Tuesday, June 23, 2020

आनंदघर लेख - ३२ 'पालक-शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा...'




आनंदघर लेख - ३२ 'पालक-शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा...'

काही शाळा, संस्थांमध्ये पालक-शिक्षक-कार्यकर्ते यांच्या प्रशिक्षणासाठी आमंत्रित केले गेले. त्या प्रशिक्षणाचा हा थोडक्यात घेतलेला आढावा.

आनंदघरच्या कामाचा भाग म्हणून शिक्षक-पालक - मुलांसोबत काम करणार्‍यांचं प्रशिक्षण घेतलं जातं. मुलांसोबत काम करताना व त्यांच्या शिक्षणातही प्रशिक्षण अत्यावश्यक आहे, हे आपण मागच्या दोन लेखांमध्ये पाहिलं.

(प्रशिक्षण भाग 1, लेख क्रमांक २९ प्रशिक्षण भाग 2, लेख क्रमांक ३०)

पुलगावच्या जिल्हा वर्धा येथील सेंट जॉन माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पालक- शिक्षक प्रशिक्षणासाठी आमंत्रित करण्यात आले. मुख्यतः बालवाडी पालक-शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण होतं. त्या प्रशिक्षणात विविध विषयांवर चर्चा झाली. पालक-शिक्षकांच्या मनात काही प्रश्नही होते.  ते त्यांनी मोकळेपणाने विचारले. पुलगाव हे छोटसं गाव आहे तिथं शाळेत येणारी मुलं त्या गावातली आणि आजूबाजूच्या गावातली वेगवेगळी कौटुंबिक पार्श्‍वभूमी असलेली ही मुलं सहाजिक त्यांची भाषाही वेगवेगळी आहे. भाषा मराठीच पण त्याच्या छटाही अनेक आहेत. त्यात ही मुलं बालवाडी प्रीस्कूल म्हणजे वय वर्ष तीन पासून इंग्रजी माध्यमात शिकतात ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन भाषेवरच एक दीर्घ सेशन घेतलं.

मुळात मूल भाषा कशी शिकतं? भाषा म्हणजे काय आहे? त्याचा उपयोग काय आहे? भाषा का वापरली जाते? किती प्रकारच्या भाषेत आपण बोलतो? अशा सर्व गोष्टींबाबत सविस्तर मांडणी केली भाषा विकासाच्या टप्प्याची सविस्तर विषयी मांडणी केली.

वयोगट--

० ते ३ - भाषेचा उगम

३ ते ६ -  भाषेचा विस्तार, चित्रगोष्टी, बोलणं इत्यादी

६ ते ९ - भाषेचा वापर.

९ ते १४ - भाषेची प्रगल्भता.

अशा टप्प्यातून मुलांचा भाषा विकास होत असतो. याची विविध उदाहरणाद्वारे मांडणी केली. मुळात मूल भाषा शिकतं कसं हे जर समजलं तर कुठलीही भाषा शिकण्या-शिकवण्यात त्याचा योग्य रीतीने वापर होतो.

आणि मुलांनाही ती भाषा सहजतेने जमायला लागते. परंतु भाषा शिक्षणाचे टप्पे गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे भाषा शिक्षणात अडथळे येतात व ती भाषा न जमल्यास आत्मविश्वास कमी होतो. भाषेची भीती वाटू लागते. भाषेविषयी नावड तयार होते. भाषा समजण्यातच अडचण यायला लागली तर इतर विषयातही अडचण निर्माण होऊ लागते. उदाहरणार्थ गणित, विज्ञान, इतिहास भूगोल इत्यादी, असे विषय समजण्यात जी अडचण असते ती म्हणजे भाषेतील समस्या. कुठलीही भाषा उत्तम पद्धतीने येण्यासाठी तिचा हर प्रकारे वापर आवश्यक आहे. म्हणजे ती भाषा--

ऐकणं,

बोलणं,

लिहिणं

आणि

सगळ्यात शेवटी व्याकरण.

या पद्धतीने गेल्यास भाषा शिक्षण, भाषा विकास उत्तम रीतीने जमायला लागतो.

खरं तर मानवी जीवनात भाषेचं प्रयोजन काय आहे? हे जरी समजलं तरी भाषा शिक्षण आणि भाषा विकास चांगला समजायला लागतो. मुळात भाषा कशासाठी, तर व्यक्त होण्यासाठी, संवादासाठी! भाषेची नावड आपल्या व्यक्त होण्यावर, संवादावर अडथळा निर्माण करते... म्हणून भाषा शिक्षण योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे...

प्रशिक्षणात शिस्त आणि शिक्षा यावरही घमासान चर्चा झाली. यात शिस्त म्हणजे काय यापासून ते शिक्षा का करावीशी वाटते? व त्याचे दूरगामी परिणाम काय आहेत? असा व्यापक मंथन पूर्वप्राथमिक शाळेच्या शिक्षकांबरोबर तसेच पहिली ते दहावीच्या शिक्षकांबरोबर झाली. दोन्हीही विषय मांडताना पूर्वप्राथमिक, पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी अशा वेगवेगळ्या टप्प्यावरच्या शिक्षकांशी संवाद साधू शकणं ही माझ्यासाठी तारेवरची कसरत होती.

हा अनुभव मलाही समृद्ध करून गेला. सर्व शिक्षकांनी मोकळेपणाने चर्चा केली. या विषयांबरोबरच विविध उपक्रम, त्यांचे नियोजन, मुलांच्या वाढीचे आणि विकासाचे टप्पे, व्यवस्थापन, मुलांच्या वर्तन समस्या अशा विषयांवरही सेशन्स घेतले. पालकांशीही संवाद साधता आला. त्यांचे प्रश्न, शंका जाणून घेऊन त्यांची मांडणी करताना विविध विषयांवरची  मांडणी करताना ज्याप्रमाणे पालक-शिक्षक यांचे प्रश्न येत होते त्यावरून असं लक्षात आलं की या विषयांच्या आणखीन खोलात जाऊन या विषयांशी संबंधित इतर  अनेक विषयावर सविस्तर मांडणी चर्चा आवश्यक आहे...

मुलांना वाढवताना शिकवताना अनेकानेक प्रश्न सर्वांच्या मनात येतात, त्यासाठी सातत्यपूर्ण प्रशिक्षणाची आवश्यकता आहे आणि अशा प्रशिक्षणाचा भर  मूल समजून घेण्यावर असावा.

अशा प्रकारचं प्रशिक्षण संध्या पन्हाळकरज् 'ज्ञानदा एबीसी प्ले स्कूल' येथील शिक्षकांचेही घेण्यात आलं. पुण्यातील खेळघरातही 'बाल गुन्हेगारी कायदा व समाज' या विषयावर मांडणी व चर्चा झाली त्यावर स्वतंत्र लेख प्रकाशित झालेला आहे. एकंदरीत प्रशिक्षण कार्यशाळेतील देवाणघेवाण सर्वांनाच समृद्ध करणारी असते...






No comments:

Post a Comment