सविस्तर या लेखाच्या कक्षेत येत नाही. परंतु फिनलंड
आणि भारत यांच्या तौलानिक अभ्यासाचे मुद्दे जरूर मांडता येतील.
फिनलंड
अभ्यासदौरा सीसीई- कौन्सिल फोर क्रिएटिव एज्युकेशन- तांपेरे, फिनलंड, या संस्थेने आयोजित
केला होता. फिनलंडला पोहोचल्यानंतर त्यांच्या वेळापत्रकानुसार विविध भेटी, शाळा भेटी
ठरलेल्या होत्या.
जवळपास 22 देशातील शिक्षक, शिक्षण विषयाचे अभ्यासक, शिक्षण विषयी आस्था असणारे या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते. या एका मोठ्या गटाचे छोटे छोटे गट करून विविध शाळा भेटी आयोजित केल्या होत्या.
मी
ज्या गटात होते त्या गटासाठी एका डे केअर सेंटरला (पाळणाघर) भेट देणं ठरविलं होत. प्रत्येक
गटातसोबत सीसीई चे प्रशिक्षित शिक्षक होते. ते आम्हाला माहिती देत होते.
फिनलंडमध्ये
7 वर्षांपर्यंतचं मुलं शाळेत जात नाही. मग प्रश्न पडला की मूल शाळेत जात नाही तर नेमकं
काय करतं? कुठे जातं? हे समजून घेण्यासाठी तिथल्या एका डे केअर सेंटरला भेट देणं आयोजित
केलं गेलं. फिनलंडमधील शैक्षणिक विचारानुसार सात वर्षांपर्यंतचं मूल मुक्तपणे खेळू
शकेल आणि त्यातूनच त्याचं शिक्षण होईल अशी व्यवस्था निर्माण केली आहे. त्यामुळे ६ वर्षांपर्यंतच
शिक्षण हे इन्फॉर्मल शिक्षण आहे, व ६ ते ७ एक वर्ष मूल पूर्वप्राथमिकच शिक्षण घेतं.
शिवाय तिथे मातृभाषेतून शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. आम्ही तांपेरेमधल्या एका
डे केअरला पोहोचलो. डे केअर सेंटर चा भव्य, प्रशस्त, स्वच्छ, सुंदर परिसर पाहून मन
अगदी आनंदून गेलं. त्या केंद्राच्या प्रमुख समोर आल्या, त्यांनी अभिवादन केलं. तो नोव्हेंबरचा
महिना, त्यावेळी तिथे प्रचंड थंडी आणि थोडा पाऊसही होता. तिथलं तापमान 0 ते 5 डिग्री
सेल्सिअस. त्यामुळे सर्वजण डोक्यापासून पायापर्यंत पॅक. आत गेल्या गेल्या आम्ही तिथली एक छान व्यवस्था
बघितली. थंडीमुळे पायातुन बूट काढणं अवघड होतं आणि डे-केअर मध्ये तर स्वच्छतेच्या कारणास्तव
बाहेरचे बूट घालून फिरणं योग्यच नाही. त्यासाठी तिथे प्लास्टीकच्या अशा बॅग होत्या
ज्या तुम्ही शूज वरून घालायच्या आणि मगच आत जायचं. हा फारच छान पर्याय होता. शूज काढायची
गरज नाही आणि डे केअरही खराब होणार नाही. डे केअरची संपूर्ण रचना फार सुंदर होती. गेस्टरूम,
मिटिंग रूम, वॉशरूम, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज च्या वेगवेगळ्या खोल्या, दोन वर्षांच्या
आतील मुलांसाठी वेगळा भाग, स्वयंपाकघर, जेवणाची जागा, मुलांचे कपडे धुऊन वळवण्यासाठीचे
मशीन, जॅकेट्स, शूज व्यवस्थित ठेवायच्या जागा. अत्यंत बारकाईने छोट्या-मोठ्या सगळ्या
गोष्टींचा विचार करून (Day care) डे केअरची रचना केली होती. डे-केअरच्या बाहेरचं अंगण,
खेळण्याची जागा आतल्या, बांधलेल्या इमारतीपेक्षा ३ ते ४ पट मोठी होती. बाहेर विविध
खेळणी मांडली होती. काही मुलं बाहेर खेळत होती. तापमान होतं, 0 ते 5 अंश सेल्सिअस.
