Tuesday, June 23, 2020

आनंदघर लेख - २६ ' फिनलंड (युरोप) अभ्यास दौरा...भाग - ५'






आनंदघर लेख - २६ ' फिनलंड (युरोप) अभ्यास दौरा...भाग - ५'


या आधीचा भाग लेख - २५ मध्ये...

आनंदघरच्या काही शिबिरांसाठी तज्ञ व्यक्तींना आमंत्रित केले जाते. पालक-शिक्षक चित्र कार्यशाळा- या शिबिरात मुलांच्या चित्र

काढण्याविषयीच्या अनेकानेक प्रश्नांवर चर्चा झाली. मुळात मुलं चित्र कसं काढतं? मुलांच्या चित्रकलेचे टप्पे काय आहेत? त्याचा मुलांच्या वाढ व विकासात काय संबंध आहे? पालक शिक्षक म्हणून आम्ही मुलांना काय सूचना द्यायच्या? असे अनेकानेक प्रश्न व त्यासोबत चर्चा रंगली, आभा भागवत या चित्रकर्ती सोबत... मूल वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या प्रकारे चित्र एक्सप्लोर करतं. प्रत्येक टप्प्यावर मुलांनी काढलेले चित्र हे विचार करून व मन लावून काढलेलं असतं, जरी मोठ्या माणसांना त्या रेघोट्या वाटल्या तरी त्या चित्राविषयी जर विचारलं तर  काही वेळा मुलं त्याचं छान वर्णन करतात... त्यामुळे मुलांचं चित्र मोठ्या माणसांनी बरं-वाईट ठरवू नये, त्यांच्यात लुडबूड करू नये, त्यांना सूचना देऊ नये, त्या चित्रावर टीका करू नये अशा अनेक गोष्टी आभा ताईंनी सांगितल्या. अशा गोष्टी मुलांमधील सर्जनशीलतेला मारक आहेत. मुलं स्वतः विचार करून सुंदर चित्र काढतात, त्यांच्या आवडीचे रंग वापरतात. काहीवेळा तर अत्यंत विलक्षण रंगसंगती वापरतात, ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. कित्येकदा हिरवं झाड, निळं पाणी, पिवळा सूर्य हे सर्व आपलं ठरलेलं असतं, परंतु मुलांच्या विश्वात विविधरंगी झाडं, प्राणी असतात. आपल्या कल्पनेतलं चित्रात उतरवणं हीच तर चित्राची गंमत असते. असा विचार मुलांमध्ये जास्त असतो कारण मुलांच्या मनात असलेलं प्रचंड कुतूहल... मुलांकडे कुठलीही चौकट, झापडं नसतात. त्यामुळे ते मुक्तपणे चित्रातून व्यक्त होतात.

मुलांमधील सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी- मुलांसाठी चित्रकार्यशाळा आणि भित्तिचित्र अशी अनोखी शिबीरं घेण्यात आली. भिंत हा एवढा मोठा कॅनव्हास चित्र काढायला मिळणं, त्यावर चित्र काढणं, ही धम्माल निराळीच होती. त्या भिंतींवर जे झाडं, प्राणी, पक्षी, डोंगर, तळं, कीटक साकारले ते मुलांच्या भावविश्वातील होते.

 कित्येकदा आपल्याला असं वाटतं की सर्जनशीलता ही केवळ विविध कलांमध्ये असते (आर्ट्स अँड क्राफ्ट्स). खरंतर विज्ञान-तंत्रज्ञानातही सर्जनशीलता असते. याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला शिबिरात आला. त्या शिबिराचे नाव 'रोबोटिक्स असेंबली शिबिर.'

हे शिबिर संगीताताई बनगीनवार या तज्ञ व्यक्ती ने आनंदघरी घेतलं. मुलांनीही खूप धमाल केली. खरंतर मुलांच्या विश्वात स्मार्टफोन, इंटरनेट रोबोट, ट्रान्सफॉर्मर इत्यादी गोष्टींना एक वेगळे स्थान आहे, अशी गॅजेट्स बघणं, हाताळण, याविषयी मुलांना प्रचंड कुतूहल असतं. ही गॅजेट्स अजिबात द्यायची नाहीत किंवा त्यांचा अतिवापर दोन्ही योग्य नाही. या गॅजेट्सच्या माध्यमातूनही मुलांच्या (क्रिएटिव्हिटी) सर्जनशीलतेला वाव कसा मिळेल यावर काम व्हायला हवं. या शिबिरामध्ये विज्ञान-तंत्रज्ञान, सर्जनशीलता कशी शिकण्याची प्रोसेस आहे हे मुलांसोबत मीही अनुभवत होते. मुलं वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट, जेसीबी इतर वाहनांचे प्रकार बनवत होते. रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने ते चालवत होते, ते बनवताना येणाऱ्या अडचणी, त्यावर स्वतः मार्ग शोधणे, गरज भासली तर ताईची मदत घेणं हे असं सगळं चालू होतं. यादरम्यान एक छान अनुभव आला. मुलांसोबत बाहेर फिरताना एक क्रेन दिसली. माझ्यासोबत पाच सहा मुलं होती. ती क्रेन जवळ थांबली, त्यावर त्यांची चर्चा सुरू झाली...

