Tuesday, June 23, 2020

आनंदघर लेख - ३१ 'आनंदघर आणि पालकनीती पाळणाघर विशेषांक...'







आनंदघर लेख - ३१ 'आनंदघर आणि पालकनीती पाळणाघर विशेषांक...'

आनंदघरी गेल्या चार वर्षात वेगवेगळ्या प्रकारची कामं झाली. त्यात विविध शिबीरं, स्नेहसंम्मेलनं, विविध सण-उत्सव साजरे करणं, नावीन्यपूर्ण उपक्रम घेणं, यासोबतच लहानांच्या नि मोठ्यांच्या भावनिक स्थिरतेवरही काम झालं. आनंदघरच्याच कामाचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे आनंदघरचे आउटरिच प्रोग्राम्स! बालसंगोपन केंद्रात वैविध्यपूर्ण काम होणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे हे आउटरिच प्रोग्राम. या कामातही वैविध्य आहे. यात पालक-शिक्षक प्रशिक्षण, एखाद्या ठिकाणी एका समूहासमोर व्याख्याते म्हणून एखाद्या विषयाची मांडणी करणं, कन्सल्टन्सी देणं अशी विविध कामं अंतर्भूत आहेत.

आनंदघरच्या या लेखमालेत यापूर्वीच्या लेखांमध्ये अशाच एका आऊट रिच प्रोग्राम बद्दल पाच भागात लिहिलं आहे. त्या लेखांचं शीर्षक होतं 'फिनलंड (युरोप) अभ्यास दौरा' अशाच काही प्रोग्राम बद्दल येत्या काही लेखांमध्ये लिहिणार आहे.

 जुलै २०१७ मध्ये पालकनीती परिवाराने पाळणाघर विशेषांक केला. खरं तर या विशेषांकाची सुरुवात सहा-सात महिने आधी झाली. खारघरच्या पाळणाघरातील घटना नुकतीच घडून गेली होती. खारघरच्या घटने आधीही आणि नंतरही वेगवेगळ्या पाळणाघराच्या काही घटना अधूनमधून चर्चेत राहिल्या. त्यानिमित्ताने पाळणाघर व बालसंगोपन या विषयावर सविस्तर  लिहिलं जावं असं वाटू लागलं. पालकनीती परिवाराच्या प्रियंवदा बारभाई यांच्याशी या विषयावर तीन-चार वेळा बोलणं झालं, चर्चा झाली यातून प्रियाताईंनी मला असं सुचवलं की "तू आनंदघरी बालसंगोपनाचे जे प्रयोग करत आहेस, शिवाय तू वकीलही आहे तर या विषयी लेख लिहून, त्यात पाळणाघरविषयी सविस्तर भूमिका मांडणं गरजेचं आहे. पालकनीतीच्या अंकात आपण असा विषय मांडू."

मला ही कल्पना आवडली. या विषयावर सविस्तर लिहिणं मलाही अत्यावश्यक वाटलं कारण एखादी घटना घडते त्यावर काहीतरी तीव्र पडसाद उमटतात जसे की पालकांचा दोष आहे, पोलीस काय करतात? कायदा आहे की नाही? संचालकांचा दोष आहे इत्यादी. खरं तर समस्येच्या मुळापर्यंत जाऊन काम करणं गरजेचं आहे. समस्या काय आहे? हे जाणून घेऊन मुळाशी काम होत नाही त्यामुळे अशा घटना वारंवार घडत राहतात व पडसाद उमटत राहतात. हे सर्व टाळण्यासाठी कसं काम केलं पाहिजे? कोणी असं काम केलं आहे का? संचालक, ताई-मावशी यांचे शिक्षण- प्रशिक्षण काय असायला हवं? पालकांची भूमिका व जबाबदारी काय आहे? काय असायला हवी? पोलीस, समाज यांची काय भूमिका काय असायला हवी? अशा सर्वच प्रश्नांचा उहापोह करणं आणि ते सविस्तर मांडणं अत्यावश्यक आहे.

पालकनीती परिवाराच्या डॉ. संजीवनी कुलकर्णी, त्यांच्याशी या विषयावर चर्चा झाली, या चर्चेत

बालसंगोपन हा मुख्य धागा होता. मग ते बाळ कुणाचंही असो मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय, बांधकाम मजूर, प्रॉस्टिट्यूट.... तर हे बालसंगोपन सर्वांचं आनंददायी असणं मूलभूत गोष्ट आहे. प्रत्येक बालकाचा तो अधिकार आहे, हक्क आहे. यावर जेव्हा चर्चा झाली तेव्हा चर्चेअंती संजुताई म्हणाल्या, "आता मला अंक दिसला". आणि पाळणाघर या संवेदनशील विषयावर विशेषांक करण्याचे नक्की झाले.