थोडासा पाऊसही होता. त्या ओल्या वाळूतही छोटी छोटी मुलं पूर्ण पॅक होऊन (जॅकेट, कानटोपी,
ग्लोज, शूज) खेळत होती. मला खूप आश्चर्य वाटलं. एवढी लहान मुलं रिमझिम पावसात, प्रचंड
थंडीत बाहेर वाळू खेळत होती. त्या थंडीत मोठ्यांनाही बाहेर जावं वाटत नव्हतं. आमच्या
गटातून फक्त मीच बाहेर जाऊन त्या मुलांचं खेळणं बघत होते. मुलांचं घसरगुंडी खेळणं,
टायर खेळणं, वाळू भांड्यांमध्ये भरणं असे मस्त खेळ चालू होतं. त्या बोचऱ्या थंडीतही
गुलाबी गोंडस मुलं बघणं मजेशीर होतं. कदाचित या मुलांसाठी हे वातावरण सवयीचं होतं.
त्या त्या भागातील वातावरण, परिस्थिती मानवी शरीर छान स्वीकारत.
एका
गोष्टीचं खूप छान वाटलं की जगातलं कुठलंही मुल वाळू, माती, पाणी खेळून प्रचंड आनंदी
असतं. डे-केअरच्या आत मुलांनी काढलेली विविध चित्र लावली होती. त्यावरून लक्षात येत
होतं की मुलं रंगांशीही भरपूर खेळतात. याशिवाय एका मोठ्या स्क्रीनवर काही मुलं चित्र
काढत होती. मुलांची झोपण्याची खोलीही छान होती, तिथे एखादं हलकसं संगीत आणि जवळ बसलेले
शिक्षक अशा छान वातावरणात मुलं झोपत होती. स्वयंपाक घर छान होतं, स्वच्छ, नीटनेटकं,
तिथले पदार्थही पौष्टीक! आम्हीही तिथले चविष्ट पदार्थ चाखले. आमच्यासोबत सीसीई ची शिक्षक
होती तिने व डे-केअरच्या प्रमुख यांनी एका प्रेझेन्टेशन द्वारे तिथली छान माहिती दिली.
त्या डे-केअरची जागा इमारत, इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व शिक्षक, कर्मचारी यांचे पगार अशी
सर्व जबाबदारी तांपेरे शहराच्या म्युनिसिपलटीने उचलली होती. डे-केअर ला येणाऱ्या मुलांची
फीसुद्धा एक सारखी नव्हती. कुटुंबाचे उत्पन्न आणि कुटुंब किती लहान-मोठे आहे यानुसार
त्यांची फी बदलते. जे पालक फी देऊ शकत नाही, त्यांच्यासाठी फी कमी केली जाते. तिथे
काम करणारे शिक्षक उच्चशिक्षित होते, उच्चशिक्षण असल्याशिवाय ती नोकरी मिळतच नाही.
तिथल्या शिक्षकांना (डे-केअर, शाळेच्या) खूप जास्त पगार आहे. ही तिथली शिक्षण पद्धती
चांगली असण्याचं मोठं वैशिष्ट्य आहे.
सात
वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी ECEC- ईसीईसी-
अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन अँड केअर ,अँड प्री प्रायमरी एज्युकेशन हा कार्यक्रम राबवला
जातो. ६ ते ७ वयोगटाला पूर्व-प्राथमिक शिक्षण दिलं जातं. प्रत्येक मुलासाठी आणि कुटुंबासाठी
ईसीईसी कार्यक्रम आणि सपोर्ट सिस्टीम राबवली जाते. मग ते मुलं कुठलंही असो, निम्न आर्थिक
स्तरातील असलं तरी त्याला हा हक्क मिळतो.
तिथलं
शिक्षण खातं, शासन-प्रशासन, स्थानिक संस्था एकत्रितपणे ईसीईसी कार्यक्रम राबविण्यासाठी
कार्यरत आहेत.
