आनंदघर लेख - २ ' मातीकाम शिबीर '
माती आपल्याला चुका करण्याच्या संधी देते
कार्यशाळेच्या शेवटच्या दिवसाचा शेवटा तास राहिला होता. पाच ते पंधरा वयोगटातील मुलं आपापल्या मातीच्या वस्तू
पूर्ण करण्यात गढून गेली होती. मातीच्या दिव्याला त्रिकोणी खिडक्या कापतांना पाच वर्षांच्या अव्दैताचा दिवा अचानक तुटला.
मिनीटभरात त्याचे तुकडे झाले. खिडक्या कापताना जास्त दाब दिल्यामुळे ते झालं. मी आणि सगळेच हळहळायला लागलो.
पण ती छोटी अगदी शांत होती. “त्यात काय मावशी, मी पुन्हाबनवेन दिवा. आता मला येतो बनवता.” हि सहजता मातीतनं
येते. मातीचा स्वभाव त्या छोटीला कळला आणि तिने तो समजून घेतला.
माती आपल्याला चुका करण्याच्या अनेक संधी देते. आणि चुकांमधनंच तर आपण शिकतो. मातीकामात निर्मिती जशी
महत्वाची असते तसाच किंवा त्यापेक्षा जास्त महत्वाचा असतो निर्मितीचा प्रवास. तो खूप काही शिकवून जातो.
मातीचा स्पर्श जादूई असतो. एरवी चिखल वाटणार्या मातीत हात घातल्यावर त्या स्पर्शाने आपण कमालीचे रिलॅक्स होतो.
माती भिजवणं, मळणं, पायांनी तुडवणं हे सगळं मी कार्यशाळेदरम्यान करायला सांगते. दर टप्प्यावर मातीचा बदलत जाणारा पोत
संवेदनशीलतेने अनुभवणं फार सुखद असतं. ज्या गोष्टींमुळे मुलांना एरवी ओरडा बसतो, म्हणजे कपडे का खराब केलेस, हात
मातीत का घातलेस, माती फेकू नकोस वगैरे बरंच काही – ते सगळं इथे करण्याचं स्वातंत्र्य या कार्यशाळेत दिलं जातं. माती जोरात फेकली तर कशी पसरते, पायांनी दाबल्यावर कशी मऊ मऊ होते हे त्यांना कळतं. मुलांना बंधनं नकोच असतात. आणि मग हे असं स्वातंत्र्य
मिळालं कि ती खुशीत असतात. मातीकाम करताना हायपर अॅक्टीव्ह म्हणवणारी मुलं जेव्हा तीन तीन तास सलग बसून मातीत काहीतरी बनवतात, तेव्हा आई वडील अचंबित होतात. मातीच्या वस्तू बनवताना डोळे, हात आणि मेंदू एकत्रितपणे कलात्मकतेने काहीतरी घडवत
असतात. तासन् तास एका जागी बसून मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासातही दिसून
येतो.
मुलं मातीत काहीतरी बनवतात. सुरूवातीला ते तुटतं, त्याल तडे जातात. अशा वेळी पाॅझिटिव्हली त्या मुलाला मार्गदर्शन
करणं आवश्यक असतं. मग काय केलं कि मातीचं भांडं नीट बनतं हे मुलं शोधतात. प्रयोग करून पाहणं आणि आलेली
अडचण सोडविण्याची क्षमता मुलात निर्माण करण्याचं खूप महत्वाचं काम माती करते.
मातीत काहीतरी बनवल्यानंतर मुलाचा आत्मविश्वासही वाढतो. एक तर आपले हात हे एक खूप पाॅवरफुल टूल आहे आणि आपण मातीपासून काहीतरी छान बनवू शकतो या भावनेनी मुलं confident होतात. आणि एकदा रुजलेला हा आत्मविश्वास कायम त्यांना सोबत करतो.
‘भाजणं’ हा मातीचा शेवटचा टप्पा असतो. भाजण्याआधी मातीत कितीहि प्रयोग करा, मोडा, पुन्हा बनवा. पण एकदा भाजलं की
पुढची काही हजार वर्षं तिची झीज होत नाही. वस्तू तुटेल पण झिजणार नाही. भाजल्यानंतर मातीचा प्रवास थांबतो. आणि
खरी मजा तर प्रवासात असते. मुलांकडून productive output ची अपेक्षा न करता त्यांना हा प्रवास करू द्यावा. खूप आनंद आहे त्यात.
दीप्ति विसपुते (आर्टिस्ट)
मातीकाम शिबीर... Pottery workshop
मातीत खेळायला प्रत्येकालाच आवडतं. क्वचित कुणी असेल ज्यांना माती आवडत नसेल. मातीत खेळणं, मातीच्या वस्तू बनविण, फळ, भाज्या, दिवे, किल्ले, मणी, दागिने, तलाव इत्यादी कितीतरी गोष्टी मातीच्या बनवल्या जातात. मुलं तासनतास मातीत रमतात. त्यात त्यांची सूक्ष्म (motor skills) कौशल्य विकसित होत असतात. खरं तर मातीत खेळणं मेंदूची गरजही आहे, म्हणून तर मुलं कायम माती खेळण्याकडे धाव घेत असतात. मुलांच्या दृष्टीने माती घाण नसते. याउलट मातीमध्ये बरबटण हा त्यांच्या अतिउच्च आनंदाचा भाग असतो. मेंदूचा, त्यातून स्त्रवणाऱ्या द्रवाचा, आनंदाचा, ताणतणावाचा व मातीमध्ये खेळण्याचा घनिष्ठ संबंध आहे. मातीमध्ये खेळणं ताण-तणाव कमी करतात. म्हणून याला थेरपी ही म्हटलं जातं. याविषयी तज्ञ व्यक्ती आणखी विस्ताराने सांगू शकेल. मुलांच्या आवडीच्या मातीला शी-घाण का म्हणायचं? मातीशी तर आपल्या प्रत्येकाची नाळ बांधलेली आहे. असो.