पालकनीती परिवाराने हा विषय उचलून धरणं कौतुकाचं आणि विशेष आहे. एकदा पाळणाघर विशेषांक करायचा ठरला की पुढची तयारी सुरू झाली.मग कुठली पाळणाघरं, त्यांचं काय काय काम आहे? त्यांच्याशी संपर्क कसा करायचा? त्यांच्या कामाविषयी जाणून घेऊन त्यांच्या कडून त्यांच्या कामाचा आलेख घेणं,  त्या-त्या पाळणाघरांना भेट देणं अशी सगळी कामं सुरू झाली. मी आणि मृदुल कर्णिक आम्ही दोघींनी वेगवेगळ्या पाळणाघरांना भेटी देणं, चर्चा करणं असं सगळं सुरू झालं. वेगवेगळ्या पाळणाघरांना भेटी देताना बालसंगोपन विषयी नव्याने काही गोष्टी कळत होत्या. तसेच, तारा- मोबाईल क्रश, बांधकाम मजुरांच्या मुलांसाठीचे पाळणाघर, स्वाधार..... हे बघताना, जाणून घेताना आश्चर्य आणि कौतुक असं दोन्हीही वाटत होतं. संपूर्ण अंकाच काम करता करता एकीकडे बालसंगोपनाविषयी दिलासा देणाऱ्या घटना घडत होत्या तर दुसरीकडे यावर खूप काम व्हायला हवं असं प्रकर्षाने वाटत होतं.

भारतीय संविधान आणि बालकांसाठीचे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायदे आणि योजना बघितल्या तर असं लक्षात येतं की -- 'मूल हे मूल आहे.'

गुणवत्तापूर्ण बालसंगोपन  व शिक्षण मिळणं हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे त्यांच्या या हक्कांची  जबाबदारी, हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी मोठ्यांवर आहे. मूल कुठल्याही जाती, धर्म, प्रांत, भाषा, वर्ण, देश, लिंगाचं असो, मूलभूत बालसंगोपनाचे व शिक्षणाचे टप्पे जवळपास सर्वांचे सारखेच असतात. तर अशा या

बालहक्कासाठी विविध स्तरातील लोक प्रयत्नशील आहेत. पण असं सर्जनशील काम करणाऱ्यांची संख्या कमीच आहे. त्यात अनेक अडचणीही आहेत. एकतर मुलांच्यासोबत काम करण्यासाठी ---

१) प्रशस्त मोकळी जागा असणं.

२) ताई- मावशींच्या पगारासाठी पैसा असणं.

३) Infrastructure साठी पैसे असणं.

४) ताई, मावशी,संचालक यांना सातत्यपूर्ण प्रशिक्षण असणं.

५) यासाठीचे कायदे असणं.

हे सगळं घडण्यासाठी शासनाने गंभीरपणे याकडे पाहणं व योग्य ती भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच पालक व समाज बालसंगोपनाविषयी सजग असणं गरजेचं आहे. शेवटी बालसंगोपन काही आपोआप मुलं होतील, आपोआप वाढतील असं नाही. कित्येकदा जुन्या व

नव्यापिढीतील लोक असं बोलताना आढळतात परंतु बदलत्या काळानुसार बालसंगोपन अधिक गंभीरपणे जाणून घेणं आवश्यक आहे.

साधारणपणे 10 वर्षांपर्यंतचं वय अत्यंत महत्वाचं असतं. मानसशास्त्रतज्ज्ञांच्यानुसार  या वयात ज्या प्रकारचं बालसंगोपन मुलांचं असतं त्याचे काही पॅटर्न बनतात. हे पॅटर्न्स वय वर्ष सहा ते दहाच्या आतच तयार होतात आणि ते त्या व्यक्तिमत्त्वात आयुष्यभर रिपीट होत रहातात. त्यामुळे हे वय अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून बालसंगोपन आणि शिक्षण (ई सी सी ई) याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि हे प्रत्येक मुलाच्या बाबतीत तितकचं महत्त्वाचं आहे, त्यामुळे पालकनीतीच्या पाळणाघर विशेषांकात सर्व मुलांच्या गुणवत्तापूर्ण बालसंगोपनाची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे.

या अंका दरम्यान काही अडचणी आल्या. अंकाचं काम पूर्णत्वाकडे येत असताना अचानकपणे आनंदघरच्या ताई व मावशी वेगवेगळ्या कारणासाठी महिनाभर नव्हत्या त्यांची कारणही खरी आणि प्रामाणिक होती. त्या काळात दिवसभर आनंदघरचं काम सांभाळून रात्री अंकाचं काम व त्यातल्या माझ्या दोन लेखांचं काम मी पूर्ण केलं. अडचणी तर येणारच! त्या काही नवीन नाही पण अशा अडचणींमध्ये तुम्हाला साथ मिळाली, सोबत मिळाली की अडचणींचं काही वाटत नाही. आनंदघरचेच काही पालक मदतीला धावून आले. आज मी हे शांतपणे लिहू शकत आहे आणि हसूही येत आहे पण त्यावेळी तो प्रत्येक क्षण पहाडासारखा होता. आपला कस लागण्यासाठी बहुदा असे क्षण येत असावेत.


No comments:

Post a Comment