डिझाईन कसं आहे, त्यात फलक्रम (fulcrum) पॉईंट आहे की नाही? पूलीच (pulley) कार्य काय आहे? हे सर्व बघून मनात काही प्रश्न होते, ते दुसऱ्या दिवशी ताईंना विचारले. शिबिरांमध्ये जे काही चालू होतं ते त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका क्रेन मध्ये बघितलं. त्यावर चर्चा केली, ताईंना त्यावर काही प्रश्न विचारले. त्याच बरोबर स्वतःचे नवीन डिझाइन्स बनवून त्यानुसार रोबोट तयार केले. सुरुवातीला ताईच्या मदतीने, मॅन्युअल मध्ये बघून मुलांनी रोबोट्स बनवले...

 दोन तीन दिवसानंतर मात्र स्वतःच्या कल्पनेतल्या डिझाइन्स बनवून त्याप्रमाणे वेगवेगळ्या असेम्बली बनवल्या. मूल कसं शिकतं, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. हाताने करून बघणं, नवीन कल्पना सूचणं, त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवणं, सुंदर प्रक्रिया आहे.

 

"स्वयंपाक घर एक समृद्ध प्रयोगशाळा" - मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणारं आणखी एक शिबीर घेतलं ते म्हणजे वाळवण शिबिर. असं म्हणतात स्वयंपाकघर एक समृद्ध प्रयोगशाळा आहे. या शिबिराचा उद्देश मुलांना वाळवण बनवायला शिकवण हा नव्हता. तर वाळवण बनवण्याची प्रक्रिया काय आहे? त्यातलं विज्ञान, नीटनेटकेपणा, कष्ट, चव, रंग, भाषा, पदार्थातील वैविध्य इत्यादी गोष्टी कळाव्या हा एक हेतू। विविध साधन,, मशिन सोबत (किसणी, सोऱ्या, इत्यादी) ओळख, त्याचा उपयोग जाणून घेणं, करणं। याशिवाय पदार्थ बनवताना कच्चं पीठ खाणं, अर्धवट शिजलेल, वाळलेल खाणं, बनलेला पदार्थ भाजून, तळून खाणं या सर्व प्रक्रियेतून जाणं असा विचार यामागे होता.

चौकशीचे फोन आले तेव्हा,, बरं झालं तुम्ही असं शिबीर घेताय असा एक सूर होता, तर आजकाल पालकच वाळवण करत नाहीत तर मुलांना शिकवून काय उपयोग, असाही एक सूर होता. पालक का करत नाहीत हा एक वेगळा मुद्दा आहे. जागा नसणं, वेळ नसणं अशीही कारण आहेत. दुसरं असं की मुलांना शिकवावं, त्यांनी ते करावं यासाठी हे शिबीर नाही. मुलांनी या प्रक्रियेतून जाणं मला महत्वाचं वाटतं. शिबिरांमध्ये सहा ते बारा या वयोगटातील मुलं व त्यांच्या बरोबर दोन ते सहा या वयोगटातील आनंदघरची मुलं धमाल करत होती. अनपेक्षितपणे मुलांच्या गप्पामधून जेंडर इक्वलिटीचा (gender equality) मुद्दा समोर आला. एका मुलीचा म्हणणं होतं बाबा कधी पोळ्या करत असतो का?

 त्यावर एका मुलाने उत्तर दिलं, हो! बाबा पण पोळ्या करतो.

 मुलीचं म्हणणं होतं तू करशील का?

मुलगा म्हणाला, हो! मला करायला आवडतं.

मुलगी ठाम होती, पोळ्या आईनेच करायच्या असतात, यावर. या गप्पांना धरून आम्ही गोलात बसून बोलू लागलो. मुलं त्यावर आणखी बोलती झाली. शिबिराच्या या 5 दिवसात बटाटा चिप्स, कुरडई, पापडया, वडे, खारुड्या, चिक हाटणे, पोहे व साबुदाण्याची चकली बनवलं प्रत्येक वेळी चव बघत काम केलं.

 जेवढे पदार्थ बनवले त्या त्या दिवशी मुलांशी त्या सर्व प्रक्रियेबद्दल छान बोलणं झालं.

अशा या आमच्या प्रयोगशाळेतील रंगीबेरंगी पदार्थ, सर्व प्रकारच्या पापड्या तळून सर्वांनी  मस्त ताव मारला.

