आनंदघर लेख - २७ ' एकेरी पालकत्व...'
बदलत्या
काळानुसार पालकत्वही बदलत आहे. साधारण पंचवीस-तीस वर्षांपूर्वी विविध कारणांनी विभक्त
कुटुंब पद्धती आकार घेऊ लागली. त्यावेळी बालसंगोपनाचा प्रश्न भेडसावू लागला. विभक्त
कुटुंब व आई कामासाठी बाहेर पडणं दोन्हीही मुख्य कारणं आहेत, त्याच्याही आधीपासून पाळणाघरांची
गरज भेडसावू लागली. अर्थात पूर्वीची पाळणाघरं घरगुती प्रकारची होती. काळानुरूप समाज
बदलत चालला आहे. त्यानुसार पाळणाघरांचं स्वरूपही बदलत आहे. सध्याच्या काळात व्यवसायिक
पाळणाघरं, बालसंगोपन केंद्र यांची गरज भेडसावत आहे. विभक्त कुटुंबाबरोबरच स्त्रिया
पूर्णवेळ काम स्वीकारत आहेत. मोठ मोठे पद भूषवत आहे, जबाबदाऱ्या घेत आहे अशा परिस्थितीत
पर्यायी पालकत्वाची गरज निर्माण झाली आहे. म्हणजे बालसंगोपनाबरोबरत त्यांच्या वाढीचा,
विकासाचा विचार करून, अभ्यास करून काम करणं. पालकांच्या गैरहजेरीत पालकांची भूमिका
निभावणं, तीही अभ्यासपूर्ण. याप्रकारे मुलांसोबत काम करण आवश्यक आहे... अनेक कारणांपैकी
एक महत्त्वाचं कारण म्हणजे एकेरी पालकत्व.
काळानुरुप
समाज बदलतो आणि त्याच्या गरजा सुद्धा बदलत आहेत. नोकरी-व्यवसायानिमित्त कित्येकदा आई
आणि बाबा वेगवेगळ्या शहरात काम करत आहेत किंवा घटस्फोट झाला आहे किंवा दोघांपैकी एकाचा
मृत्यू झाला आहे अशा विविध कारणांनी एकेरी पालकत्वाचे उदाहरण समोर येत आहेत. अशा पालकांना
काही वेळा कुटुंबाचा आधार मिळतो, तर काही वेळा मिळत नाही. असंही घडतं की कुटुंबाचे
सगळीच जबाबदारी एकट्या पालकावर येऊन पडते. यात अर्थार्जनाबरोबरच मुलं, घर, स्वतःची
नोकरी-व्यवसाय, घरातील वयोवृद्ध माणसं व इतर अवलंबून असलेले माणसं, यांच्यासहित सर्व
सांभाळावं लागतं. एकट्या पालकासाठी तर ही प्रचंड मोठी तारेवरची कसरत आहे. दोघांचं काम
जबाबदाऱ्या एकट्याने पार पाडणं आव्हानात्मकच आहे. यातली ओढाताण, ताणतणाव घुसमट अस्वस्थता
मुलांपर्यंतही पोहोचत असते.
सिद्धार्थ अगदी आनंदी मूल. घरातले ताणतणाव वाढले
तसा सिद्धार्थ उदास राहू लागला. भांडणं इतकी विकोपाला गेली की एकमेकांवरची हिंसा व
त्यानंतर कोर्ट केसेसही बऱ्याच झाल्या. या सर्व घटना चिमुकल्या सिद्धार्थ समोर घडल्या.
तो अत्यंत सैरभैर झाला. कित्येकदा आनंदघरी तो एका ठिकाणी बसत नसे. सतत अस्वस्थ होऊन
फिरायचा. मधेच रडायला लागायचा, मधेच व्याकूळ व्हायचा. इतर मुलं, ताई मावशी यांना रागवायचा,
मारायचा, घरातली भांडणं सांगायचा. त्याच्यावरचा ताण, त्याची अस्वस्थता जाणवायची. मधेच
खेळता-खेळता रडायचा, हसत हसत रागवायचा. त्याच्या आईसोबत जेव्हा बोलणं झालं. तेव्हा
त्याची परिस्थिती कळली. तो जे काही सांगत होता ते खरं होतं. त्याच्यावरचा ताण कमी व्हावा
यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो, त्यामुळे जास्तीत जास्त त्याच्या कलानं घेणं चालू होतं.
