Tuesday, June 23, 2020

आनंदघर लेख - २२ ' फिनलंड (युरोप) अभ्यास दौरा... भाग - १'




आनंदघर लेख - २२ ' फिनलंड (युरोप) अभ्यास दौरा... भाग - १'

 

मागच्या वर्षी नोव्हेंबर १० ते १९, २०१८, फिनलंड अभ्यास दौरा पूर्ण करून आले. निमित्त होतं, 6th International Conference and Symposium on Creative Education, Organised by CCE- Council for Creative Education, Tampere, Finland. CCE चे संस्थापक-संचालक श्री हेरंब व शिरीन कुलकर्णी यांनी मला या ६-व्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये आनंदघरच्या (आनंदघर- बालसंगोपन केंद्र, लर्निंग अँड रिसर्च सेंटर, पुणे) कामाविषयी मांडणी करण्यासाठी आमंत्रित केले. त्यात 'Creativity, Brain and Art: with special reference to Aanandghar -Child Care, Learning & Research Centre, Pune. (Ms- India) या मुद्द्याला धरून मांडणी केली.

फिनलँडचा प्रवास, कॉन्फरन्स, शाळा भेटी, तिथल्या बालसंगोपन केंद्राला दिलेली भेट, असं एकंदर अभ्यास दौरा अतिशय समृद्ध करणारा होता. हा अनुभव शब्दबद्ध करणं, तुमच्यासोबत शेअर करणं गरजेचं नाही तर अत्यावश्यक आहे असं मनापासून वाटतं. भारतात आल्या आल्या काही कामात गुंतल्यामुळे यावर लिहिणं झालं नाही. असो. आता या संपूर्ण अभ्यास दौऱ्याविषयी दोन भागात लिहिलं आहे. पहिल्या भागात प्रवास, प्रवासातल्या गमतीजमती, लोक, लोकांचे अनुभव असं सर्व आहे. दुसऱ्या भागात प्रामुख्याने कॉन्फरन्स, शाळाभेटी, फिनलंड शिक्षणपद्धती यावर आहे. खरं तर दोन्ही भाग मिळून फिनलंड शिक्षण पद्धती छान समजेल कारण कुठलीही शिक्षणपद्धती समजून घेण्यासाठी तिथला समाज समजून घेणं महत्वाचं आहे, म्हणजे तिथली माणसं कशी राहतात, काय खातात, कशी बोलतात, त्यांचा एकमेकांशी व्यवहार कसा आहे, इतरांशी व्यवहार कसा आहे, थोडक्यात, त्यांची ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलीक, सामाजिक इ. पार्श्वभूमी काय आहे. अर्थात हे सर्वच मला एवढ्या कमी कालावधीत समजलं असं मी नाही म्हणणार, परंतु, यातलं थोडं-थोडं काहीतरी जाणवलं, समजलं. तेच अनुभव शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे.

चला तर मग, माझ्यासोबत, फिनलंड अभ्यास दौऱ्याला...

वेगळा देश बघणं, अनुभवणं, जाणून घेणं, याची उत्सुकता, कुतूहल प्रचंड होतं...

या अभ्यास दौऱ्याविषयी काही सांगण्याआधी काही महत्त्वाचं सांगायचं आहे. परदेशात जाऊन आलं की दोन टोकाच्या प्रतिक्रिया बघायला मिळतात. एक टोक- 'वा! काय भारी देश आहे. सगळं कसं स्टॅण्डर्ड, सोफेस्टिकेटेड, रस्ते, गाड्या, घर, राहणीमान, सोयीसुविधा... एकंदर विकसित देशाचा अनेकांगी विकास डोळ्यात भरतो.' दुसरे टोक म्हणजे 'हे काय आले जाऊन परदेशात आता आम्हाला शहाणपणा शिकवणार! मग तिथल्या सगळ्या गोष्टींचं, सिस्टीमचं कौतुक आणि आपण कसं सुधारायला हवं! वगैरे वगैरे. आणि तुलना सुरू होते, आपल्याकडे सगळं कसं आहे आणि तिथं कसं स्टॅण्डर्ड आहे इत्यादी.

मित्रांनो! मी असं काही तुमच्या सोबत शेअर करणार नाही. त्या देशाचा विकास सोयी-सुविधा सिस्टीम बघून त्या ग्लोरिफाय करण्यात मला रस नाही. तसेच हे काय! असे कसे राहतात, जगतात. अशी तुच्छताही माझ्याकडे नाही. जगभरात विविधतेने नटलेली माणसं अनुभवणं जास्त भारी आहे. म्हणून फिनलंड अनुभवताना वर उल्लेखलेली दोन्ही टोकं मी टाळण्याचा प्रयत्न केला आणि तो देश जसा आहे तसा त्याच्या सर्व वैविध्यासहीत समजून घेण्याचा, अनुभवण्याचा, जगण्याचा प्रयत्न केला.