शिक्षक
व मदतनीस यांचं प्रमाणही (स्टाफ रेशो)उत्तम आहे. ३ वर्षाच्या पुढील २४ मुलांसाठी
एक
टीचर : दोन मदतनीस,
३
वर्षाखालील १२ मुलांसाठी
दोन
टीचर : दोन मदतनीस.
ईसीईसी
हा कार्यक्रम डे-केअर सेंटर मध्ये राबवला जातो.
ईसीईसी
शिक्षक किमान ईसीईसीमधील पदवीधारक किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेली असणं अनिवार्य आहे.
मदतनीससुद्धा ECE-ईसीई चा तीन वर्षांचा कोर्स पूर्ण केलेला असणं अनिवार्य आहे. शिक्षक,
मदतनीस नियुक्तीआधी त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड तपासला जातो आणि त्यांच्यासोबत व्यवसायिक
करारही केला जातो. ७ वर्षांपर्यंतच्या या वयोगटासाठी एक निश्चित अभ्यासक्रमही आहे.
त्यात मुलांचं कौशल्य, विचार, सहभाग, इतरांशी संवाद, वाढ आणि विकास, भाषाविकास, आनंदाने
शिकणं, पर्यावरणाशी नातं, माझा परिसर इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. आणि यानुसार वैविध्यपूर्ण
ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात. खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या खेळातूनच मूल कसं
शिकेल यावर भर दिला जातो.
'Play is the highest form of research'
- Albert Einstein
या
तत्वाचं पालन ते करत आहे.
प्रत्येक
मूल वेगळं आहे, प्रत्येक मूल आपापल्या गतीनं शिकतं, प्रत्येक मुलाच्या वेगवेगळ्या क्षमता
आहेत; यावर विश्वास ठेवून ७ वर्षांपर्यंतच्या मुलाची काळजी आणि शिक्षण घेतलं जातं.
ईसीईसी कार्यक्रमांतर्गत कुटुंबासाठी सपोर्टिंग सिस्टीम कार्यरत असते, ती बाळाच्या
जन्मापासून कार्यरत असते. दवाखान्यात डॉक्टर, नर्स, सायकॉलॉजिस्ट, प्री- प्रायमरी टीचर
यासोबतच स्पेशल एज्युकेशन टीचर, स्पीच थेरपिस्ट इत्यादी सपोर्टिंगसाठी असतात.
अगदी
सजरुवातीपासून काळजी घेणारी पूर्ण व्यवस्था कार्यरत आहे.अशा प्रकारे ७ वर्षांपर्यंतच्या
मुलाच्या वाढीचा व विकासाचा सर्वांगीण विचार करून व विविध तज्ञांच्या मदतीने, बालमानसशास्त्राच्या
व इतर शास्त्रांच्या आधारे मुलांचं ७ वर्षांपर्यंतचं शिक्षण पूर्ण होतं. इतकं अभ्यासपूर्ण,
गुणवत्तापूर्ण काम असेल तर उत्तम बालसंगोपन आणि शिक्षण होणारच की...
डे-केअर सेंटरच्या प्रमुख व इतर कर्मचाऱ्यांनी, सर्वांनीच छान आदरतिथ्य केलं, माहिती दिली.
हे सर्व बघताना मी मनोमन आनंदून गेले यातल्या कितीतरी गोष्टी आनंदघरी सुरूवातीपासून केल्यात. त्याच बरोबर आणखीन नवीन काहीतरी करता येऊ शकतं, याचा तर मोठा खजिनाच मला मिळाला.
आनंदघर-
बालसंगोपन केंद्र, लर्निंग अँड रिसर्च सेंटर, चालवताना काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न
माझ्यासमोर उभे ठाकले! त्याविषयीचे विचारही मनात कित्येक दिवस घोळत होते. त्यालाच जोडून
फिनलँडचं डे-केअर माझ्या समोर होतं. इथे बघितलेल्या कित्येक मुद्द्यांबाबत मी स्वतः
आग्रही होते आणि आहे.
उदाहरणार्थ----
१)
मोठी जागा असणं.
