Aanandghar Articles
Tuesday, June 23, 2020
आनंदघर लेख - ३३ 'गुणवत्तापूर्ण बालसंगोपन सर्व मुलांसाठी....'
आनंदघर लेख - ३२ 'पालक-शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा...'
आनंदघर लेख - ३२ 'पालक-शिक्षक
प्रशिक्षण कार्यशाळा...'
काही
शाळा, संस्थांमध्ये पालक-शिक्षक-कार्यकर्ते यांच्या प्रशिक्षणासाठी आमंत्रित केले गेले.
त्या प्रशिक्षणाचा हा थोडक्यात घेतलेला आढावा.
आनंदघरच्या
कामाचा भाग म्हणून शिक्षक-पालक - मुलांसोबत काम करणार्यांचं प्रशिक्षण घेतलं जातं.
मुलांसोबत काम करताना व त्यांच्या शिक्षणातही प्रशिक्षण अत्यावश्यक आहे, हे आपण मागच्या
दोन लेखांमध्ये पाहिलं.
(प्रशिक्षण
भाग 1, लेख क्रमांक २९ प्रशिक्षण भाग 2, लेख क्रमांक ३०)
पुलगावच्या
जिल्हा वर्धा येथील सेंट जॉन माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पालक- शिक्षक प्रशिक्षणासाठी
आमंत्रित करण्यात आले. मुख्यतः बालवाडी पालक-शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण होतं. त्या
प्रशिक्षणात विविध विषयांवर चर्चा झाली. पालक-शिक्षकांच्या मनात काही प्रश्नही होते. ते त्यांनी मोकळेपणाने विचारले. पुलगाव हे छोटसं
गाव आहे तिथं शाळेत येणारी मुलं त्या गावातली आणि आजूबाजूच्या गावातली वेगवेगळी कौटुंबिक
पार्श्वभूमी असलेली ही मुलं सहाजिक त्यांची भाषाही वेगवेगळी आहे. भाषा मराठीच पण त्याच्या
छटाही अनेक आहेत. त्यात ही मुलं बालवाडी प्रीस्कूल म्हणजे वय वर्ष तीन पासून इंग्रजी
माध्यमात शिकतात ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन भाषेवरच एक दीर्घ सेशन घेतलं.
मुळात
मूल भाषा कशी शिकतं? भाषा म्हणजे काय आहे? त्याचा उपयोग काय आहे? भाषा का वापरली जाते?
किती प्रकारच्या भाषेत आपण बोलतो? अशा सर्व गोष्टींबाबत सविस्तर मांडणी केली भाषा विकासाच्या
टप्प्याची सविस्तर विषयी मांडणी केली.
वयोगट--
०
ते ३ - भाषेचा उगम
३
ते ६ - भाषेचा विस्तार, चित्रगोष्टी, बोलणं
इत्यादी
६
ते ९ - भाषेचा वापर.
९
ते १४ - भाषेची प्रगल्भता.
अशा
टप्प्यातून मुलांचा भाषा विकास होत असतो. याची विविध उदाहरणाद्वारे मांडणी केली. मुळात
मूल भाषा शिकतं कसं हे जर समजलं तर कुठलीही भाषा शिकण्या-शिकवण्यात त्याचा योग्य रीतीने
वापर होतो.
आणि
मुलांनाही ती भाषा सहजतेने जमायला लागते. परंतु भाषा शिक्षणाचे टप्पे गांभीर्याने घेतले
जात नाही. त्यामुळे भाषा शिक्षणात अडथळे येतात व ती भाषा न जमल्यास आत्मविश्वास कमी
होतो. भाषेची भीती वाटू लागते. भाषेविषयी नावड तयार होते. भाषा समजण्यातच अडचण यायला
लागली तर इतर विषयातही अडचण निर्माण होऊ लागते. उदाहरणार्थ गणित, विज्ञान, इतिहास भूगोल
इत्यादी, असे विषय समजण्यात जी अडचण असते ती म्हणजे भाषेतील समस्या. कुठलीही भाषा उत्तम
पद्धतीने येण्यासाठी तिचा हर प्रकारे वापर आवश्यक आहे. म्हणजे ती भाषा--
ऐकणं,
बोलणं,
लिहिणं
आणि
सगळ्यात
शेवटी व्याकरण.
या
पद्धतीने गेल्यास भाषा शिक्षण, भाषा विकास उत्तम रीतीने जमायला लागतो.
खरं
तर मानवी जीवनात भाषेचं प्रयोजन काय आहे? हे जरी समजलं तरी भाषा शिक्षण आणि भाषा विकास
चांगला समजायला लागतो. मुळात भाषा कशासाठी, तर व्यक्त होण्यासाठी, संवादासाठी! भाषेची
नावड आपल्या व्यक्त होण्यावर, संवादावर अडथळा निर्माण करते... म्हणून भाषा शिक्षण योग्य
पद्धतीने होणं गरजेचं आहे...
प्रशिक्षणात
शिस्त आणि शिक्षा यावरही घमासान चर्चा झाली. यात शिस्त म्हणजे काय यापासून ते शिक्षा
का करावीशी वाटते? व त्याचे दूरगामी परिणाम काय आहेत? असा व्यापक मंथन पूर्वप्राथमिक
शाळेच्या शिक्षकांबरोबर तसेच पहिली ते दहावीच्या शिक्षकांबरोबर झाली. दोन्हीही विषय
मांडताना पूर्वप्राथमिक, पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी अशा वेगवेगळ्या
टप्प्यावरच्या शिक्षकांशी संवाद साधू शकणं ही माझ्यासाठी तारेवरची कसरत होती.
हा
अनुभव मलाही समृद्ध करून गेला. सर्व शिक्षकांनी मोकळेपणाने चर्चा केली. या विषयांबरोबरच
विविध उपक्रम, त्यांचे नियोजन, मुलांच्या वाढीचे आणि विकासाचे टप्पे, व्यवस्थापन, मुलांच्या
वर्तन समस्या अशा विषयांवरही सेशन्स घेतले. पालकांशीही संवाद साधता आला. त्यांचे प्रश्न,
शंका जाणून घेऊन त्यांची मांडणी करताना विविध विषयांवरची मांडणी करताना ज्याप्रमाणे पालक-शिक्षक यांचे प्रश्न
येत होते त्यावरून असं लक्षात आलं की या विषयांच्या आणखीन खोलात जाऊन या विषयांशी संबंधित
इतर अनेक विषयावर सविस्तर मांडणी चर्चा आवश्यक
आहे...
मुलांना
वाढवताना शिकवताना अनेकानेक प्रश्न सर्वांच्या मनात येतात, त्यासाठी सातत्यपूर्ण प्रशिक्षणाची
आवश्यकता आहे आणि अशा प्रशिक्षणाचा भर मूल
समजून घेण्यावर असावा.