फिनलंड अभ्यास दौऱ्याच्या गोष्टीची सुरुवात सुरुवातीपासून.....

ऑक्टोबरच्या (२०१८) पहिल्या आठवड्यात माझं आणि शिरीनचं बोलणं झालं. कॉन्फरन्सला जायचं ठरलं. पण कसं? कारण अगदी दोन महिन्यापूर्वी आमच्या पासपोर्टची मुदत संपलेली. मग काय अगदी पासपोर्ट काढण्यापासूनची तयारी सुरू झाली. माहिती मिळवणं, कागदपत्र गोळा करणं, झेरॉक्स प्रिंट, एप्लीकेशन, अपॉइंटमेंट. सगळी एकच गडबड सुरू झाली!

ही सर्व तयारी चालू असताना मनात एकीकडे चालूच होतं एवढ्या घाईगडबडीत जाऊ की नको. पासपोर्ट ऑफिसला पोहोचले. ऑफिस अगदी बदलेलं, १० वर्षानंतरचा बदल सुखावणारा. छान सगळं, अगदी स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं आणि सोयीचं! कुठेही गोंधळ, अनागोंदी कारभार नाही.

ऍप्लीकेशन फॉर्म चेक करताना तिथल्या ऑफिसरने विचारलं, "साहिल मायनर (minor) आहे, बाबा कुठे आहे? NOC हवं. बाबाची सही हवी."

म्हटलं," डिक्लेरेशन देते".

"बाबा हवा. उद्या या!" गेला एक दिवस... माझा फॉर्म घेतला पण साहिलचा राहिला. साहिल अगदी लहान असल्यापासून त्याला सोबत घेऊन मी कार्यरत राहिले. अजूनही त्याला सोबत घेऊन माझं काम चालू असतं.

तर बाबा बंगलोरला, तातडीने निघाला दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचला. तुमची सगळी कागदपत्र तयार नसतील तर पासपोर्ट ऑफिसला फार वेळ थांबू देत नाही. दुसऱ्या दिवशीची अपॉइंटमेंट घ्या म्हणाले. शिवाय तत्काळ मध्ये होणार नाही, साहिलला माझ्यासोबत यायचं तर त्याचा पासपोर्ट माझ्यासोबत होणं आवश्यक आहे. दुसऱ्या दिवशी अपॉइंटमेंट घेऊन आम्ही बाबासोबत हजर! आता वाटलं, साहिलचा तात्काळ मध्ये होईल. बाबाचा ही पासपोर्ट एक्सपायर! काल म्हणाले बाबा नाहीत, आज बाबाला आणलं तर बाबाचाही पासपोर्ट एक्सपायर! कागदपत्रांची पूर्तता तर करायला हवी, ऍप्लिकेशन सोबत डिक्लेरेशन, NOC इत्यादी सर्व दिलं. कागदपत्राची पूर्तता केली तरीही साहिलचा तात्काळ मध्ये झाला नाही. साहिलचा पासपोर्ट वेळेत मिळेल की नाही याची खात्री नव्हती. अत्यंत कमी वेळ होता. फक्त महिनाभरात पासपोर्टसहित सर्व तयारी करायची होती. आणि सर्वात महत्वाचं आनंदघरविषयी मांडणी, प्रेझेंटेशन कॉन्फरन्समध्ये करायचं होतं. त्याची तयारी एकीकडे चालू होती.

 

फिनलंडला जाण्याची युद्धपातळीवर तयारी चालू होती. यात मला विशेष कौतुक वाटतं ते सर्व सिस्टमचं, व्यवस्थेचं. पासपोर्ट ऑफिसचा अनुभव अत्यंत चांगला होता. तिथले सर्व कर्मचारी अजिबात वेळ न दवडता कार्यरत होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने तुमचा एप्लीकेशन फॉर्म पुढे पुढे सरकत जातो. ऑनलाइन फॉर्म भरणं, अपॉईंटमेंट घेणं यातही कुठेही काही गोंधळ नव्हता. ही व्यवस्था उत्तमरित्या कार्यरत असल्यामुळे कमी वेळात, त्रास न होता, सहजतेन माझी कामं पार पडली. फक्त पासपोर्ट ऑफिसचा अनुभव नाही तर पोलीस डिपार्टमेंट, पोस्ट ऑफिस, ट्रॅव्हल एजन्सी, व्हिसा ऑफिस अशा संपूर्ण व्यवस्थेचा, त्यांनी उत्तमरितीने काम केल्याचा सुंदर अनुभव माझ्याकडे आहे. या सर्वांच्या सहकार्याशिवाय मला फिनलंडला जाणं शक्यच नव्हतं.