मातीचे अनेक प्रकार आहेत. त्यापासून रोजच्या जगण्यातल्या विविध वस्तू दागिने बनवले जातात व वापरले जातात. काही कलाकार (आर्टिस्ट) आहेत जे मातीतून वैविध्यपूर्ण कलाकृती निर्माण करतात. अशीच एक मनस्वी कलाकार आहे, दीप्ती विसपुते आणि तिची सहकारी मिताली आठल्ये. खूप दिवसांपासून मी व दीप्ती मुलांसाठी एक मातीकाम शिबिर ठरवत होतो. मागच्या आठवड्यात 8 व 9 (मे 2019) तारखेला हे शिबिर 5 ते 9 वर्षे व 10 ते 15 वर्षे या वयोगटातल्या मुलांसोबत पार पडलं. मुलांचा व पालकांचा उत्साह दांडगा होता.
शिबिराच्या पहिल्या दिवशी मेंढी, अगरबत्ती होल्डर - झाडांच्या पानांचे डिझाईन असलेलं, व मास्क बनवलं. यात मुलांना मेंढीच्या शरीरावरचे केस बनवण्यात फार मज्जा आली. खूप वेळ ती त्यातच रमली. मास्क बनवताना तर फारच धमाल केली. प्रत्येकाने आपापल्या कल्पनेनुसार बनवले. मुलांनी स्वतः एक्सप्लोर (explore) केलं, कुठल्याही सूचनेशिवाय, हे महत्त्वाचं आहे.
दुसऱ्या दिवशी दिवा व windchimes बनवलं. windchimes बनवताना ढग, पाण्याचे थेंब, पक्षी हे बनवायला मुलांना खूप आवडलं.
दोन दिवस मुलं तल्लीन होऊन या कलाकृती निर्माण करत होते. यात माती, तिचा स्पर्श, ती कशी वापरावी, वस्तू बनवताना काय काळजी घ्यावी, इतर टूल्स, कटर, झाडाची पानं कशी हाताळावी, असं सर्वकाही करून बघत होती. एकमेकांशी फारशी ओळख नसलेली मुलंही छान गप्पा मारत, स्वतःच्या कल्पना, वस्तू एकमेकांना देत होती, सांगत होती. कुणाच्या वस्तू मोडत होत्या, त्या पुन्हा पुन्हा बनवण चालू होतं. मनात, कल्पनेत जे होतं ते कलाकृतीत उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न चालू होता. दिवा बनवताना, त्याची जाळी तयार करायची होती, मुलांनी आपापल्या पद्धतीने वेगवेगळे जाळीदार डिझाईन्स बनवले.
खरतर ते जेव्हा जेव्हा आपलं, मनातलं काही करत होते तेव्हा त्यांचा आपल्या कल्पनांचा मातीशी असलेला सुंदर खेळ बघायला मिळाला. दिप्ती ताई, मिताली ताई ना मुलं सारखं विचारत होती, स्वतःची कलाकृती दाखवत होती. तायांची अगदी धावपळ चालू होती. खूप सुंदर पद्धतीने हे वर्कशॉप घेतलं गेलं. मुलांशी असलेला दिप्तीचा संवाद सुंदर होता. कमीत कमी आणि नेमक्या सूचना, शिवाय हवं तसं करण्याची मोकळीक यामुळे मुलांना हे सर्व मातीकाम करायला आवडलं.
या शिबिरामुळे मातीकामच्या मूलभूत गोष्टी मुलांपर्यंत नक्की पोहोचल्या. मातीची एखादी वस्तू मीही करून बघितली. आपली कल्पना मूर्तरूपात आणणं सोपं अजिबात नाहीये. कदाचित मुलांसाठी ते सोपं आहे. मोठ्यांना आपलं कंडिशनिंग बाजूला सारून कल्पनेला मूर्त रूप देणे जरा कठीण काम आहे.
सरतेशेवटी निर्मितीचा आनंद सुंदरच!!! पालकांना दाखविताना, मुलांच्याही व पालकांच्याही चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. पालकांची प्रतिक्रिया, "अरे वा, मुलांनी इतकं सुंदर बनवल." आपण बनवलेली कलाकृती घरी घेऊन जाणं, ती घरात सजविण अशा गप्पाही रंगल्या. शिबिरात घडलेली प्रक्रिया महत्वाची... असा अनुभव म्हणजे शिबीर छान झालं असं म्हणता येईल...
आनंदघर संचालक
अँड. छाया गोलटगावकर
No comments:
Post a Comment