आनंदघर लेख - ५ ' पारंपरिक
खेळ.....'
आनंदघरमध्ये
उन्हाळी सुट्टीची खूप धम्माल, मज्जा मुलांनी केली. मुळात शिबिराच नियोजन अशा प्रकारे
केलं होतं की मुलांना मज्जा येईल. वर्षभर शाळेत आणि सुट्टीला शिबिरात असं अडकण्याची
भावना त्यांच्यात येणार नाही याची काळजी घेतली. मुलांच्या हक्काची सुट्टी आहे. त्यामुळे
आधीच्या नियोजनात मुलांच्या सूचनेनुसार बदलही केले. आतापर्यंतच्या शिबिरात मुलांनी
मातीची भांडी, फळं बनवली, पारंपरिक खेळात चम्पलपाणी, लगोरी, डब्बा ऐसपैस, भोवरा, ठिकरीपाणी
अशा बऱ्याच खेळांची आखणी केली. तासनतास मुलं या खेळात रमली. काय तो आनंद, उत्साह! मुलांच्या
बरोबरीने आनंदघरच्या ताया आणि मावशीही धमाल करत होत्या. आधी वाटलं, की या खेळांना प्रतिसाद येईल की नाही. आता मात्र
खात्रीने सांगू शकते या प्रकारचे खेळ हवे आहेत मुलांना, खेळणी नको. किती वेगळं कौशल्य
लागत हे खेळ खेळायला! यातून मुलांना जे जे मिळतं ते कसं मोजणार?? Eye hand
coordination पासून ते भावनिक सक्षमता असं सर्व या खेळात दिसलं, जाणवलं।
याविषयीचे सविस्तर अनुभव जाणून घेऊ...
सोमवार ते शनिवार आठवडाभर हे शिबिर घेतल. त्यात सहा ते बारा वर्ष वयोगटाच्या मुलांसाठी नियोजन केलं होतं. त्यात जवळपास पंधरा ते अठरा खेळाचे नियोजन होतं. उदा. चंपलपाणी, ठिकरीपाणी, गोटया, डब्बा एक्स्प्रेस, चोर पोलीस लगोरी, दगड का माती, भोवरा इत्यादी.
पारंपरिक खेळ हे नाव जरी पारंपारिक असलं तरी याचा अर्थ लहानपणचे, आपल्या परिसरातील, स्थानिक खेळ असा आहे. पारंपारिक खेळ शिबिर व वाळवण शिबिर परिसरात सहजतेने घडणाऱ्या गोष्टी आहेत.
आज
मागे वळून बघताना, स्वतःचं बालपण आठवताना या साध्या गोष्टींनी आपलं बालपण आणि आजचं
आयुष्य किती समृद्ध केल आहे हे जाणवतं. शहरांमध्ये किंवा काही गावांमध्ये सुद्धा काही
कारणाने यासारखे अनुभव आज मिळत नाही. असे अनुभव मुलांना मिळावे यासाठी या शिबिराची
आखणी केली गेली.
मुलांकडे पुष्कळ महागडी खेळणी आहेत, परंतु, खेळण्यासाठी कोणी नाही. खरं तर मुलांना खेळणी नको, खेळ हवा, खेळासाठी सवंगडी हवेत. घराघरांमध्ये एकेकटी मुलं व भरपूर खेळणी आहेत परंतु या खेळणी त्यांना आनंद देत नाही. त्यापेक्षा खेळणी नसली तरी मुले एकत्र आल्यावर त्यांचे सुंदर खेळ शोधतात व त्यात भरपूर रमतात. पारंपारिक खेळ शिबिरातही अशाच प्रकारचे खेळ निवडण्यात आले, ज्यात खेळणी, साधनं कमी असतील. जवळपास पंधरा ते अठरा खेळाचे नियोजन होतं. उदा. चंपलपाणी, ठिकरीपाणी, गोटया, डब्बा एक्स्प्रेस, चोर पोलीस लगोरी, दगड का माती, भोवरा इत्यादी.
लगोरी
खेळ मुलांना खूप आवडला, त्यात दोन टीम असतात. एका गटाने एकावर एक रचलेले चपटे दगड बॉलच्या
साह्याने पाडणं व दुसऱ्या गटाने पुन्हा ती दगडं एकावर एक रचणं, तेही बॉलचा फटका न खाता.
असं गटात खेळताना माझा गट जिंकणं आणि तो जिंकण्यासाठी एकमेकांना सहाय्य करणं चालू होतं.
त्याचबरोबर काहीवेळा अटीतटीचा डाव झाला तरी रडीचा डाव न खेळण. या खेळात हरण- जिंकणं,
पडणं- लागणं, गटबाजी करणं, एकमेकांना सावरणं, चिकाटीने खेळणं असे सर्व छटा (शेड्स)
बघायला मिळत होतं. यातून मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक क्षमता दिसत होत्या.