असा चांगला अनुभव मुंबई एअरपोर्टवरिल कर्मचाऱ्यांचा... महिनाभरात सर्व आवश्यक ती कागदपत्रे, पासपोर्ट, व्हिसा, तिकीट बुकिंग पूर्ण झालं. त्याच्यासोबतच आनंदघरचं काम, मुलांची चित्र कार्यशाळा, दिवाळीची तयारी आणि सोबत फिनलंडला करावयाची प्रेझेंटेशनची तयारी, सर्व एका वेळी एका महिन्यात झाली. अर्थात या सर्व तयारीत एवढी मजा आली, गमतीजमती घडल्या, अनुभव मिळाले, ते सर्व छानच होतं.

या प्रवासात एकच गडबड झाली ती म्हणजे माझ्या मोबाईल फोनवर इंटरनॅशनल रोमिंग घेतलेलं परंतु काही कारणाने ते चालू झालं नाही. सकाळी सात वाजता आम्ही मुंबई एअरपोर्टवरून इस्तंबूलला रवाना झालो. तिथे पोहोचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की फोन चालू होत नाहीये. फोनवर रोमिंग चालू झालेला नाही. त्यामुळे आमचा सर्वांशी संपर्क तुटला. इस्तंबूल एअरपोर्टवर चार तास वेळ होता. तो पूर्णवेळ मी मोबाईलचा रोमिंग चालू कसे होईल याविषयी खटपट करत होते. परंतु त्यात काही यश आले नाही. त्यामुळे मला फिनलँडला आणि भारतात कुणाशी संपर्क करता येईना. एअरपोर्टवर पब्लिक फोनही नव्हता. मग ठरवलं फिनलँडला पोचल्यावर बघू. माझ्यासमोर अडचण ही होती की शिरीनकडे मी जाणार होते, पत्ता दिलेला होता, तरीही मला तिला संपर्क करून बस, ट्रेन याबद्दल विचारायचं होतं. अचानक रोमिंग सुरू न झाल्याने सर्व संपर्क तुटले होते. ही फार अनपेक्षित घटना होती. आता पुढचा प्रश्न होता रोमिंग सुरू झालं नाही तर शिरीनला संपर्क कसा करायचा आणि तिच्याकडे पोहोचायचं कसं?

 

संध्याकाळी सहा वाजता फिनलँडला पोहोचलो. पाहिलं काम फोन चालू करून बघणं, तर रोमिंग अजूनही सुरू झाला नव्हतं. काय करावं ते समजेना. तिथेही पब्लिक फोन नव्हता. त्या देशात मुख्यतः फिनिश आणि स्वीडिश लोक. त्यांना त्यांच्या भाषेशिवाय मोडकीतोडकी इंग्रजी येते, शिवाय एक्सेंट मध्ये खूप फरक. माझीही तीच गत. त्यांची भाषा, माझी भाषा, त्यांचा एक्सेंट, माझा एक्सेंट आणि त्यातून आमचा संवाद, सगळी मज्जाच मज्जा. तिथल्या काही लोकांशी बोलल्यावर कळलं की एअरपोर्टवर तात्पुरतं सिमकार्ड मिळेल. तिथल्या एका दुकानात गेले. मी त्यांना फोन विषयी सांगितलं. त्यांनीही रोमिंग सुरू करण्यासाठी काही खटपट केली. पण नाही झालं. शेवटी मी तात्पुरता नवीन सिमकार्ड घेतलं.  फोनमध्ये टाकलं तर ते नवं सिमकार्ड रीड होत नव्हतं. त्यांनी व मी बरेच प्रयत्न करूनही जुनं रोमिंग व नवीन सिमकार्ड काही चालू होईना. मला वाटलं गेले पैसे वाया. नवीन सिमकार्ड घेऊनही काही उपयोग नाही. आता काय, असा विचार करत असताना त्या बाई मला म्हणाल्या सिमकार्ड परत द्या मी तुम्हाला पैसे परत करते. हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होतं. त्यांनी चक्क सिमकार्ड परत घेऊन माझे पैसे परत केले. माणसाचं हे छान रुपडं बघून मी भावुक झाले आणि भावनेच्या भरात आपणही त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं म्हणून त्यांच्याकडून काही स्नॅक्स खरेदी केलं आणि त्यांचे आभार मानून त्यांचा निरोप घेतला. दुकानाच्या बाहेर पडले. अजूनही मनात प्रश्न, आता संपर्क कसा करायचा? तिथे पब्लिक फोन नाही याचं मला फार वाईट वाटलं. मग मी दोन-तीन लोकांना माझी अडचण सांगितली व त्यांचा वैयक्तिक फोन संपर्कासाठी मागितला. दोघा-तिघांनी नकार दिला. परंतु एअरपोर्टवरचा एक कर्मचारी त्याने त्याचा फोन दिला आणि त्याच्या फोनवरून मी शिरीनसोबत बोलले कसं यायचं ते विचारून घेतलं आणि माझ्याही घरी निरोप द्यायला सांगितलं. या प्रवासातला हा एवढाच संपर्क होऊ शकला. त्या कर्मचाऱ्याचे  आभार मानून  आम्ही शिरीनने सांगितल्याप्रमाणे एअरपोर्टच्या बाहेरच तांपेरेला (Tampere, Finland) जाण्यासाठी बस मिळणार होती, तिथे थांबलो. आम्ही थंडीसाठीची आभूषण जॅकेट, ग्लोव्हस, स्कार्फ घालून पूर्ण पॅक होऊन बसची वाट पाहात थांबलो. तिथलं तापमान होतं ० ते ५ अंश सेल्सियस. थोडासा पाऊस, वारा आणि गोठवणारी थंडी... आम्ही बसची वाट बघत होतो आणि थंडी झेलत-अनुभवत होतो. बस साधारणपणे 45 मिनिटांनी आली. खरं तर एवढी वाट बघावी लागत नाही, परंतु काही कारणामुळे याआधीची एक बस रद्द झाली होती.