अशा
प्रकारचं प्रशिक्षण संध्या पन्हाळकरज् 'ज्ञानदा एबीसी प्ले स्कूल' येथील शिक्षकांचेही
घेण्यात आलं. पुण्यातील खेळघरातही 'बाल गुन्हेगारी कायदा व समाज' या विषयावर मांडणी
व चर्चा झाली त्यावर स्वतंत्र लेख प्रकाशित झालेला आहे. एकंदरीत प्रशिक्षण कार्यशाळेतील
देवाणघेवाण सर्वांनाच समृद्ध करणारी असते...
आनंदघर लेख - ३१ 'आनंदघर आणि पालकनीती पाळणाघर विशेषांक...'
आनंदघर लेख - ३१ 'आनंदघर
आणि पालकनीती पाळणाघर विशेषांक...'
आनंदघरी
गेल्या चार वर्षात वेगवेगळ्या प्रकारची कामं झाली. त्यात विविध शिबीरं, स्नेहसंम्मेलनं,
विविध सण-उत्सव साजरे करणं, नावीन्यपूर्ण उपक्रम घेणं, यासोबतच लहानांच्या नि मोठ्यांच्या
भावनिक स्थिरतेवरही काम झालं. आनंदघरच्याच कामाचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे
आनंदघरचे आउटरिच प्रोग्राम्स! बालसंगोपन केंद्रात वैविध्यपूर्ण काम होणं जितकं महत्त्वाचं
आहे तितकंच महत्त्वाचं आहे हे आउटरिच प्रोग्राम. या कामातही वैविध्य आहे. यात पालक-शिक्षक
प्रशिक्षण, एखाद्या ठिकाणी एका समूहासमोर व्याख्याते म्हणून एखाद्या विषयाची मांडणी
करणं, कन्सल्टन्सी देणं अशी विविध कामं अंतर्भूत आहेत.
आनंदघरच्या
या लेखमालेत यापूर्वीच्या लेखांमध्ये अशाच एका आऊट रिच प्रोग्राम बद्दल पाच भागात लिहिलं
आहे. त्या लेखांचं शीर्षक होतं 'फिनलंड (युरोप) अभ्यास दौरा' अशाच काही प्रोग्राम बद्दल
येत्या काही लेखांमध्ये लिहिणार आहे.
जुलै २०१७ मध्ये पालकनीती परिवाराने पाळणाघर विशेषांक
केला. खरं तर या विशेषांकाची सुरुवात सहा-सात महिने आधी झाली. खारघरच्या पाळणाघरातील
घटना नुकतीच घडून गेली होती. खारघरच्या घटने आधीही आणि नंतरही वेगवेगळ्या पाळणाघराच्या
काही घटना अधूनमधून चर्चेत राहिल्या. त्यानिमित्ताने पाळणाघर व बालसंगोपन या विषयावर
सविस्तर लिहिलं जावं असं वाटू लागलं. पालकनीती
परिवाराच्या प्रियंवदा बारभाई यांच्याशी या विषयावर तीन-चार वेळा बोलणं झालं, चर्चा
झाली यातून प्रियाताईंनी मला असं सुचवलं की "तू आनंदघरी बालसंगोपनाचे जे प्रयोग
करत आहेस, शिवाय तू वकीलही आहे तर या विषयी लेख लिहून, त्यात पाळणाघरविषयी सविस्तर
भूमिका मांडणं गरजेचं आहे. पालकनीतीच्या अंकात आपण असा विषय मांडू."
मला
ही कल्पना आवडली. या विषयावर सविस्तर लिहिणं मलाही अत्यावश्यक वाटलं कारण एखादी घटना
घडते त्यावर काहीतरी तीव्र पडसाद उमटतात जसे की पालकांचा दोष आहे, पोलीस काय करतात?
कायदा आहे की नाही? संचालकांचा दोष आहे इत्यादी. खरं तर समस्येच्या मुळापर्यंत जाऊन
काम करणं गरजेचं आहे. समस्या काय आहे? हे जाणून घेऊन मुळाशी काम होत नाही त्यामुळे
अशा घटना वारंवार घडत राहतात व पडसाद उमटत राहतात. हे सर्व टाळण्यासाठी कसं काम केलं
पाहिजे? कोणी असं काम केलं आहे का? संचालक, ताई-मावशी यांचे शिक्षण- प्रशिक्षण काय
असायला हवं? पालकांची भूमिका व जबाबदारी काय आहे? काय असायला हवी? पोलीस, समाज यांची
काय भूमिका काय असायला हवी? अशा सर्वच प्रश्नांचा उहापोह करणं आणि ते सविस्तर मांडणं
अत्यावश्यक आहे.
पालकनीती
परिवाराच्या डॉ. संजीवनी कुलकर्णी, त्यांच्याशी या विषयावर चर्चा झाली, या चर्चेत
बालसंगोपन
हा मुख्य धागा होता. मग ते बाळ कुणाचंही असो मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय, बांधकाम
मजूर, प्रॉस्टिट्यूट.... तर हे बालसंगोपन सर्वांचं आनंददायी असणं मूलभूत गोष्ट आहे.
प्रत्येक बालकाचा तो अधिकार आहे, हक्क आहे. यावर जेव्हा चर्चा झाली तेव्हा चर्चेअंती
संजुताई म्हणाल्या, "आता मला अंक दिसला". आणि पाळणाघर या संवेदनशील विषयावर
विशेषांक करण्याचे नक्की झाले.
पालकनीती
परिवाराने हा विषय उचलून धरणं कौतुकाचं आणि विशेष आहे. एकदा पाळणाघर विशेषांक करायचा
ठरला की पुढची तयारी सुरू झाली.मग कुठली पाळणाघरं, त्यांचं काय काय काम आहे? त्यांच्याशी
संपर्क कसा करायचा? त्यांच्या कामाविषयी जाणून घेऊन त्यांच्या कडून त्यांच्या कामाचा
आलेख घेणं, त्या-त्या पाळणाघरांना भेट देणं
अशी सगळी कामं सुरू झाली. मी आणि मृदुल कर्णिक आम्ही दोघींनी वेगवेगळ्या पाळणाघरांना
भेटी देणं, चर्चा करणं असं सगळं सुरू झालं. वेगवेगळ्या पाळणाघरांना भेटी देताना बालसंगोपन
विषयी नव्याने काही गोष्टी कळत होत्या. तसेच, तारा- मोबाईल क्रश, बांधकाम मजुरांच्या
मुलांसाठीचे पाळणाघर, स्वाधार..... हे बघताना, जाणून घेताना आश्चर्य आणि कौतुक असं
दोन्हीही वाटत होतं. संपूर्ण अंकाच काम करता करता एकीकडे बालसंगोपनाविषयी दिलासा देणाऱ्या
घटना घडत होत्या तर दुसरीकडे यावर खूप काम व्हायला हवं असं प्रकर्षाने वाटत होतं.
