आनंदघर लेख - २१ ' मुलांची
भाषा...'
मूल
समजून घेताना मुलांची भाषा समजून घेणं आवश्यक आहे.
मुलांच्या
भाषेचे कितीतरी प्रकार आहेत, छटा आहेत. त्यांचं हसणं, रडणं, रुसून बसणं, मिश्किल भाव,
चेहऱ्यावरचे हावभाव अश्या सर्व त्यांच्या भाषा आहेत. या द्वारे ते संवाद साधतात, स्वतःचं
म्हणणं इतरांपर्यंत पोचवतात. शब्द उच्चारणं, वाक्य बोलणं ही नंतरची भाषा. विविध टप्यावर
मुलांच्या भाषा समजणं हे मुलं समजून घेताना अत्यावश्यक आहे. किंबहुना त्याशिवाय मुलं
समजून घेता येणार नाही.
आनंदघरी येणाऱ्या प्रत्येक मुलाची भाषा समजून घेणं गरजेचं असतं. यातलेच काही संवाद गमतीजमती या लेखात मांडले आहेत.
मुलांच्या
विश्वातील खळबळ वेगळीच असते. ती कधीकधी आपल्या लक्षात येते तर कधी येत नाही. अगदी दीड-
दोन वर्षाचं जे मूल असतं, त्यांना काय घड्याळ माहीत नसतं म्हणजे आई-बाबांनी अमुक एक
वाजता सोडलं, मग अमुक एक वाजता घ्यायला येणार असं काही त्यांना कळत नसतं. बऱ्याचदा
काही मुलांना फारसं बोलता येत नाही एक-एक, दोन दोन शब्द बोलतात. त्यावरून समजून घेणं,
त्याचा अर्थ लावणं आवश्यक असतं. असंच एक दिड वर्षांचं मूल, त्याचे आई बाबा जेव्हा सोडून
जात, त्यानंतर विचारायचं, एका शब्दात "मम्मा"! या एका शब्दाचा अर्थ असा
'मम्मा कुठे गेली'? 'कधी येणार'? असा होता. अर्थात ही भाषा प्रत्येक मुलाची वेगवेगळी
असते, निरीक्षणाने आणि सरावाने जमू लागते.
"मम्मी
कुठे गेली?" आणि "केव्हा येणार?" याबद्दल तिला आम्ही सांगू लागलो की
"मम्मा ऑफिसमध्ये गेली आहे आणि तू वरण भात खाल्ला की मम्मा तुला घ्यायला येणार
आहे." 1 वाजता येईल ही भाषा तिला कळणार नव्हती. त्यामुळे वरण-भात खाल्ला की मम्मा येणार, असं सांगू
लागलो. हळूहळू तिची भाषा आम्हाला व तिला आमची भाषा कळू लागली.
मुलांसोबत
हा भाषेचा अभ्यास छान घडतो. मुलांचं रडणं ही पण एक भाषाच आहे. त्या रडण्याचं कारण आणि
अर्थ वेगवेगळे असतात. कधी आई बाबा सोडून जात आहेत यामुळे रडू येतं, तर कधी कोणी रागावलं,
मारलं म्हणून, कधी मुलांशी भांडण झालं म्हणून तर कधी हवं ते मिळालं नाही म्हणून, तर
कधी नुसतंच रडायचं असतं, त्याचं कारण मुलालाही सांगता येत नाही आणि कित्येकदा मोठ्यांना
पण कळत नाही. कधी भूक लागली म्हणून, तर कधी झोप आली म्हणून अशा या रडण्याची विविध कारणं
असतात, जी समजून घ्यावी लागतात.
रडण्या
प्रमाणेच रुसणं, हसणं, खेळणं, हट्ट करणं, गप्प बसणं, याच्याही वेगवेगळ्या छटा असतात
आणि या सगळ्यांची मिळून प्रत्येक मुलाची एक सुंदर भाषा तयार होते. प्रत्येक मुलाच्या
ह्या भाषेचा निरीक्षण आणि सरावाने अभ्यास करत, चाचपडत, अर्थ शोधत जाणं म्हणजेच मूल
समजावून घेणं. यात असंही नाही की तुम्हाला पूर्णपणे मूल काय म्हणतं ते कळलं असेल. शेवटी
अंदाज, ठोकताळे, निरीक्षण, सराव याचा वापर करतच तुमच्या हाती ती भाषा येते. अशी प्रत्येक
मुलाची भाषा समजून घेणं आव्हानात्मक असलं, तरी गरजेचं आहे.