अधूनमधून माझ्याजवळ येऊन बसायचा, त्याला खूप काही सांगायचं असायचं, भरपूर बोलायचा आणि
माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवायचा. त्याची ही स्पर्शाची भूक होती, जी प्रत्येक मुलात
असते. ताईंनी मावशींनी जवळ घेणं, प्रेमानं हात फिरवणं, दुपारी झोपताना थोपटणं हे मुलांना
अगदी हवं असतं. काही मुलांची सकाळी 9 ते संध्याकाळी 7 एवढा मोठा काळ मुलांची व पालकांची
भेट होत नाही, त्यामुळे ती स्पर्शाची गरजही पूर्ण होत नाही. म्हणूनच ताई आणि मावशींची
ही जबाबदारी आहे की प्रेमाचा मायेचा स्पर्श मुलांना द्यायला हवा.
सौरभचे बाबा मुंबईमध्ये, आई पुण्यात दोघेही नोकरी करत होते. न्यायालयात घटस्फोटाची केस चालू. घरातील हा ताणतणाव सौरभपर्यंत पोहोचत होता. त्याचे व्हायचे ते परिणाम दिसत होते. तोही अस्वस्थ होता, जास्तीत जास्त वेळ कम्प्युटर, टीव्ही, मोबाईल यात घालवत होता. कोणाचही ऐकत नव्हता, त्याच्या आईची तर पार तारांबळ उडत होती. एकीकडे कोर्टात केस चालू, तर दुसरीकडे स्वतःची नोकरी सांभाळून मुलाची जबाबदारी. नोकरीमुळे मुलाकडे फारसे लक्ष देता येत नव्हतं, सततची काळजी, ताणतणाव...
असे एक पालक नाही, आणखीही काही पालक भेटले.
निधी, निलेश दोन मुलांची आई अशीच कसरत करत होती. घटस्फोटाची केस, दोन्ही मुलं आणि नोकरी... दोन्ही मुलं वयाने लहान असल्यामुळे खूपच धावपळ व्हायची.
घटस्फोटातून येणारं एकेरी पालकत्व खूपच त्रासदायक ताणतणावाचं... पती-पत्नी म्हणून जरी दोघांमध्ये मतभेद असले भांडणं असली तरी त्या मुलाचे ते कायम आई-बाबा असतात आणि मुलांना दोघेही हवे असतात, ती त्यांची नैसर्गिक गरज आहे.
एकेरी पालकत्वाचा ताण प्रचंड असतो. कारण दोघांनी
पार पाडायच्या जबाबदाऱ्या एकावर येऊन पडतात. त्यातही आई पालक असेल तर ताणाची तीव्रता
जास्त असते. एकीकडे घर तुटल्याचं दुःख, घटस्फोटाचा सोशल स्टीगमा, सासरी माहेरी आधार
मिळतो किंवा मिळत नाही, मुलांची जबाबदारी अर्थार्जन, सामाजिक स्थान, मानसिक- भावनिक
गुंतागुंत अशा एक ना अनेक बाबी असतात... अशा तणावग्रस्त वातावरणात जगणं चालू असतं.
अशा परिस्थितीत मुलांचे दुखणं खुपणं असेल, वर्तन समस्या असतील तर ती आई पार हवालदिल
होऊन जाते. आनंदघरच्या वातावरणात विविध पद्धतींनी हे ताणतणाव दूर करण्याचा प्रयत्न
केला जातो.
एकेरी पालकत्व एखाद्याच्या मृत्यूमुळे (आई-बाबा)
येतं. यातही वरीलप्रमाणेच बरेचसेच ताणतणाव असतात आणि आई किंवा बाबा नसण्याचं अतीव दुःख
असतं. याही परिस्थितीत कोणाचा आधार मिळतो किंवा मिळतही नाही. सर्व जबाबदाऱ्यांसोबत
मुलांचे चांगले संगोपन तारेवरची कसरतच असते. त्यात मुलांसोबत मृत्यू म्हणजे काय? याविषयी
संवाद साधणं आवश्यक असतं. अशावेळी मृत्यूबद्दलच्या खोट्या, भ्रामक कल्पना न सांगता
मुलांच्या वयानुसार त्यांच्याशी मृत्यूविषयी बोलावं. मृत्यू बघणं, अनुभवणं मुलांच्या
भावविश्वात मोठीच उलथापालथ करतो. असंख्य प्रश्न मनात असतात संयमानं या प्रश्नांना
उत्तर द्यायला हवेत.
काही प्रश्न मुलं खूप थेट विचारतात.
'ते
मेले का'?,
'त्यांना
आग लावणार का आता'?,
'ते भूत बनणार का आता'?
'हे
सगळे एवढे का रडत आहेत'? काही विशिष्ट पद्धतीने लोक रडतात तेव्हा मुलांना हसू यायला
लागतं. मुलांच्या अशा वागण्यानं, बोलण्यानं आपण गोंधळून न जाता थोडं संयमानं त्यांना
योग्य उत्तरं द्यायला हवीत. आपली संवेदनशीलता मुलांपर्यंत नक्कीच पोहोचते. आई किंवा
बाबा नसणं हे मुलांसाठीही खूप त्रासदायक आहे.