भारतीय
संविधान आणि बालकांसाठीचे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायदे आणि योजना बघितल्या
तर असं लक्षात येतं की -- 'मूल हे मूल आहे.'
गुणवत्तापूर्ण
बालसंगोपन व शिक्षण मिळणं हा प्रत्येक मुलाचा
हक्क आहे त्यांच्या या हक्कांची जबाबदारी,
हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी मोठ्यांवर आहे. मूल कुठल्याही जाती, धर्म, प्रांत, भाषा,
वर्ण, देश, लिंगाचं असो, मूलभूत बालसंगोपनाचे व शिक्षणाचे टप्पे जवळपास सर्वांचे सारखेच
असतात. तर अशा या
बालहक्कासाठी
विविध स्तरातील लोक प्रयत्नशील आहेत. पण असं सर्जनशील काम करणाऱ्यांची संख्या कमीच
आहे. त्यात अनेक अडचणीही आहेत. एकतर मुलांच्यासोबत काम करण्यासाठी ---
१)
प्रशस्त मोकळी जागा असणं.
२)
ताई- मावशींच्या पगारासाठी पैसा असणं.
३)
Infrastructure साठी पैसे असणं.
४)
ताई, मावशी,संचालक यांना सातत्यपूर्ण प्रशिक्षण असणं.
५)
यासाठीचे कायदे असणं.
हे
सगळं घडण्यासाठी शासनाने गंभीरपणे याकडे पाहणं व योग्य ती भूमिका घेणं अत्यंत आवश्यक
आहे. यासोबतच पालक व समाज बालसंगोपनाविषयी सजग असणं गरजेचं आहे. शेवटी बालसंगोपन काही
आपोआप मुलं होतील, आपोआप वाढतील असं नाही. कित्येकदा जुन्या व
नव्यापिढीतील
लोक असं बोलताना आढळतात परंतु बदलत्या काळानुसार बालसंगोपन अधिक गंभीरपणे जाणून घेणं
आवश्यक आहे.
साधारणपणे
10 वर्षांपर्यंतचं वय अत्यंत महत्वाचं असतं. मानसशास्त्रतज्ज्ञांच्यानुसार या वयात ज्या प्रकारचं बालसंगोपन मुलांचं असतं त्याचे
काही पॅटर्न बनतात. हे पॅटर्न्स वय वर्ष सहा ते दहाच्या आतच तयार होतात आणि ते त्या
व्यक्तिमत्त्वात आयुष्यभर रिपीट होत रहातात. त्यामुळे हे वय अत्यंत महत्त्वाचं आहे
म्हणून बालसंगोपन आणि शिक्षण (ई सी सी ई) याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि हे प्रत्येक
मुलाच्या बाबतीत तितकचं महत्त्वाचं आहे, त्यामुळे पालकनीतीच्या पाळणाघर विशेषांकात
सर्व मुलांच्या गुणवत्तापूर्ण बालसंगोपनाची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे.
या
अंका दरम्यान काही अडचणी आल्या. अंकाचं काम पूर्णत्वाकडे येत असताना अचानकपणे आनंदघरच्या
ताई व मावशी वेगवेगळ्या कारणासाठी महिनाभर नव्हत्या त्यांची कारणही खरी आणि प्रामाणिक
होती. त्या काळात दिवसभर आनंदघरचं काम सांभाळून रात्री अंकाचं काम व त्यातल्या माझ्या
दोन लेखांचं काम मी पूर्ण केलं. अडचणी तर येणारच! त्या काही नवीन नाही पण अशा अडचणींमध्ये
तुम्हाला साथ मिळाली, सोबत मिळाली की अडचणींचं काही वाटत नाही. आनंदघरचेच काही पालक
मदतीला धावून आले. आज मी हे शांतपणे लिहू शकत आहे आणि हसूही येत आहे पण त्यावेळी तो
प्रत्येक क्षण पहाडासारखा होता. आपला कस लागण्यासाठी बहुदा असे क्षण येत असावेत.
आनंदघर लेख - ३० 'आनंदघरच्या कामाचा आत्मा-सातत्यपूर्ण प्रशिक्षण… (भाग - २)'
आनंदघर लेख - ३० 'आनंदघरच्या
कामाचा आत्मा-सातत्यपूर्ण प्रशिक्षण… (भाग - २)'
आनंदघरच्या
सुरुवातीलाच आनंदघर सोबत काम करणाऱ्या ताई व मावशींना प्रशिक्षण द्यावं लागेल असा विचार
मनात होता. मग त्या प्रशिक्षणाचे स्वरुप, उद्देश काय असेल यावरही विचार झाला. यातून
प्रशिक्षणासंबंधी एक आराखडाच तयार झाला. त्याचा उपयोग प्रत्यक्ष काम करताना झाला. प्रत्यक्ष
काम करताना ही प्रशिक्षण संबंधीच्या महत्त्वपूर्ण बाबी लक्षात येऊ लागल्या. महत्त्वपूर्ण
प्रशिक्षणासाठी कामातून येणारे अनुभव खूप उपयोगी ठरू लागले. त्यातील काही मुद्दे--
१)
सुरक्षितता : मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य आहे. त्यासाठी परिसर सुरक्षित असणं
आवश्यक आहे. मुलांना इजा होवू नये यासाठी ताई मावशींनी कात्री, चाकू इ. वस्तू त्या
त्या वेळी जागेवर ठेवणे आवश्यक आहे. छोट्या मुलांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं.
खेळताना एखादा मणी, दगड ते तोंडात, नाकात घालू शकतात. मुलांची आपापसातील भांडणं, एकमेकांवर
माती, वाळू फेकणं, त्यातून इजा होऊ नये यासाठी खबरदारी घेणं, अशा कितीतरी छोट्या छोट्या
गोष्टी प्रशिक्षणात बोलल्या जातात. रोजच प्रशिक्षण आणि 15 दिवसांनंतर होणारी मीटिंग
दोन्ही महत्वाच्या आहेत. त्यात ताई आणि मावशींना काही विचारायचे असेल किंवा काही समजले
नसेल अशा सर्व गोष्टींची चर्चा ठरलेल्या दिवशी होते. अशी चर्चा-मिटिंग मुलांच्या व
ताई मावशींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. सुरक्षितता केवळ शारीरिक नाही तर मानसिक, भावनिक
याबद्दल आधीच्या लेखात मांडणी केली आहे, पातळीवर सुद्धा असायला हवी याकडे लक्ष द्यायला
हवं.