२)
व्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर असणं.
३)
त्या जागेला मोठं अंगण असणं.
४)
ती जागा स्वच्छ, सुंदर व सुरक्षित असणं.
५)
त्या जागेत मुलं मुक्तपणे वाळू, माती, पाणी इत्यादी खेळ खेळू शकणं.
६)
मुलांसोबत काम करणारे शिक्षक, मदतनीस यांचा बालविकास व बालमानसशास्त्र याचा अभ्यास
असणं. त्यासोबतच त्यांना व्यवस्थित पगार असणं.
७)
जागेचा प्रश्न, जागेचा इन्फ्रास्ट्रक्चर, मेन्टेनन्स, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचे पगार
या जबाबदाऱ्या शासन-प्रशासनावर असणं.
८)
खेळातून मुलांचं सहज शिक्षण होणं. तसं वेळापत्रक, उपक्रम याचं नियोजन असणं.
९)
किमान सहा वर्षांपर्यंतच्या मुलांना भरपूर मोकळीक असणं, या वयाच्या मुलांसाठी वयोगटानुसार
गाणी, गप्पा, गोष्टींवर भर असणं.
१०)
सर्वात महत्त्वाचं मुलांचे निरीक्षण, नोंदी त्यानुसार पालकांशी बोलणं.
११)पालक-शिक्षक-समाज
सर्वजण मिळून गुणवत्तापूर्ण बालसंगोपनसाठी आग्रही असणं.
१२)
केवळ मुलांसाठीच नाही तर कुटुंबासाठी व समाजासाठी एक सशक्त सपोर्टिंग सिस्टीम म्हणून
आनंदघरसारखे आणखीन बाल संगोपन केंद्र असणं.
फिनलंडचं
डे-केअर सेंटर बघताना आनंदघरचं काम क्षणार्धात चमकून गेलं. एक तर योग्य मार्गावर आपण
वाटचाल करत आहोत याची खात्री पटली आणि आणखीन काय काय करता येईल याचीही यादी तयार झाली.
मला माझ्या मैत्रिणीचं, शिरीन कुलकर्णीचं कौतुक वाटलं. आनंदघरचं काम बघून, समजून तिनं
आमंत्रित केलं. इतकंच नव्हे, तर शाळा भेटींमध्ये एका शाळेबरोबरच या डे-केअर साठी पण
तिनं माझं नाव दिलं. हे तिनच ठरवून टाकलं, त्यामुळे तिथल्या शिक्षणपद्धतीचा पाया छान
समजून घेता आला.
पुढच्या
टप्प्यात शाळा भेटीसाठी तांपेरेच्या एका शाळेत गेलो. तिथल्या शिक्षकांनीही आमच्या गटाचे
छान स्वागत केले. शाळेविषयी माहिती दिली आणि शाळेतल्या मुलांपैकी दोन मुलांना आमच्यासोबत
शाळा दाखवण्यासाठी, माहिती देण्यासाठी पाठवलं. हाही त्यांच्या शिक्षणाचा एक भाग होता.
इथेही भाषेची अडचण होतीच. फिनिश-स्वीडिश लोकांना थोडीफार इंग्रजी येते आणि इतरांना
फिनिश भाषा येत नाही. तरीही भाषेचा अडथळा पार करत समजून घेणं चालू होतं.