एकेरी पालकत्वात दोघांची जबाबदारी एकट्यावर येऊन
पडते... यासाठी कुणाची मदत घेणं केव्हाही चांगलं... केवळ नातेवाईक, मित्र परिवार यावर
विसंबून न राहता मदतनीसांची मदत घेतली म्हणजे ती ओढाताण, त्याची तीव्रता नक्कीच कमी
होऊ शकेल. आई बाबा यांच्या नोकरीतील बदल, शहर बदलणं यामुळे रोज भेटणारे आई -बाबा आठवड्यातून,
महिन्यातून एकदा भेटायला लागतात. आई-बाबा आणि मुलं सगळ्यांसाठीच हा कसोटीचा क्षण असतो.
मुलं अस्थिर होतात, आठवणीनी व्याकुळ होतात. लहान मुलांना कित्येकदा काय बदल झाला आहे
हे कळत नाही. बाबा दुसरीकडे का राहतो? हेही कळत नाही. पुन्हा भेटणार की नाही हेही कळत
नाही. त्यामुळे मुलं कावरीबावरी होतात.त्यांना असुरक्षित वाटू लागतं, रडू येतं, झोपेत
शु होते...
एकदा आनंदघरी सात वर्षांचा अनिश आला व ताईला म्हणाला,
"आज मी शाळेत गेलोच नाही!"
ताई
म्हणाली," का रे"
"आज
शाळेत फादर्स डे होता.
बाबांना
घेऊन जायचं होतं पण मला तर बाबाच नाहीत, म्हणून नाही गेलो". असं म्हणून तो मित्रांसोबत
खेळायला गेला सुद्धा. असाच एकदा दहा वर्षांचा पियुष गप्प बसला होता त्याला मी विचारलं,
"काय करतोयस?
मला म्हणाला, "विचार करतोय". "म्हटलं
कशाचा?"
"माझ्या
बाबांचा! आज शाळेत 'माझे बाबा' या विषयावर निबंध लिहायला सांगितला." पियुष विचार
करणार, स्वाभाविक होतं. त्याच्या जन्माच्या आधीच त्याचे बाबा वारले होते. आई बाबांचा
मृत्यू असा एकदाच संपत नाही. तो अधून मधून भेटत राहतो मागे राहिलेल्याचं भावविश्व ढवळून
काढतो...
समाजात एकेरी पालकत्व वाढत आहे की काय... तसं दिसत
आहे. मुळात मूल असं एकेकट्यानं वाढण्यासाठी नाहीच. एका आफ्रिकन म्हणीनुसार- "एक
मूल वाढवायला एक गाव लागतं..." तेच इतर माणसांनाही लागू होतं. समाजशास्त्रीय व्याख्येनुसार
माणूस समाजशील प्राणी आहे. अवतीभोवतीच्या लोकांशिवाय तो जगू शकत नाही, एकेकटा तो राहू
शकत नाही. मुलांच्या निकोप वाढीसाठी आजूबाजूचा समाज अत्यावश्यक आहे. परंतु माणसं एकेकटी
पडत चालली आहेत. हेही सत्य आहे. त्याची कारणं अनेक आहेत. जसे की विभक्त कुटुंब, स्थलांतरण
(migration), एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि वेगवेगळ्या कारणांनी आई-बाबाही वेगवेगळ्या
शहरातून वेगळं राहणं, टोकाचा, आत्मकेंद्री (individualistic approach) विचार... अशा
बदलत्या समाजरचनेच्या गरजाही बदलतात. जसे की सगळी कामे एकट्याने शक्य नाही म्हणून मदतनीस
असणं, तयार जेवण, शाळेव्यतिरिक्त पाळणाघरं, विविध क्लासेस, मैदान आणि मुलांना सोडण्या-
आणण्यासाठी व्हॅनची व्यवस्था अशा प्रकारची नवी व्यवस्था आकार घेत आहे. यात पाळणाघरांची
गरज आणि भूमिका महत्त्वाची आहे. विशेषतः एकटा पालक असेल तर मुलांसोबत पालकांचीही एक
सपोर्टिंग सिस्टीम असायला हवी. आनंदघर बाल संगोपन केंद्र सुरूवातीपासून मुलांसोबत तर
काम करतच आहे, यासोबतच पालकांसाठी, ताया, मावशांसाठी ही एक सपोर्टिंग सिस्टीम म्हणून
उभं आहे...
अॅड.
छाया गोलटगावकर
chhaya.golatgaonkar@gmail.com
No comments:
Post a Comment