 

 पारंपरिक खेळ - असंच एक अनोखं शिबिर- कमीत कमी साधनात भरपूर आनंद देणारं... काही खेळ आहेत, जसे की, लगोरी, डब्बा एक्सप्रेस, भोवरा ठिकरी पाणी इत्यादी. कित्येकदा काही घरांमध्ये खेळण्यांचा ढीग पडलेला असतो तरीही मुलं नवीन खेळणी मागत असतात. मुलं एकेकटी असली की खेळण्यांमध्ये मन रमण्याचा प्रयत्न करतात. परंतु हीच मुलं जेव्हा मित्रांसोबत खेळतात तेव्हा त्यांना खेळण्यांचा विसर पडलेला असतो. म्हणजेच "मुलांसाठी खेळ महत्त्वाचा आहे खेळणी नाही" आणि खेळ खेळण्यासाठी मित्र-मैत्रिणी लागतात. या शिबिरात मुलं अगदी सलग दोन-तीन तास बेभान होऊन खेळत होती. फक्त मुलंच नाही तर शिक्षकही तितक्याच उत्साहाने खेळत होते.

 काय तो आनंद, उत्साह! किती वेगळं कौशल्य लागत हे खेळ खेळायला! यातून मुलांना जे जे मिळतं ते कसं मोजणार?? Eye hand coordination पासून ते भावनिक सक्षमता असं सर्व या खेळात दिसलं, जाणवलं.

पारंपरिक खेळ हे नाव जरी पारंपारिक असलं तरी याचा अर्थ लहानपणचे, आपल्या परिसरातील, स्थानिक खेळ...

असं गटात खेळताना माझा गट जिंकणं आणि तो जिंकण्यासाठी एकमेकांना सहाय्य करणं चालू होतं. त्याचबरोबर काहीवेळा अटीतटीचा डाव झाला तरी रडीचा डाव न खेळण. या खेळात हारण- जिंकणं, पडणं- लागणं, गटबाजी करणं, एकमेकांना सावरणं, चिकाटीने खेळणं असे सर्व छटा (शेड्स) बघायला मिळत होत्या. यातून मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक क्षमता दिसत होत्या..

भोवरा हा खेळ बहुतेक मुलांना माहीतच नव्हता. एका चौथीच्या मुलाला मयूरला भोवरा फिरवणं, तो तळहातावर उचलणं, भोवरा फाइट असं सगळं येत होतं. त्याने त्याच्या सर्व करामती करून  दाखवल्या. त्यामुळे त्या दिवशी तो आमच्या सगळ्यांचा शिक्षक होता. मुलं उत्साहाने त्याच्याकडून दोरी कशी गुंडाळायची ? तो फिरवायचा कसा? हे जाणून घेत होती. खूप प्रयत्न करूनही भोवरा काही फिरेना. मुलांसोबत ताया सुद्धा भोवरा फिरवण शिकत होत्या. एका मुलाने, निमिषने भोवरा आणि  बेब्लेड, आधुनिक भोवरा यातला फरक सांगितला. "बेब्लेड फिरवायला काहीच स्कील लागत नाही, तर भोवरा फिरवण काही सोपं नाही. आमच्याकडे महागडी खेळणी आहेत पण हे साधेसाधे खेळ आम्हाला जमत नाही", त्याचं म्हणणं अगदी खरं होतं. भोवरा फिरवताना एक पॉईंट सापडावा लागतो. हाताची ती विशिष्ट पोझिशन आणि फेकण्याची कला जुळून आली की भोवरा फिरतो.

 

मुलांमधील सर्जनशीलता, कल्पकता बहरण्यासाठी त्यांना विविध गोष्टी करून बघू देणं आवश्यक असतं. मन, मनगट, मेंदू यांचं एकत्रित काम आवश्यक असतं. त्याचबरोबर विविध विषयातील तज्ज्ञ व्यक्तींचा सहवास मुलांना मिळायला हवा...

तज्ज्ञ व्यक्तींकडून केवळ त्याविषयाचं ज्ञान मुलं मिळवत नाही तर ती व्यक्ती कशी बोलते, कशी संवाद साधते, शब्दातून आणि शब्दशिवाय मुलांचं ते व्यक्तिमत्व टिपणं चालू असतं... कुठलं मूल कुठल्या phase मध्ये आहे आपल्याला माहीत नाही, त्याच्या वयाच्या कुठल्या टप्प्यावर या व्यक्तिमत्वचं त्याला मार्गदर्शन मिळेल माहीत नाही... पण हा परिसस्पर्श आहे... मोलाचा आहे...

 

 अॅड. छाया गोलटगावकर

chhaya.golatgaonkar@gmail.c

No comments:

Post a Comment