२)
स्वच्छता : वैयक्तिक स्वच्छता, मुलांची स्वच्छता, आनंदघरच्या परिसराची स्वच्छता, नीटनेटकेपणा
याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही ताई मावशी मुळातच स्वच्छ आणि नीटनेटक काम करतात.
परंतु काहींच्या बाबतीत प्रशिक्षणात या गोष्टी सांगाव्या लागतात.
उदा.
मुलांचं चित्रकाम करायचं असेल तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, काय पूर्वतयारी
लागणार आहे, चित्रकाम कसं घ्यायचा आहे, मुलांसोबत काय बोलायचं आहे अशा कितीतरी गोष्टींची
तयारी करावी लागते... शिवाय मावशींची किंवा इतर कोणाची या उपक्रमासाठी काय मदत घ्यावी
हेही ताईला माहिती असणं आवश्यक आहे. काही तायांनी असे उपक्रम घेताना या प्रकारे पूर्वतयारी
केलेली नसल्याचे आढळून आले. म्हणून सातत्यपूर्ण प्रशिक्षणाची गरज आहे. काही ताई, मावशी
मात्र अगदी सर्जनशीलतेने उपक्रम घेतात त्यातून त्यांना नवीन काही गवसत असतं. यामुळे
एक लक्षात आलं की काही जणींकडे काही गुण उपजतच छान असतात, काहींना मात्र प्रयत्न करायला
लागतात प्रशिक्षण घ्यायला लागतं.
३)
प्रथमोपचार-काही उपक्रम घेताना कात्री, सूरी अशा वस्तूंचा वापर केला जातो. त्या वस्तू
व्यवस्थित हाताळणं गरजेचं असतं नाही तर इजा होऊ शकते. काही खेळ उपक्रम घेताना मुलांना
गंभीर दुखापत होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. अशावेळी मुलांना ठामपणे सांगता
येणं आवश्यक असतं.
कितीही
काळजी घेतली तरी मुलं धडपडतात. मुळात धडपडणं हा मुलांचा स्वभाव असतो अशावेळी प्रथमोपचार
करता येणं हा प्रशिक्षणाचा महत्त्वाचा भाग असतो. यात मलमपट्टी करणं, पालकांच्या सूचनेनुसार
औषध देणं, मुलांचा ताप मोजता येणं, गरज पडल्यास मुलांना दवाखान्यात नेणं, पालकांना
सुचित करणं असं सगळं प्रशिक्षण गरजेचं असतं. मुक्का मार लागल्यावर बर्फाने शेकणं, मुलं पडली- त्यांना किती लागलं, रडत आहे,
अशावेळी आपण पॅनिक न होता मुलांना शांत करणं. फार प्रश्न- बडबड, आरडाओरडा न करणं व
शांतपणे प्रथमोपचार करणं आवश्यक आहे. मूल आधीच घाबरलेलं असतं त्यात आपलं घाबरणं, ओरडणं,
प्रश्न विचारणं टाळायला हवं.
४)
मुलांच्या आहाराविषयी : आनंदघरी चॉकलेट, बिस्कीट, बेकरीपदार्थ शक्यतो दिले जात नाहीत.
मात्र काही वेळा मुलांच्या डब्यांमध्ये हे पदार्थ असतात त्यावेळी पालकांना हे सूचित
करणं गरजेचं असतं. साधारणपणे वय वर्षे दोन पासून मुलांनी स्वतःच्या हाताने जेवण करणं
तेही पूर्ण जेवण करणं, त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं आवश्यक असतं. काही मुलं स्वतःच्या
हाताने खात नाही, भाज्या खात नाहीत अशावेळी गाणी-गोष्टीसहित मुलांना भरवायला हवं, मुलांनी
स्वतःच्या हाताने जेवणं जेवढं महत्वाचं तेवढंच मुलं उपाशी राहायला नको याची काळजी घ्यायला
हवी. जेवणाआधी- जेवणानंतरच्या स्वच्छतेविषयी मुलांशी बोलायला हवं.
५)
शि-शु-उलटी, झोप : साधारणपणे दीड ते दोन वर्षाच्या मुलांना शि-शु बद्दल सांगता येतं,
काहींना सांगता येत नाही. त्यांना ती सवय लावण्यासाठी ठराविक वेळाने शि-शुसाठी नेणं
व त्यांना सवय होईपर्यंत रोज सांगणं आवश्यक आहे. (मुलांना बरं नसलं की उलटी होते).
काहीही झालं तरी त्यावेळी जी मावशी ताई तिथे आहे, तातडीने तिने मुलांचे कपडे बदलणे
साफसफाई करणं अत्यावश्यक आहे. ज्या मुलांना पॅन्टमध्ये शी शु होत असेल झोपेत होत असेल
आणि इतर मुलं चिडवत असतील तर मुलांशी बोलणं आवश्यक आहे.
मुलांना
दुपारच्यावेळी झोपताना मायेचा स्पर्श हवा असतो. गाणी-गप्पा-गोष्टी करत मुलांना झोपायला
आवडतं, हलकसं संगीत मुलांना झोपताना लावायला हवं. त्याचबरोबर मुलांची झोपण्याची खोली,
त्यांचं अंथरूण-पांघरूण स्वच्छ व नीटनेटकी असावी लागतात.
वरील
सर्व प्रशिक्षणातील काही उदाहरणं झाली अशाप्रकारे बारीक बारीक मुद्द्यांचा विचार करून
प्रशिक्षण दिलं जातं. आयत्यावेळेला काही नवीन मुद्देही समोर येतात, त्यावरही चर्चा
केली जाते.
६)
पालकांशी संवाद : प्रशिक्षणातील हा खूप मोठा भाग असतो.(पालकांशी संवाद या लेखात , लेख
क्रमांक - 28, आनंदघर लेखमाला, यात याविषयीचे मुद्दे आलेले आहेत)
७)
ताई-मावशी यांचं आपापसातील नातं, प्रशिक्षणामुळे आणि सर्व ताई, मावशींवरील विश्वास
यामुळे प्रेमाचं आणि घट्ट आहे. काही अडचण आल्यास एकमेकींना सांभाळून घेतात एकमेकींच्या
वेळा ॲडजस्ट करतात.