एक
मुलगी सर्वच खेळ उत्तमरित्या खेळत होती, त्या त्या खेळासाठी आवश्यक असलेले नियोजन,
समय सूचकता, योग्य त्या शारीरिक हालचाली, समज इत्यादी तिच्याकडे होत. सगळ्यांना तीच
खेळणं खूप आवडलं. तिच्या पालकांना हे सगळं सांगितलं तेव्हा त्यांनी वेगळाच मुद्दा उपस्थित
केला. तिची एक बहीण आहे ती अभ्यासात हुशार
आहे आणि ही हुशार नाही. परंतु घरातले, बाहेरचे, ओळखीचे दोघींमध्ये तुलना करतात. तुलनेचा विषय आहे अभ्यास. पण हिचा अभ्यास नसल्यामुळे ही
फार खचून जाते, चिडचिड करते, हट्टीपणा करते. खरं तर मुलांमध्ये अशी तुलना करायला नको.
एखाद्याला आवडतो अभ्यास तर एखाद्याला नाही. त्यावरून तुलना करणं अजिबात योग्य नाही.
तिला ज्यात आवड नाही त्यावरून तिला टोचण्यापेक्षा
तिला ज्यात आवड आहे त्यासाठी प्रोत्साहन देणं, विश्वास देणं, आवश्यक आहे.
कित्येकदा
असं वाटतं कौतुक करण्याच्या बाबतीत आपला समाज निरक्षर आहे. मुलांमध्ये कितीतरी कलागुण
आहेत, विविध क्षमता आहेत पण त्या दिसत नाही, दिसल्या तरी कौतुक करावं वाटत नाही, त्यासाठी
प्रोत्साहन द्यावं वाटत नाही. अभ्यास ही एकच गोष्ट सर्वोत्तम आहे असं मानणाऱ्या समाजाचं
करायचं काय? त्यामुळे कित्येक खेळाडू, कलाकार, चौकटीबाहेरचं काम करणारी माणसं दुर्लक्षित
आहेत.
शिबिरात गोटया खेळताना मुलांना हाताची बोटं वापरणं थोडं कठीण गेलं. हाताचा वापर करणं माहित नव्हतं म्हणजे ती गोटी पकडायची कशी? मारायची कशी? त्याचे खेळ खेळायचे कसे? हे खेळण्यात मजा आली. चंपलपाणी, ठिकरीपाणी, दगड की माती हे खेळ खेळताना चार तास कधी होऊन गेले हे मुलांना कळलं नाही, डाव रंगला होता. त्यामुळे पालक आले तरी मुलांची घरी जाण्याची इच्छा नव्हती.
भोवरा हा खेळ बहुतेक मुलांना माहीतच नव्हता. एका
चौथीच्या मुलाला मयूरला भोवरा फिरवणं, तो तळहातावर उचलणं, भोवरा फाइट असं सगळं येत
होतं. त्याने त्याच्या सर्व करामती करून दाखवल्या.
त्यामुळे त्या दिवशी तो आमच्या सगळ्यांचा शिक्षक होता. मुलं उत्साहाने त्याच्याकडून
दोरी कशी गुंडाळायची ? तो फिरवायचा कसा? हे जाणून घेत होती. खूप प्रयत्न करूनही भोवरा
काही फिरेना. मुलांसोबत ताया सुद्धा भोवरा फिरवण शिकत होत्या. एका मुलाने, निमिषने
भोवरा आणि बेब्लेड, आधुनिक भोवरा यातला फरक
सांगितला. "बेब्लेड फिरवायला काहीच स्कील लागत नाही, तर भोवरा फिरवण काही सोपं
नाही. आमच्याकडे महागडी खेळणी आहेत पण हे साधेसाधे खेळ आम्हाला जमत नाही", त्याचं
म्हणणं अगदी खरं होतं. भोवरा फिरवताना एक पॉईंट सापडावा लागतो. हाताची ती विशिष्ट पोझिशन
आणि फेकण्याची कला जुळून आली की भोवरा फिरतो.
पारंपारिक खेळ शिबिरादरम्यान आनंदघरातील ताया सुद्धा
मुलांसोबत मनसोक्त खेळल्या, तो आनंद, उत्साह, धमाल मोठ्यांनाही स्वतःचे मोठेपण विसरून
तितकीच हवीहवीशी वाटते. असं वातावरण ताई व मावशी यांच्या विकासासाठी आवश्यक आहे. खेळ
ही एकमेव गोष्ट अशी आहे की ज्यात खेळणारी व्यक्ती मन, शरीर , बुद्धी सगळं वापरत असते. हे शिबिर घेण्यामागचा उद्देश फाईन मोटर
डेव्हलपमेंट, स्किल डेव्हलपमेंट शारीरिक, मानसिक, बौद्धिक व भावनिक विकास तसेच बाजारातल्या
भव्यदिव्य खेळण्यांना बळी न पडता साधे सोपे खेळ खेळणं. त्याच बरोबर उन्हाळ्याची सुट्टी,
सुट्टी सारखी जाऊ देणं हा होता.
"मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी भरपूर खेळायला मिळणं हा मुलांचा हक्कही आहे व त्यांच्या जडणघडणीचा महत्वाचा भागही आहे."
अँड.
छाया गोलटगावकर
chhaya.golatgaonkar@gmail.com
No comments:
Post a Comment