आनंदघर लेख - १९ ' मुलांचा
आहार- पोषण...'
बालसंगोपनात
आहाराचं विशेष महत्त्व आहे. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मुलांचा आहार कसा असावा याविषयीचं
संशोधन आहे. आनंदघरी विविध वयोगटाची मुलं येतात. २ ते १५ वर्ष. काही मुलं शिबिराच्या
निमित्ताने येतात, त्यांना काय प्रकारचा खाऊ दिला जातो हे आम्ही बघत असतो. डब्यामध्ये
वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ असतात, विविध चवींचे, मुलांना आवडतील असे. मुलांच्या आवडीबरोबरच
त्या पदार्थातील पोषण मूल्यही जपायला हवं. काही वेळा मुलांच्या डब्यात चॉकलेट, विविध
प्रकारची बिस्किट, ब्रेड, पाव, चिप्स, कुरकुरे, मॅगी असे बेकरीचे पदार्थ, जंकफूड, हॉटेलमध्ये
बनवलेलं अन्न दिलं जातं. कित्येकदा या प्रकारचे पदार्थ मोठ्यांच्या सोयीनुसार दिले
जातात. काही वेळा दुपारच्या जेवणात हे असे पदार्थ आम्ही डब्यात बघितले त्यामुळे एक
नियम बनवायला लागला. मुलांना दुपारच्या डब्यात, जेवणात पोळी भाजी, पराठे व सोबत काही काकडी, गाजर इत्यादी द्यायला हवं. खाऊच्या वेळीसुद्धा
शक्यतो घरी बनवलेला पौष्टीक खाऊ देण्यावर भर हवा. त्याप्रमाणे पालकांना सूचना दिल्या
जातात. तरीही काही मुलांच्या डब्यात बेकरीचे पदार्थ व जंकफूड सातत्याने असतं.
खरं
तर पौष्टीक अन्नच का द्यायला हवं? यावर जागरूकता निर्माण व्हायला हवी. मुलांच्या वाढीसाठी,
विकासासाठी पौष्टीक अन्न गरजेचं आहे असं आहारतज्ञही वारंवार सांगतात. केवळ आहार तज्ज्ञच
नाही तर डॉक्टर, दातांचे डॉक्टर हेसुद्धा मुलांना बेकरीचे पदार्थ, जंकफूड, उघड्यावरचे
अन्न देऊ नका असे सांगतात.
असं
सांगण्यामागे काही कारण आहे. एकदा एका दातांच्या डॉक्टरांनी सांगितले की अगदी तीन आणि
चार वर्षाच्या मुलांचे सुद्धा रूट कॅनल, दात काढून टाकणं असं प्रमाण वाढलं आहे. मी त्यांना कारण विचारलं असता ते म्हणाले,
"मुख्य कारण चॉकलेट, बिस्कीट आहे, त्याचबरोबर बदललेल्या जीवन शैलीमुळे,जंकफूड
आणि बाहेरचं अन्न खाण्याचंही प्रमाण जास्त आहे. अशा प्रकारच्या पदार्थांमध्ये आपल्या
शरीराला आवश्यक घटक, चोथा, प्रथिन, जीवनसत्त्व इत्यादी नसतं किंवा असलं तरी अल्प प्रमाणात असतं. याउलट आपल्या
शरीराला नुकसान कारक घटक त्यात असतात. खूप जास्त प्रक्रिया केलेलं अन्न, फक्त चवीचा
विचार करून त्यात घातलेले मसाले इत्यादी प्रक्रिया केलेलं अन्न, मुलांच्या शरीराचं
पोषण करू शकत नाही. मुलांच्या जशा दातांच्या तक्रारी वाढल्यात तशा पोट साफ नसल्याच्या
तक्रारीही वाढल्या आहेत.
एकदा
एक तीन वर्षाचं मुलं, ध्रुव आनंदघर मध्ये यायला लागला. काही दिवसात आमच्या लक्षात आलं
की तो शी आली तरी शी /करायला जात नसे आणि थोड्यावेळाने रडत असे. वेगवेगळ्या पद्धतीने
प्रयत्न करून बघितले पण तो कशालाच दाद देईना. त्याच्या पालकांशी बोललो त्यांनी सांगितलं
की त्याला शी करताना खूप त्रास होतो. शी कडक होते, त्यामुळे शी ची जागा दुखते म्हणून
तो शी करायला तयार नसतो आणि खूप रडतो. मग त्याला औषध दिलं की त्याचं पोट साफ होतं.
मी
ते ऐकून घेतलं आणि त्यांना सुचवलं की त्याच्या औषधांसोबत आपण त्याला खजूर, काळे मनुके,
भाज्या,फळं देऊया. कारण डब्यात रोजच वेफर्स, चकली असे पदार्थ असायचे. ध्रुव भाजी खात
नव्हता. मी पालकांना हेही सांगितलं की साधारणपणे मूल दोन वर्षांचं झालं की त्याने भाजी,
पोळी, वरण-भात, फळ असा पूर्ण आहार घ्यायला हवा. त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे.आनंदघरी
सर्व मुलांना दुपारच्या जेवणात हेचं दिलं जातं. ध्रुवच्या या समस्यासाठी औषधांपेक्षा
गरजेचा होता आहारातला योग्य तो बदल. तो बदल काही लगेच झाला असं नाही, हळूहळू तो बदल
करत साधारणपणे चार-पाच महिन्यांनंतर शी करताना
दुखणं आणि रडणं थांबलं.
औषधाची
गरजही संपली, ध्रुव आता आठ वर्षांचा आहे, आजपर्यंत त्याला पुन्हा औषधाची गरज पोट साफ
होण्यासाठी भासली नाही.
असा
एक ध्रुव नाही, कित्येक मुलांच्या या समस्या मी बघते. खाण्याच्या चुकीच्या सवयी मुलांसाठी
घातक आहेत.
मुलांचा
रोजचा आहार साधा हवा. साधारणतः दीड - दोन वर्षांच्या मुलांना वरण-भात-भाजी-पोळी-चटणी-कच्चं
अशा पूर्ण जेवणाची सवय लावायला हवी. मूल आपल्यासोबत मोठ्यांसोबत जेवायला बसलं की या
सवयी लवकर लागतात. शिवाय स्वतःच्या हातानेही मूल जेवायला शिकतं. खूप पसारा होतो म्हणून
मुलाला स्वतःच्या हाताने खाण्यापासून थांबवू नका. त्याच्या स्वावलंबनाचे हे छोटे छोटे
धडे आहेत. त्यात आपला व्यत्यय नको. दिवसभरातही विविध पौष्टिक खाऊ, फळं याची आपल्याकडे
कमी नाही. जितकं साधं, कमी प्रक्रिया केलेल अन्न तितकं चांगलं.
विविध
उदाहरणातून मला सुद्धा खूप नवीन नवीन गोष्टी उमजल्या. मुलं खरंतर चांगला पौष्टीक आहार
खातात. परंतु कित्येकदा मोठ्यांच्या सवयी व सोयी यामुळे त्यांना निकृष्ट आहार घेण्याची
सवय लागते. त्यामुळे पालक, शिक्षक व मुलांसोबत काम करणारी मोठी माणसं यांनी आहाराविषयी
जाणून घेणं, मुलांच्या आहाराकडे लक्ष देणं व या आहाराचा आणि मुलांच्या वाढीचा आणि विकासाचा
विचार करणं आवश्यक वाटतं. मुलांच्या निकोप वाढ
आणि विकासासाठी पोषक आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
अँड.
छाया गोलटगावकर
chhaya.golatgaonkar@gmail.com
No comments:
Post a Comment