प्रशिक्षणात
आणखीही खूप गोष्टी केल्या जातात. सगळ्यांचा उल्लेख इथे करणे शक्य नाही. त्यामुळे उदाहरणादाखल
काही मुद्दे दिले आहेत. प्रशिक्षणाबाबत नवीन विचार येत असतात. आत्तापर्यंत केलेला विचार
व त्याची अंमलबजावणी, तसेच प्रत्यक्ष काम करताना ज्या नवीन गोष्टी, मुद्दे समोर येतात
त्यांची दखल घेऊन प्रशिक्षणात समाविष्ट करणं अशी ही प्रक्रिया चालू असते. आत्तापर्यंत
केलेल्या कामावरून असं म्हणता येईल, काही गोष्टी समजल्या, उमजल्या, काही गोष्टी करून
बघता आल्या, काही गोष्टी ठरवल्या तशा नाही झाल्या, अशा या प्रशिक्षण प्रक्रियेच्या
विविध छटा आहेत…..
अजून
बऱ्याच काही छान छान कल्पना आहेत, वेगवेगळं करून बघायचं आहे, लांबचा पल्ला.....
आनंदघर लेख - २९ 'आनंदघरच्या कामाचा आत्मा-सातत्यपूर्ण प्रशिक्षण... भाग-१'
आनंदघर लेख - २९ 'आनंदघरच्या
कामाचा आत्मा-सातत्यपूर्ण प्रशिक्षण... भाग-१'
आनंदघरच्या
कामाविषयी लिहिताना या आधीच्या लेखात मुलांसोबतच काम, कामाचं स्वरूप, उपक्रम, सण-उत्सव,
शिबीरं, दैनंदिन कामकाज, मुलांशी- पालकांशी संवाद, ताई- मावशींसोबत (मदतनीस) संवाद...
अशा विविध पैलूंवर लिहिलं... अर्थात अशा सर्व पैलूंवर काम करणारी, कार्यरत असलेली आनंदघरची
टीम आहे... आनंदघरसोबत कार्यरत असणाऱ्या ताई-मावशी हा या टीमचा महत्वाचा भाग आहे. आनंदघरच्या
तायांनी बालविकासाचा अभ्यास पूर्ण केलेला असणं गरजेचं आहे. तरीसुद्धा आनंदघरच्या कामाचे
वेगळंपण जाणून घेण्यासाठी, समजून-उमजून त्यावर काम करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रशिक्षण
अत्यावश्यक आहे, हे आनंदघरच्या कामाचं वैशिष्ट्यही आहे. त्यानुसार तायांना जरी त्यांनी
बालविकासाचा कोर्स पूर्ण केलेला असला तरी आनंदघरी सातत्यपूर्ण प्रशिक्षण दिलं जातं.
यात उपक्रम कसे घ्यायचे इथपासून ते मुलांसोबत बोलायचं कसं, संवाद कसा साधायचा, पालकांशी
संवाद कसा साधायचा, असं सर्व घेतलं जातं.
त्याच
बरोबर असंच सातत्यपूर्ण प्रशिक्षण मावशींचही घेतलं जातं. मावशींचं कुठलंही शिक्षण-
प्रशिक्षण झालेलं नसतं. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणावर जास्त भर द्यावा लागतो. ताई-
मावशी कोणाचीही नियुक्ती करताना प्रशिक्षण घ्यावे लागेल असं सांगितलं जातं. शिकण्याची
तयारी असणाऱ्यांनाच प्राधान्य दिलं जातं.
कित्येकांना
असा प्रश्न पडेल की, बालविकास शिक्षण- प्रशिक्षण, सातत्यपूर्ण प्रशिक्षणाची गरज काय
आहे? का यावर जास्त भर द्यायला हवा? आपण वर्तमानपत्रात बातम्यांवर बघतो- ऐकतो- वाचतो,
"अमुक-अमुक
पाळणाघरात दोन वर्षाच्या मुलाला मारहाण झाली",
"अमुक-अमुक पाळणाघरात एक वर्षाच्या मुलाला तोंडावर
चिकटपट्टी लावण्यात आली",
"अमुक-अमुक
पाळणाघरात मुलांना झोपवण्यासाठी औषध देण्यात आलं, असा संशय....."
या
बातम्यांनुसार आरोप-प्रत्यारोप सुरू होतात... मावशीचं चुकलं, संचालकांची जबाबदारी,
पालकांचं चुकलं, मुळात आईने मुलांकडे लक्ष द्यायला हवं, पोलिसांचा- कायद्याचा धाक हवा
इत्यादी चर्चा घडतात. पोलीस, कायदे- न्यायव्यवस्था आपले काम करतील, पण अशा घटनांचं
मूळ काय आहे... हे समजून त्यावर काम करायला हवं.
याप्रकारे
काम करण्याचा प्रयत्न आनंदघरी केला जातो, तो काही उदाहरणाद्वारे समजावून घेवू.....
आनंदघरी
ज्या ताई - मावशी कार्यरत होत्या आणि आहेत त्या कशा प्रकारे काम करतात त्यानुसार प्रशिक्षणात
बालविकासाच्या मूलभूत बाबींसोबतच इतर कुठल्या मुद्द्यांवर भर द्यायचा हे ठरतं... कुणी
खाऊ छान बनवतं, कुणी उत्तम स्वछता करतात, कुणी मुलांशी छान गप्पा गोष्टी करतात इत्यादी...
थोडक्यात त्यांच्या आवडीनुसार, कलानुसार, क्षमतेनुसार प्रशिक्षण दिलं जातं... त्यांचं
निरीक्षण करणं चालू असतं. त्या मुलांसोबत कसं बोलतात, मुलांची गाणी गप्पा-गोष्टी- उपक्रम
कसे घेतात, मुलांचं शी-शु, त्यांना जेवू घालणं, झोपवणं कशा प्रकारे करतात... त्यांचा
पालकांशी आणि आपापसात व्यवहार कसा आहे. अशा सर्व बाबींची नोंद घेतली जाते. अशा नोंदींचा
प्रशिक्षण देण्यासाठी फार उपयोग होतो. ताई- मावशी स्वयंप्रेरणेने, स्वतःहून काय काय
करतात याचा आधी अंदाज घेणे गरजेचं असतं. सुरुवातीला आनंदघरच्या कामाविषयी व्यवस्थित
माहिती दिली जाते... परंतु सगळ्या कामाचा आवाका केवळ प्रशिक्षणात सांगणं शक्य नसतं,
त्यामुळे निरीक्षण, नोंदी व त्यानुसार सातत्यपूर्ण प्रशिक्षण हे चालू असतं. मावशींचा
अंदाज घेत घेत जे काम त्या स्वतःहून उत्तम रीतीने पार पाडतात तिथे काही गोष्टींबद्दल
बोलणं पुरेसं असतं. 'छान काम करत आहात' अशी शाब्बासकीही महत्त्वाची असते. परंतु काही
वेळा काही कामांमध्ये माहिती नसते, जमत नाही अशा वेळी काय व कसं करायचं हे व्यवस्थित
सांगितलं जातं. असं करण्यामागचा उद्देश असा आहे की ताई-मावशींमध्ये असलेली सर्जनशीलता,
कल्पकता महत्त्वाची आहे... त्यांनाही तो अवकाश देणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्यावर
विश्वास असणं अत्यावश्यक आहे. त्यांच्यावर दाखवलेला अविश्वास मुलांपर्यंतही पोहोचतो
त्यामुळे असा अविश्वास नकोच! खरंतरं अविश्वासाचं मूळ काय आहे? याचाही विचार केला पाहिजे.
