आनंदघर लेख - १६ 'डोळ्यांतील
कुतूहल...'
दोन
वर्षांचा शौर्य आईबरोबर आनंदघरी आला. आनंदघराविषयी जाणून घेण्यासाठी त्या आल्या होत्या.
शौर्यबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की तो मला सोडून कुठेच जात नाही. शाळेच्या आधी
त्याला थोडी सवय व्हावी म्हणून इथे आले आहे. आनंदघरच्या मावशींनी शौर्यला खेळायला खेळणी
दिली. थोड्याच वेळात तो मावशी सोबत अंगणात खेळायला गेला. आमचं बोलणं झाल्यानंतर जेव्हा
त्याची आई शौर्याला घरी चल म्हणून लागली तेव्हा त्यांच्यासोबत घरी जायला तो तयार नव्हता.
त्याच्या आईला खूप आश्चर्य वाटलं. आईला चिकटून असणारा मुलगा, घरी जायला तयार नव्हता!
माझ्यासाठीही हा सुखद अनुभव होता. आनंदघरच्या वातावरण पहिल्यांदाच आलेल्या मुलांसाठी, पालकांसाठी सुरक्षित वाटणं, आनंदघरच्या टीमसाठी मोठी पावती होती. यावरून हे ही जाणवलं की मुलांना मोकळी व भरपूर जागा खेळायला असणं किती महत्वाचं आहे! त्यासोबत खेळण्याची मोकळीक असणं त्यांच्या सर्वांगीण विकासास पोषक आहे. आणि अत्यंत महत्वाचं, कुणीही रागावणारं, ओरडणारं, मारणारं, भरमसाठ सूचना करणारं, मध्ये मध्ये लुडबुड करणारं नसेल तर ते आणखी मुक्तपणे, स्वच्छंदी बागडतात. त्यांच्या डोळ्यात अजब कुतूहल असतं...
प्रत्येक
मुलाचं काही विशेष असतं. तसंच शौर्यच पण होतं. आनंदघरच्या शेजारच्या घरात पाण्याची
टाकी ओव्हरफ्लो झाली की तिसऱ्या मजल्यावरून नळाने धो-धो पाणी खाली पडते. खालच्या झाडांना
पाणी मिळते. ते पाणी पडताना बघणं आणि त्याचा आवाज शौर्याचा जिव्हाळ्याचा विषय होता.
तो कुठेही असला, आनंदघरात कुठल्या कामात मग्न असला, तरी पाण्याचा आवाज आला की धावत
यायचा व त्या पडणाऱ्या पाण्याचे निरीक्षण अगदी तल्लीनतेन करायचा. मग ते पाणी किती उंचावरून
पडतंय? कसं पडतय? कुठे पडतय? तिथून कुठे जातय? त्याचा आवाज कसा होतोय? तुषार कसे अंगावर
येतात अशा सर्व गोष्टी त्याच्या निरीक्षणाचा भाग असे. अर्थातच त्याच्याशी बोलल्यानंतरचं
मला हे कळलेलं. याहीपेक्षा जास्त त्याचं निरीक्षण असू शकतं परंतु मला एवढेच मुद्दे
लक्षात आले. आनंदघरात काहीही चालू असलं तरी या पाण्याचा आवाज त्याला अचूक ओळखू येत
असे, तो जिथे असेल तिथून धावत ते पाणी बघायला यायचा. निरागस कुतूहलाने भरलेला, आश्चर्याने
भरलेला चेहरा आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. तो पाण्याचे निरीक्षण करताना मी त्याचं निरीक्षण
करायचे. मला प्रश्न पडायचा की रोज तितक्याच उत्कंठेने धावत ते पाणी बघण्यात काय मौज
आहे! अर्थात मला ते आजही समजू शकले नाही की त्याला त्यातून काय मिळायचं. रोज तेवढाच
उत्साह आणि कुतूहल होतं, चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहायचा. तो पाण्याचं निरीक्षण
करायचा आणि मी त्याचं! ते पाणी संपेपर्यंत तो तिथेच थांबायचा. सुरुवातीला त्याला पाणी
हा शब्दही म्हणता यायचं नाही, मम्मम म्हणायचा.