 

आधीची बस रद्द झाल्यामुळे या बसला गर्दी झाली. काही लोकांना उभं राहून प्रवास करावा लागला. आम्हीही उभं होतो. तिथल्या लोकांशी गप्पा सुरू झाल्या. एक फिनिश बाई आम्हाला म्हणाल्या,'मी सँडविच खाते आणि मग तुम्हाला बसायला जागा देते.'

मी म्हटलं, 'नको, तुम्ही बसा आम्ही राहतो उभं.'

त्या काही ऐकेना, नको नको म्हणतानाही आग्रहाने मला बसवलं. साहिल माझ्या मांडीवर बसला. इतर लोकही साहिल सोबत गप्पा मारत होते. तिथे मुलांविषयी फार प्रेम, आदर अनुभवायला मिळालं. आम्ही खूप दमलो होतो. आदल्या रात्री अकरा वाजता आमचा प्रवास सुरु झाला. त्याला आता जवळपास 22 तास झाले होते. साहिल झोपी गेला. जरा वेळाने तांपेरेला बस थांबली. बाहेर प्रचंड थंडी. एक टॅक्सीवाला आमच्या समोर आला. तो स्वीडिश. त्याला जेमतेम इंग्रजी कळत होतं. त्याला मी मोबाईल मधला पत्ता दाखवून इथे जायचं सांगितलं. तो हो म्हणाला. टॅक्सीवाल्याचं विशेष कौतुक वाटलं. त्यानं व्यवस्थित पत्ता व्यवस्थित शोधून आम्हाला सोडलं. त्याने आम्हाला आणखी एक माहिती दिली. आज शनिवार आहे आणि इथे उशिरा टॅक्सी मिळत नाही. त्याचं हे वाक्य ऐकून डोळ्यासमोर काजवे चमकले. ही टॅक्सी किंवा कुठलीही टॅक्सी मिळाली नसती तर आम्ही कुठे आहोत, आमच्याशी संपर्काचा काहीही पर्याय नव्हता.

शेवटी शिरीनकडे पोचलो. त्यांच्याकडे गेल्यानंतर माझा दिव्य फोनचं रोमिंग वाय-फायसोबत कनेक्ट होऊन एकदाच सुरू झालं. जवळपास 24 तास फोनशिवाय, संपर्काशिवाय प्रवास करत आम्ही पोहोचलो.

या प्रवासात जी माणसं भेटली, जे अनुभव मिळाले ते समृद्ध करणारे होते.

 

यापुढच्या ६-७ दिवसात जगभरातील विलक्षण माणसं भेटणार होती. आणि जगात उत्तम शिक्षणपद्धती, व्यवस्था असा नावलौकिक असलेलं फिनलंड, तिथल्या शाळा, बालसंगोपन अभ्यासता येणार होतं. त्याची छोटी झलक या प्रवासात विविध लोकांना भेटून मिळाली होती. त्यामुळे उत्सुकता आणखी वाढली होती.

त्याविषयी पुढील भागात.

 

अँड. छाया गोलटगावकर

chhaya.golatgaonkar@gmail.com


No comments:

Post a Comment