७ ते १५ वर्ष या वयोगटासाठी सक्तीचे व अनिवार्य शिक्षण आहे. हे मुलभूत शिक्षण आहे. यामध्ये मुलं वेगवेगळे काम करत शिकत असतात. म्हणजे त्या शाळेतील मी वेगवेगळे भाग बघत होते त्यात सुतारकाम, विणकाम, शिवणकाम, मातीकाम, स्वयंपाकघरातील कामं अशा विविध भागांमध्ये मुलांचं काम आणि शिक्षण चालू होतं. शाळेमध्ये मुलांनी विविध माध्यम वापरून उत्कृष्ट चित्र काढली होती आणि ती शाळेत लावली होती. पंचेचाळीस मिनिटांचा तास झाला की पंधरा मिनिटा खेळणं. कदाचित यामुळे मुलांना अभ्यासाचा कंटाळा येत नसावा. आणि अभ्यासदेखील काम करत शिकणं. या मूलभूत शिक्षणानंतर यापुढे हवा तो विषय मुलं निवडू शकतात. त्यात काही अडचण येत नाही. वेगळा विषय जरी घ्यायचा असला तरी पुन्हा त्यासाठी प्राथमिक ज्ञान लागत नाही कारण सक्तीच्या शिक्षणात ते झालेलं असतं. संपूर्ण शिक्षण मोफत आहे आणि मूलभूत शिक्षण ७ ते १५ या वयोगटात कौशल्याधारित शिक्षण आहे. अशा शिक्षणाचा उद्देश हाच की मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा. सर्वांना पुढच्या आयुष्यात आवडीचं काम मिळावं. ज्यांना उच्च-शिक्षण घ्यायचं त्यांना ते घेता यावं. या शिक्षण पद्धतीत मातृभाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यापीठातलं शिक्षण मातृभाषेत घेता येतं. CCE च्याच एक शिक्षक -श्रद्धा ज्या मूळ भारतीय आहेत, त्यांनी फिनिश लोकांच्या मातृभाषा प्रेमाविषयीचा एक किस्सा सांगितला. या शिक्षिकेचं मूलं चार वर्षांचं व ते हिंदी भाषिक आहे. पालकसभेत त्यांच्यासाठी ट्रान्सलेटर मिळतो, तर या शिक्षिकेनं सांगितलं की आम्हाला इंग्रजी समजतं, काही अडचण नाही, परंतु शाळेने सांगितलं, तुमच्या मातृभाषेत तुमच्या मुलाविषयी जे आम्ही सांगणार आहोत त्याचा तुम्हाला फील येईल. त्यामुळे तुम्ही भावनिकरित्या जोडले जाल. इतका सुंदर विचार, मलाही आश्चर्य वाटलं, स्वतःच्याच नाही तर इतरांच्याही मातृभाषेविषयी एवढं प्रेम, आदर क्वचितच कुठे बघायला मिळतं. शाळेची भिस्त, उत्तम काम उभं आहे ते शिक्षकांवर... त्यामुळे शाळेसाठी शिक्षक निवड प्रक्रिया ही थोडी कठीण असते. महत्वाचं म्हणजे शिक्षक संशोधन करणारा असावा लागतो. शिक्षकांना स्वातंत्र्यही भरपूर आहे व पगारही भरपूर आहे. शाळेत मुलांसाठी पौष्टिक जेवण दिलं जातं. मुलांच्या वाढीस व विकासासाठी पोषक असा आहार असतो. ही शाळा बघितल्यानंतर मला भारतातील, महाराष्ट्रातील पाबळच विज्ञानाश्रम, सृजनानंद विद्यालय कोल्हापूर, ग्राममंगल, अक्षरनंदन अशा प्रयोगशील शाळा आठवल्या. ज्यांचा माहितीपटांच्या निमित्ताने मी जवळून अभ्यास केला होता. यात एक मोठा, मूलभूत फरक होता फिनलंडचं सर्व शिक्षण मुळ अभ्यासक्रमाचा भाग, मुख्य प्रवाहाचा भाग आहे आणि शासन निर्णयाद्वारे तो राबविला जात आहे. ही तिथली सर्वात जमेची बाजू आहे. भारतात शिक्षणावर कामं भरपूर झालं आहे, चालू आहे परंतु, त्याचं सार्वत्रिकीकरण झालेलं नाही. थोडेफार मुद्दे उचलून मुख्य अभ्यासक्रमात आणण्याचा प्रयत्न केला आहे. असे तुकडे-तुकडे, ठिगळं लावण्यापेक्षा शिक्षणात आमूलाग्र परिवर्तनाची आवश्यकता आहे.
भारत-फिनलंड
तौलनिक अभ्यास आणि कॉन्फरन्सविषयी पुढच्या भागात.....
अँड.
छाया गोलटगावकर
chhaya.golatgaonkar@gmail.com
No comments:
Post a Comment