त्यासाठी ताई व मावशी कुठल्या परिस्थितीतून येतात व कशा परिस्थितीत काम करतात हे समजावून
घेणं गरजेचं आहे. थोडक्यात समजून घ्यायचं असेल तर आपली समाजरचना समजून घेणं गरजेचं
आहे. या समाजरचनेत स्त्रीचं असलेलं स्थान त्यातही मावशी म्हणून जी स्त्री काम करत असते,
कित्येकदा ती कुठून येते... छोट्या गावातून शहरात असेल तर एखाद्या वस्तीतून, शिक्षणाची
पुरेशी संधी तिला मिळालेली नसते, गरिबी किंवा जेमतेम परिस्थिती असते, लवकर झालेलं लग्न
त्यामुळे मातृत्वही लवकर आलेलं असतं. कुटुंबात तिची दखल काही प्रमाणात घेतली जाते किंवा
फारशी घेतली जात नाही... कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून कुटुंबासाठी व मुलांसाठीच
चार पैसे मिळवायला ती बाहेर पडते. तिचं काम कुठे कमी होतं का? तर नाही! याशिवाय विविध
कारणांनी (व्यसन) इत्यादी कुटुंबात असलेले ताणतणाव मतभेद अशा सगळ्या परिस्थितीला तोंड
देत ती कामावर येते. या कामाच्या निमित्ताने तिला एक स्व:विकासाची संधी मिळते. या संधीसाठी
आपणही प्रशिक्षणाच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करायला हवा.
आनंदघरमध्ये
मी खूप गुणी मावश्या (मदतनीस) बघितल्या. सुरुवातीला वैशाली मावशी होत्या. अत्यंत स्वच्छ
सुंदर आणि नीटनेटकं काम, जबाबदारी घेण्याची आणि पार पडण्याचं उत्तम कौशल्य. सुरुवातीला
त्यांना काही गोष्टी समजावून सांगितल्या... फोनवर कसं बोलायचं, पालकांशी कसा संवाद
साधायचा, पाहुण्यांशी कसं बोलायचं, हे त्यांनी शिकण्यापेक्षा त्यांच्या अंगचीच हुशारी
जास्त होती... मला जसजसे त्यांचे हे गुण दिसत होते तसतसे त्यांच्यावर जास्तीची जबाबदारी मी सोपवू लागले.
त्यांचा आवाजही छान, गाणी उत्तम म्हणायच्या, मुलांना गोष्टी सांगायच्या, काही दिवसांमध्ये
तर नवीन नवीन गोष्टी रचून सांगू लागल्या. शांत आणि प्रेमळ स्वभाव यामुळे मुलांच्या,
पालकांच्या आनंदघरच्या त्या लाडक्या मावशी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाल विकासाविषयी,
पालकत्वाविषयी जी पुस्तकं आनंदघरमध्ये आहेत ती त्या वाचायच्या. उत्तमरीतीने काम करणाऱ्या
ताई-मावशींना प्रशिक्षणाची जोड मिळाली की त्यांचं काम आणखी खुलतं.
अश्विनी
मावशीचं असं वैशिष्ट्य की त्या मुलांसाठी उत्तमोत्तम खाऊ बनवायच्या. अळूवडी, थालीपीठ,
धपाटे खमंग बनवायच्या. मावशींनी काय बनवले याचा खमंग सुवास 3 वर्षच्या तन्वीला मावशींकडे,
स्वयंपाकघरात घेऊन यायचा.
शुभांगी
मावशींनी सुद्धा आनंदघर प्रेमाने सांभाळलं. मुलांसोबत गाणी, गप्पा, गोष्टी, खाऊ बनवणे
अशी सर्व काम उत्तमरित्या पार पाडली. सुरुवातीला त्या खूप घाबरायच्या जरा काही अडचण
आली की काम सोडते म्हणायच्या. मग त्यांच्याशी बोलणं, समजून सांगणं चालू असायचं. एका
वाक्याचा मात्र त्यांच्यावर चांगला परिणाम झाला, कुठलंही काम केलं तरी अडचणी येणारच
काम बदलण्यापेक्षा अडचणींमधून मार्ग काढणं महत्त्वाचं आहे असा मार्ग नेहमी काढायला
हवा...
मुलांसोबत काम करणं म्हणजे काही एखाद्या इंडस्ट्रीत
काम करण्यासारखं नाही. इथे आपली देवाण-घेवाण एखाद्या चैतन्याशी असते. त्यामुळे इथलं
वातावरण मुलांसाठी, ताई-मावशींसाठी आनंदाचं, खेळीमेळीचं आणि जबाबदारीचंही असतं... आनंदघरचं
काम सगळ्या टीम च्या साह्याने चालतं त्यामुळे टीम शिक्षित, प्रशिक्षित असणं आवश्यक
आहे. केवळ मला एकटीला (संस्थापक-संचालकांना) बालविकास समजून उपयोगाचं नाही. माझ्या
सहकाऱ्यांबरोबर चालता येणं महत्त्वाचं... आनंदघर मध्ये उतरंड नाही. सोयीसाठी म्हणून
ताई- मावशी शब्द वापरले जातात. परंतु उतरंड मानत नाही आणि पाळत ही नाही. आनंदघरच्या
स्नेहसंमेलनात मुलांसोबतच ताई-मावशींचाही सहभाग असतो. एका वर्षीच्या स्नेहसम्मेलनात
शुभांगी मावशींनी मनोगत मांडलं. स्वतः कागदावर लिहून आणलं होतं. खूप भीती वाटत होती
म्हणाल्या," नाही जमणार!" पण प्रत्यक्ष स्टेजवर गेल्यावर कागदही न बघता आत्मविश्वासाने
मनोगत व्यक्त केलं.
सरिता
मावशी उत्तम काम करतं. पण त्यांचं मन मात्र कायम तळ्यात-मळ्यात असायचं. त्यांनी वेगवेगळ्या
ठिकाणी कामं केली होती.
तिथल्या
अनुभवानुसार त्या एक दिवस मला म्हणाल्या, "ताई तुमच्याकडे अजिबात शिस्त नाहीये."
मला
आश्चर्य वाटलं.
मी
विचारलं, "म्हणजे काय?"
