आनंदघर लेख - १२ ' स्नेहसंमेलन
- भाग - १'
आनंदघरच्या
दुसर्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेलं (12 नोव्हेंबर 2017) आनंदघरातील स्नेहसंमेलन
म्हणजे उत्साहाचे, आनंदाचे दिवस.
खरंतर आनंदघरमध्ये दोन ते बारा वर्षे या वयोगटातील मुले येतात. कार्यक्रमाच्या वेळी तर त्यांची लहान-मोठी भावंडंही येतात. अगदी लहान लहान मुलांचा स्नेहसंमेलनातील सहभाग खूपच सुंदर असतो, आनंददायी असतो. या स्नेहसंमेलनाची पूर्वतयारी एक महिना आधीच सुरू होते. यात आनंदघरच्या ताई, मावशी, पालक उत्साहाने भाग घेतात. जणूकाही सर्वांचा हा मेळावाच असतो.
स्नेहसंमेलनाच्या
पूर्वतयारीत कुठलं गाणं म्हणायचं, कुठल्या गाण्यावर नृत्य करायच अशी सगळी चर्चा ताई,
मुलांमध्ये होऊन कार्यक्रमाची आखणी केली जाते. लहान मुलांना साजेशी गाणी व इतर कार्यक्रमांचे
निवड व आखणी केली जाते.
मग
हळूहळू सुरू होते प्रॅक्टिस.
'प्रॅक्टिस
म्हणजे काय तर भरपूर दंगामस्ती'. आनंदघरच्या
या पहिल्या स्नेहसंमेलनात मुलांनी हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत अशा भाषांमध्ये गाणी
गायली व सर्वांनी एकत्रितपणे 'टप टप पडती अंगावरती' या गाण्यावर सुंदर नृत्यही सादर
केले. त्यात भीती संकोच असं काही नव्हतं. तर प्रेक्षकांकडे फार लक्ष न देता स्वतःचा
आनंद, आनंदोत्सव ती साजरा करत होती.
याशिवाय
मुलांनी आणि पालकांनी मिळून 'एकटी एकटी घाबरलीस ना...' हे गीतही सुंदर गायलं. या सर्व
कार्यक्रमाची प्रॅक्टिस करताना मुलांनी जी दंगामस्ती केली ती वर्णनापलीकडची आहे. सादरीकरणातही
केलेल्या गमतीजमती भारीच होत्या!
आनंदघरच्या
ताया कशा मागे राहतील? त्यांनी 'हिच आमुची प्रार्थना...' या गाण्यावर दिपनृत्य सादर
केलं. या कार्यक्रमात आजींनीही नातवंडांसाठी सुरेख गाणी गायली.
हा कार्यक्रम बसवण्यात व सादरीकरणात ताई, मावशी, मुलं, पालक असे सर्वच कार्यरत होते.
स्नेहसंमेलनाचा उद्देश- मुलांना एका वेगळ्या सुंदर उपक्रमाचा अनुभव देण. लहान-मोठ्या सर्व प्रेक्षकांसमोर कार्यक्रम सादर करण. कौतुक, माया, प्रेम, शाबासकी याची थाप मिळणं. या अनुभवातून मुलं आणखीन काही वेगळं करण्याची शक्यता असते. असा कार्यक्रम आनंदघरच्या मुलांच्या शिकण्याचा, आनंदाचा भाग आहे. इतकंच काय! कार्यक्रमाच्या जेवणाचा मेनू मुलं, ताया, मावशी सगळ्यांनी मिळून ठरवला.
हा झाला कार्यक्रमाचा एक भाग.
याच
कार्यक्रमात मुलांनी वर्षभर काय काय उपक्रम केले, याचं प्रदर्शन भरवलं. पालकांना आपल्या
मुलांसोबत सर्व मुलांचे उपक्रम बघता येतात. याशिवाय मुलंही आपण काय काय बनवलं, हे माझं
आहे, हे माझ्या मित्र मैत्रिणीचं आहे, हे आई-बाबा, आजी-आजोबा यांना दाखवतात. त्यावेळी
त्यांच्या डोळ्यातील चमक निराळीच असते.
कार्यक्रमाचा
आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे मुलांसोबत काम करणाऱ्या दोन पाहुण्यांना आमंत्रित केलं
जातं. बालसंगोपनाच्या एखाद्या पैलूवर ते त्यांचे विचार मांडतात. या कार्यक्रमात दोन
पाहुण्यांना बोलवण्यातआलं.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निलीमाताई सहस्त्रबुद्धे (पालकनिती मासिकाच्या संपादक मंडळातील सदस्य) यांनी 'आपली आपली पालकनीती' या विषयावर झपालकांशी संवाद साधला. त्यांच्या मते बालसंगोपन करताना मुलांच्या मनाचा विचार करणे खुप महत्त्वाचे आहे. आपण सांगू तसंच मुलानं वागावं अशी अपेक्षा चुकीची आहे. बऱ्यावाईटाचा अंदाज त्याला यावा यासाठी त्याला स्वतः ला चुका करणं आणि त्यातून शिकणं आवश्यक आहे. अर्थात मुलाला हे ही कळले पाहिजे की प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार नाही. इतर माणसांचा विचारही आपण करणे आवश्यक आहे हे त्याला वाढीच्या वयातच कळले पाहिजे तरच तो एक जबाबदार नागरिक आणि चांगला माणूस बनू शकेल.'"
तसेच,
या कार्यक्रमाचे दुसरे पाहुणे डॉ. मोहन देस (आरोग्यभान चे कार्यकर्ते) यांनी 'बालसंगोपनात
बाबांची भूमिका' या विषयावर पालकांशी संवाद साधला.
त्यांच्या मते मुलाच्या संगोपनामध्यो वडिलांची भूमिकासुध्दा आई इतकीच महत्त्वाची असते. मुलाच्या वाढीच्या सगळ्या टप्यांमध्ये वडिलांनी मनापासून सहभागी झाले पाहिजे. मुलाला आईवडिलांचे आवाज व गंध खूप महत्वाचे असतात. स्पर्शाची भाषा ही महत्त्वाची असते. वडिलांनी मुलाशी ही भाषा विकसित करण्याची संधी सोडू नये. कारण हे दिवस पुन्हा मिळणार नसतात. एक समाधानाची गोष्ट आहे की हल्लीचे बाप/वडिल (प्रमाण कमी आहे) मुलांच्या संगोपनात सहभागी होतात.
ही
दोन तज्ञ मंडळी गेली अनेक दशकं मुलांसोबत काम करत आहे. अशा तज्ञ मंडळींचा पालकांशी
संवाद व्हायला हवा, असं मनापासून वाटतं. पालकत्व ही शिकण्याची गोष्ट आहे. पालकांच्या
मनात बालसंगोपनबद्दल बरेच प्रश्न असतात. त्या प्रश्नांचे समाधान अशा प्रकारच्या चर्चा
संवादातून निश्चितपणे घडेल असा विश्वास वाटतो. आजच्या काळाची ही गरज आणि महत्त्व ओळखूनच
आनंदघरी पालक, ताई, मावशी, तज्ञ मंडळी यांच्या संवादाचा हा प्रयत्न केला जातो.
अँड.
छाया गोलटगावकर
chhaya.golatgaonkar@gmail.com
No comments:
Post a Comment