Friday, June 19, 2020

आनंदघर लेख - १ 'आनंदघरची शिबिरं व त्यामागचा विचार, भूमिका...'




लेख - १ 'आनंदघरची शिबिरं व त्यामागचा विचार, भूमिका...'

आनंदघर - बालसंगोपन केंद्र, लर्निंग अँड रिसर्च सेंटर, कोथरूड, पुणे तर्फे दरवर्षी वैविध्यपूर्ण शिबिरं आयोजित केली जातात. शिबिरं घेण्यामागे काही उद्देश आहे. त्यात मुलांना नवनवीन गोष्टी करून बघण्याला वाव देण, शाळा सुरू असताना जी मोकळीक, अवकाश कित्येकदा मिळत नाही, ते सुट्टीत करता यावं, नवीन गोष्टी अनुभवताना एक्सप्लोर करताना कडक नियम, शिस्त मुलांना नको असतं, त्यांना मुक्तपणे स्वतःला व्यक्त होता येण अशाप्रकारे शिबिराची रचना करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. त्यामुळे ठराविक पठडीतील क्लासेस, शिबिरात घेतले जात नाहीत. नवा विचार करणारे, सखोल अभ्यास करणारे,  मोकळा श्वास घेणारे, कलाकार (आर्टिस्ट) शिबिरं घेण्यासाठी येतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे, या प्रकारची शिबिरं घेण्यामागे आनंदघरचा काहीएक उद्देश आहे, निश्चित भूमिका आहे, त्याविषयी मांडावं म्हणून हा लेखप्रपंच....
१) सर्वप्रथम मुलांची सुट्टी त्यांची हक्काची सुट्टी आहे. 
२) त्यामुळे त्यात कडक नियम, शिस्त नको, बंधनकारक, आखीव-रेखीव चौकट नको. 
३) मुक्त स्वच्छंद व्यक्त होण्यासाठी वातावरण निर्माण करण. 
४) शिकण्याची प्रक्रिया अव्याहतपणे चालणारी प्रक्रिया आहे,  या सर्व शिबिरातही मुलं आपलं आपण भरपूर शिकत असतं, यावर विश्वास आहे. त्यामुळे आम्ही काही शिकवत नाही. 
५) क्रिटिविटी (creativity), इमॅजिनेशनला (imagination) भरपूर वावं देणं, वाव देणं म्हणजे काय तर सर्वात महत्वाचं आपण त्यांच्यात लुडबुड न करणं (no interference).
६) मुलांच्या कलाकृती ज्या व जशा असतील त्याला मोठ्यांच्या ठरलेल्या सौंदर्याच्या परिभाषेत न बसविण. 
७) मूल काय सांगू बघतय ते ऐकणं, त्याच्यावर आपलं काहीही थोपविण. 
८) मुलांना चांगल्या व्यक्ती, आर्टिस्ट कडून शिकता येण, त्यांचा सहवास मिळणं. चांगल्या व्यक्ती मुलांशी छान संवाद साधतात व शिबिराच्या विषयाव्यतिरिक्त त्यांच्या इतरही अनेक गोष्टी मुलांना समृद्ध' करतात. 
९) या सर्व प्रक्रियेत आपसूकच एक नवी दृष्टी मिळते, अशी नवी दृष्टी आयुष्याच्या विविध टप्प्यावर कायम साथ देते. 
असा विचार करून विविध शिबिरांची आखणी केली जाते.
शिक्षणतज्ञ, ज्यांनी मुलांसोबत तीस वर्षांहून अधिक काळ काम केलं आहे, वारंवार सांगतात की, रिझल्ट, प्रॉडक्ट, उत्पादनाला महत्त्व नाही, प्रक्रिया महत्त्वाची...
 खरंय, या सुंदर प्रक्रियेचा अनुभव मी शिबिरात घेत असते. निरीक्षण करताना असं लक्षात आलं की एखादं काम, कलाकृती करताना मूल विचार कसं करतं, आपले विचार, कल्पना त्या कलाकृतीमध्ये कसं उतरवत हे बघणं सुंदर आहे... 
मुलांकडे मुक्तपणा खूप असतो, म्हणजे चुकेल याची भिती नसते, असंच व्हायला हवं असा आग्रह नसतो, हे असं ठराविक म्हणजे सुंदर असे शक्यतो नसतं... प्रक्रियेअंती मुलांची जी निर्मिती असते ती तुम्हाला थक्क करणारी असते. प्रत्येक मूल वेगळा विचार कृतीत आणण्याचा सुंदर प्रयत्न करतो. कित्येक वेळा अरे या कलाकृतीत असही करता येऊ शकतो हा एकदम वेगळा व नवा विचार समोर येतो. त्यामुळेच मोठ्या व्यक्ती 'मुलांसोबत काम करणं आम्हालाच समृद्ध करतं' असं म्हणताना दिसतात. 

अशा या वैविध्यपूर्ण शिबिरांचा वृत्तान्त, त्यातल्या प्रक्रिया, गमतीजमती मी आपल्यापर्यंत "मूल कसं शिकतं..." या सदराखाली लेखरुपात पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. या शिबिरासाठी, शिबिर उत्तम व्हावं म्हणून आनंदघरची पूर्ण यंत्रणा ताया, मावशी शिबिराआधी, शिबिरात व शिबिरानंतर कार्यरत असते.


अँड. छाया गोलटगावकर
chhaya.golatgaonkar@gmail.com

No comments:

Post a Comment