मग
त्यांनी सांगितलं, "याआधी मी जिथे काम केलं, तिथल्या त्या मुख्य ताई तर आम्हाला
दिसायच्या पण नाही. त्यांच्या हाताखालच्या ताई आम्हाला खूप ओरडायच्या, रागवायच्या,
त्यांचं बोलणं ऐकावं वाटायचं नाही."
मी
मनात म्हटलं मग बरं आहे आपल्याकडे शिस्त नाही ती."
त्या
मावशींना मी इतकंच म्हटलं, "आपली कामाची पद्धत वेगळी आहे, ताई- मावशी यांच्यावर
रागावून, त्यांना अपमानित करून आपण काम करत नाही."
आनंदघरच्या
तायाही अशाच गुणी आहेत. बालविकासाचा कोर्स पूर्ण केलेल्या व्यक्तींना ताई म्हणून
आनंदघरात
काम करता येतं. त्यासोबत आनंदघरचं सातत्यपूर्ण प्रशिक्षण असतं... मुलांशी बोलायचं कसं
याबद्दल तर हमखास सांगायला लागतं. तायांनासुद्धा
तयार गोष्टी दिल्या जात नाहीत. त्यांना स्वतः एक्सप्लोर करावं लागतं. (नो स्पून फीडिंग)
विविध उपक्रम असो, शिबिर असो, स्नेहसंमेलन असो, तायांवर विश्वासाने काही सोपवलं तर
त्या उत्तमरीतीने जबाबदारी पार पडतात.
आनंदघर लेख - २८ 'पालकांशी संवाद'
आनंदघर लेख - २८ 'पालकांशी संवाद'
याआधीच्या
एका लेखात मुलांच्या रुळण्याविषयी लिहिलं आहे. नवीन जागी मुलांचं रुळणं, आई-बाबाला
सोडून राहणं... केवळ मुलं पालकांना सोडून (विशेषतः आईला) राहतात एवढंच नाही तर आई-बाबाला
सुद्धा हे शिकावं लागतं की आपल्या बाळाला सोडून कसं राहायचं? विशेषतः आईला... तिच्यावरही
विविध ताण असतात. आपलं मूल राहील की नाही? रडेल का? त्याला व्यवस्थित सांभाळलं जाईल
का? सर्वजण त्याच्याशी प्रेमाने वागतील का? त्याला रागावणार तर नाही ना? अशा असंख्य
प्रश्नांचं काहूर तिच्या मनात थैमान घालत असतं! त्यासोबतच आपलं चुकत तर नाहीये ना?
आपण खूप लवकर आपल्या मुलाला आपल्यापासून वेगळं तर करत नाहीये ना? नौकरी-व्यवसाय करावा
की सोडून द्यावं? आपण वाईट आई तर नाही ना? असा अपराधी भावही तिच्या मनात येत असतो.
काही वेळा मूलही रडतं आणि आई पण रडते. आईचा कावराबावरा झालेला चेहरा, त्यावरचे ताण
मुलांना नीट कळतात. त्यामुळे मुलंही आणखीन अस्वस्थ होतात. 'माय लेकराची ही डि-टॅचमेंट
इतकी सहज सोपी प्रक्रिया नाही'. त्यात इतरही अनेक घटक असतात, छटा असतात. मुलांचं भलं कशात आहे याचा विचार असतो. मुलांना
इतर मुलांमध्ये खेळता येणं, आईला स्वतः साठी वेळ मिळणं, स्व-विकासाची संधी मिळणं, पुढचं
शिक्षण किंवा नोकरी, व्यवसाय सुरू करता येणं, त्यात कित्येकदा कुटुंबाचा आधार मिळतो
किंवा मिळत नाही. काही कुटुंबात कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नसतं, घेऊ शकत नसतं. काही कुटुंबात काहीच करू नको मुलाला तेवढं सांभाळ
असं म्हणतात, त्यामुळे आईसाठी मूल, कुटुंब व स्व-विकास ही तारेवरची कसरत बनते. त्यात
मूल शाळेत, पाळणाघरात रडत असेल तर आईसुद्धा अस्वस्थ असते. कित्येकदा तिच्या मनात अपराधी
भाव(guilt) दाटून येतात, तिच्या मनात कायम योग्य-अयोग्य असं द्वंद्व चालू राहतं. त्यातूनच
तिचे भावनिक चढ-उतार चालू राहतात. अस्वस्थ, असुरक्षितही वाटू लागतं. शाळेत किंवा पाळणाघरात
मूल रूळलं तरी कमी अधिक प्रमाणात ही भावनिक आंदोलनं चालू राहतात
काही
वेळा ते मूल खुद्द आईच्या आईकडे असलं तरी तिचा अस्वस्थपणा फार कमी होत नाही. अर्थात
तो आपणा सर्वांना दिसत नाही किंवा जाणवत नाही. कारण तिच्या मनातील ही भावनिक आंदोलनं
सांभाळून ती घरीदारी कार्यरत असते. शांतपणे, सूक्ष्मपणे आईचं निरीक्षण केलं तर ही भावनिक
आंदोलनं जाणवू शकतात.
मूल
रुळताना, रुळल्यानंतर कित्येकदा पालकांचे फोन येतात. फोनवर तेच ते प्रश्न विचारले जातात,
म्हणजे मूल काय करतंय? जेवलं का? झोपलं का? बरं नसेल तर औषध दिलं का? त्यानं ते घेतलं
का? शाळेतून वेळेत आला का? काही वेळा तायांना-मावशींना वाटतं की रोज तेच तेच प्रश्न
आहेत. अशा वेळी त्यांच्या प्रशिक्षणा दरम्यान प्रश्न काय विचारले आहेत, त्यापेक्षा
प्रश्न का विचारले आहेत? हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. दूर अंतरावरून जर मला
माझ्या बाळाची काळजी वाटत असेल तर फोन करून, विचारून ती काळजी काही प्रमाणात कमी होते.
शिवाय आपल्या गैरहजेरीत ज्या वातावरणात मुलं राहत आहे, तिथे काम करणाऱ्या व्यक्तींविषयी
ताई मावशींविषयी जसजसा विश्वास वाढत जाईल तसतशी ही काळजी कमीही होईल व प्रश्नही कमी
होतील. अर्थात प्रत्येक मूल जसं वेगळं असतं, तसं प्रत्येक पालकही वेगळे आहेत. काही
पालकांना विश्वास ठेवणं लवकर जमतं तर काहींना थोडा वेळ लागतो. ते त्या त्या व्यक्तीवर
आणि त्यांच्या भावनिक स्थितीवरही अवलंबून असतं.