एक
मूल आनंदघरी यायचं. त्याचं नाव निषाद. दोन वर्षाचं मूल, जेमतेम काही शब्द उच्चारायचा.
त्याची भाषा हिंदी, त्याच त्या शब्दांचा अर्थ मात्र वेगळा होता. म्हणजे पाणी हवं असेल,
जेवण हवं असेल, खेळणी हवी असेल, शू-शी ला जायचं असेल तरी शब्द एकच होता. चेहऱ्यावरील
भाव आणि तो शब्द असं सगळे एकत्र मिळून त्याचा अर्थ लावून मूल काय म्हणतंय ते कळतं.
ही भाषा समजून घेण्यासाठी वेळ मात्र भरपूर द्यावा लागतो. काहीवेळा घाईगडबडीत ही भाषा
समजून घेतली जात नाही. ती समजून घ्यायला तो वेळ द्यावा लागतो, तो वेळ आणि संयम मोठ्या
माणसांकडे नसतो. मुलं आपापल्या परीने मोठ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. या
प्रयत्नात सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे कमी शब्द असतात, (साधारण) दोन वर्षाचं मूल
काही वाक्य बोलता यायला लागतात, (साधारण) तीन वर्षाचं मूल आपलं म्हणणं मांडण्यासाठी
योग्य शब्द शोधण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे मुलांच्या बोलण्यात pause येतात, त्यांचं
बोलणं लांबतं आणि असं हे लांबलचक बोलणं ऐकण्यासाठी संयम हवा. कदाचित काहीवेळा नाही
जमणार. परंतु जास्त वेळा आपण मुलांचं म्हणणं ऐकत नसू तर अशी शक्यता आहे की मुलं हळूहळू
तुमच्याशी बोलणं, संवाद साधणं कमी करेल किंवा बंदही करेल.
आनंदघरी
एक मूल येत होतं चार वर्षांचं, त्याचा शब्दसंग्रहही चांगला होता. परंतु त्या त्या वेळी
बोलताना योग्य शब्द आठवून बोलायला खूप वेळ लागायचा. अशा मुलांसोबत जर आपण बोलण्याची
घाई केली किंवा दुर्लक्ष केलं तर ते मूल हळूहळू
बोलणं बंद करतं. कित्येकदा मोठी माणसं कामाच्या गडबडीत कळत-नकळतपणे मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात, परिणामी मुलांचं बोलणं
कमी होतं. यानंतर महत्त्वाच्या गोष्टीही मुलं शेअर करत नाही. त्यामुळे त्यांच्या मनोविश्वातल्या गोष्टी मग आपल्याला कळत
नाहीत.
असं
होणं अजिबात चांगलं नाही.
हाच
pattern कायम राहिला तर मूल मोठं झाल्यावरही
तुमच्या सोबत काही गोष्टी शेअर करणार नाही आणि त्यावेळी मग मोठ्या माणसांना असं वाटायला
लागतं की मुलं आमच्याशी मोकळेपणाने बोलत नाहीत, ऐकत नाही. म्हणूनच लहानपणापासून मुलांशी
आपला संवाद असणं,(मुलांचा असतोच!) महत्वाचं गरजेचं आहे. आणि हा संवाद उत्तम होण्यासाठी
मोठ्या माणसांचे कान ऐकणारे हवेत. त्यामुळे काही बाबींची काळजी घ्यायला हवी. मूल ज्या
भाषेत, ज्या पद्धतीने व्यक्त होत आहे तसं त्याला व्यक्त होऊ देणं. मुलांचं संपूर्ण
बोलणं ऐकणं, त्यांना मध्येच न थांबवणं त्यांचं सांगून झाल्यावर मग आपण बोलणं, अत्यावश्यक
आहे.
अँड.
छाया गोलटगावकर
chhaya.golatgaonkar@gmail.com
No comments:
Post a Comment