असंच
एक आणखीन आकर्षण त्याला होतं. ते कचऱ्याच्या गाडीचं! कचऱ्याची गाडी आली की त्या आवाजाने
तो धावत जायचा, आनंदाने नाचायचा आणि ती गाडी जाई पर्यंत तिथेच थांबलेला असायचा. मग
आनंदघरच्या मावशी, इतर शेजारचे लोक त्यांनी कचरा देणं, त्या घंटागाडीच्या लोकांनी कचरा
घेणं, मग ते कसा घेतात, काय करतात असं शांतपणे बघणं अगदी गाडी जाईपर्यंत बघणं हा सुद्धा
रोजचा नियम होता. त्यातून सुद्धा त्याला काय
मजा यायची, केवढा आनंद मिळत होता...
शौर्याला चित्र काढणं फारसं आवडत नव्हतं मात्र पुस्तक चाळायला खुप आवडायचं. हाही रोजचा कार्यक्रम! विशेषतः वाहनांची पुस्तक तो बराच वेळ बघत बसायचा. ताई, मावशी पुस्तकातल्या गोष्टी सांगायच्या. परंतु त्या व्यतिरिक्तही पुस्तक चाळणं त्यात बराच वेळ रमणं हे नित्याचं होतं.
एक
वर्ष शौर्य आनंदघर मध्ये होता. पुढे शाळेत जाऊ लागला.
एक
दिवस शौर्याच्या आईचा फोन आला, त्यांच्या आवाजावरूनच जाणवत होतं की त्या खूप आनंदी
आहेत. त्या म्हणाल्या, "शौर्याला शाळेत प्रवेश मिळाला. शाळेतल्या मुख्याध्यापक
बाईसोबत फारच आत्मविश्वासाने बोलला. त्यांनी त्याला भाजी, फळ, वाहन, आकार, रंग, गाणी
असं विचारलं तर तो छान पैकी सांगत होता. गाणं म्हणून दाखवलं. खूप सहजतेने तो त्यांच्याशी
गप्पा मारत होता.
मुख्याध्यापक
बाई खूप खुश झाल्या. त्यांनी विचारलं, "हा मागच्या वर्षी कुठल्या शाळेत जात होता?"
त्या म्हणाल्या, "तो शाळेत नाही आनंदघर बालसंगोपन केंद्रात जात होता."
शौर्याच्या आई मला आनंदाने सांगत होत्या, "तो इतका छान बोलू शकतो आणि त्याला इतकं सारं माहिती आहे हे मला माहीतच नव्हतं. आनंदघरी एका वर्षात त्याला बरंच काही मिळालं. मलाही खूप छान वाटतंय." आईची ही प्रतिक्रिया ऐकून मीही आनंदून गेले व आनंदघरच्या टीमलाही याबद्दल मिटिंगमध्ये सांगितलं.
खरंतर, आनंदघरी खूप साध्या, सहज, सोप्या गोष्टी केल्या जातात, करण्यावर भर दिला जातो. मुळात बेसिक लाइफ स्किल्सवर (जगणं)(basic life skils) काम केलं जातं. उदाहरणार्थ दोन ते सहा वर्ष वयोगटात टप्प्याटप्प्याने मुलांना स्वतःच्या हाताने जेवता येणं, संपूर्ण जेवण करणं, छोटी छोटी काम करणं, खेळ आवरून ठेवायला मदत करणं, शी-शू सांगता येणं, आपल्याला काय म्हणायचं आहे ते योग्य शब्दात बोलता येणं इत्यादी बाबी अंतर्भूत आहेत. हळूहळू मुलं योग्य सूचना आणि सोबतचे मित्र-मैत्रिणी यांच्यासोबत या गोष्टी व्यवस्थित करायला लागतात. हे करताना आनंदघरी जे रोजचे उपक्रम घेतले जातात, त्यात गप्पा, गाणी, गोष्टी, पुस्तक वाचन, चाळण, खेळ यातून मुलांचा शब्दसंग्रह आणखी वाढतो व आजूबाजूच्या परिसराची छान ओळख होते. यातूनच मुलांना बऱ्याच गोष्टी समजायला लागतात. त्यामुळे सहजतेने मुलांसोबत आपण जे काही करतो तेच त्यांचं शिकणं- शिक्षण आहे. असं शिकणं त्यांचं जगणं सुंदर-समृद्ध करेल अशी खात्री वाटते.
अँड.
छाया गोलटगावकर
chhaya.golatgaonkar@gmail.com
No comments:
Post a Comment