आनंदघरचं
काम करताना पालकांच्या विविध छटा जाणवल्या. काही पालक अति काळजी करतात, इतकी की मुलांची
घुसमट व्हायला लागते. कित्येकदा मुलांच्या वेळापत्रकाबाबत खूप काटेकोर असतात म्हणजे
अमुक यावेळी अमुक इतकंच, अमुक हेच खाल्लं पाहिजे, तितकच झोपलं पाहिजे. खेळताना पडायला
नको, लागायला तर अजिबात नको. ते मूल पडेल, त्यामुळे लागेल या विचाराने ते त्याला कधी
पडुच देत नाही, आणि मोकळेपणाने खेळूही देत नाही. मूल रडू नये म्हणून किंवा अकांडतांडव
करू नये म्हणून वेळेआधीच मुलांच्या मागण्या (डिमांड) पूर्ण केल्या जातात. मूल छोटं
असलं तरी पालकांच्या या सगळ्या गोष्टी ओळखून असतं आणि त्यानुसार ते स्वतःच्या मागण्या
पूर्ण करून घेतं. पालक कळत- नकळत का होईना मुलांना स्वतंत्रपणे जगू देण्याच्या आड येतात.
मूल स्वतःच्या अनुभवातून जगण्यासाठी तयार होत असतं.
पालकांना
मला अगदी आवर्जून सांगावं वाटतं, मूल कितीही छोटं असलं तरी मुलांचं स्वतःचं एक अस्तित्व
आहे, ते समजून घ्या, ते स्वीकारा...त्यांना स्वतंत्रपणे अनुभव घेऊ द्या... कारण तो
त्यांच्या शिकण्याचा उत्तम स्त्रोत आहे.
खलील
जिब्रान यांनी या विषयी सुंदर लिहिलं आहे. त्या ओळी मला आठवतात,
"Your children are
not your children,
They are the sons and
daughters of life’s longing for itself,
They come through you but
not from you,
And though they are with
you yet they belong not to you,
You may give them your
love but not your thoughts....."
पालक
कित्येकदा सांगतात मुलं ऐकत नाहीत. काय करावं? काही उदाहरणं बघू...
खरंय,
काही वेळा मुलं ऐकेनाशी होतात. कित्येकदा मुलांनाही नीट कळतं की आपण काय केल्यानंतर
आपल्याला हवं ते मिळणार आहे. तीन वर्षांचा प्रतीक जरासं लागलं खरचटलं. थोडासा पडला
की खूप रडायचा. डोळ्यातून घळाघळा अश्रू धारा सुरु व्हायच्या. असं का होत असावं याचा
मी विचार करायचे. प्रतीक कधी पडूच नये, त्याला लागूच नये अशी काळजी पालक घ्यायचे. या
प्रकारची काळजी प्रतीकपर्यंत पोहोचली होती, त्यामुळे जरा काही झालं त्याला की खूप दुःख
व्हायचं. खूप रडू यायचं. त्याच्यासोबत खेळणारी इतर मुलं खेळताना जोरात पडली, जखम झाली
तरी उठून खेळायला जायची. मुलांमधील फरक लक्षात घेण्यासारखा आहे... प्रतीकचं न बोलणं,
छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावणं, माझ्याच मनासारखं झालं पाहिजे असा हट्ट करणं, रडत
रडत बोलणं किंवा नुसतंच रडत राहणं अशा गोष्टी दिसत होत्या. हे सर्व घरीपण घडत होतं.
कित्येकदा आनंदघरच्या ताई-मावशी सुद्धा पॅनिक होऊन तात्काळ त्याला शांत करण्यासाठी,
"बरं तुला हे हवंय का? मग घे!" तो म्हणेल तसं करायच्या.
रिया
नावाची 2 वर्षांची मुलगी तर हवं ते मिळवण्यासाठी खूप आकांडतांडव करायची. जमिनीवर गडाबडा
लोळायची... कारण या मुलांपर्यंत व्यवस्थित पोहोचलं होतं की
मला
हवं ते मिळवण्यासाठी रडणं, आरडाओरडा केला पाहिजे... खरं तर मुलं थोडी हट्टी असतात हे
मान्यच आहे! परंतु त्या हट्टाचा वारंवार उपयोग करून मुलं पालकांकडून हवं ते मिळवत असतील
किंवा पालकांना वेठीस धरत असतील तर तिथे मात्र पालकांनी थोडी सावधानता बाळगायला हवी.
चॉकलेट, बिस्कीट, जंकफूड, बाहेरचं खाणं, मोबाईल, टीव्ही अशा काही गोष्टी आहेत की जिथे
मुलांनी कितीही हट्ट केला तरी त्या पुरवायला नकोत. कित्येकदा असं होतं; पालक कुठल्यातरी
कामात असतात, घाईत असतात, थकलेले असतात. कुणाशी तरी बोलत असतात. अशावेळी जर मुलांनी
काही मागितलं किंवा मागितलं नाही तरी ते मूल शांत बसावं यासाठी या गोष्टी दिल्या जातात.
पालकांनी स्वतःच्या सोयीसाठी दिलेल्या गोष्टी मुलांच्या सवयीच्या बनतात व नंतर ही सवय
सोडवण अत्यंत कठीण होऊन बसतं. मोबाईल, टीव्हीमुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम आपण बघतच
आहोत. मुलांपर्यंत काय पोहोचतं की मी अमुक एक वागले तर मला या गोष्टी मिळतात आणि मुलांपर्यंत
काय पोहोचवण्याची गरज आहे? तू काहीही केलं, कितीही हट्ट केला तरी तुला हे मिळणार नाही!
हे न रागवता, न मारता सातत्याने मुलांपर्यंत पोहोचवायला हवं. सुरुवातीला ते विरोध करतील
परंतु सतत त्यांच्याशी बोललो, त्यांना समजावून सांगितलं तर हळूहळू त्यांच्या लक्षात
यायला लागतं की आपल्याला काय मिळू शकतं आणि काय नाही. काही बाबतीत पालकांची ठाम व आग्रही
भूमिका आवश्यक असते.
कित्येकदा
पालक असंही म्हणतात, मुलं घरी आली की सारखा मोबाईल आणि टीव्ही यात गुंततात, कितीही
सांगा ऐकतच नाही!
खरं
तर मोबाईल आणि टीव्ही त्याच्याहीपेक्षा आवडीच्या गोष्टी मुलांना करायला मिळाल्या तर
ते स्वतःहूनच टीव्ही मोबाइल याकडे आकर्षित होणार नाही. मुलं ऐकतच नाही असं म्हणण्यापेक्षा
आपल्याला आपलं म्हणणं मुलापर्यंत पोहोचवता येत नाही असं म्हणणं योग्य होईल.
मूल
आपल्याला जसं मोबाईल आणि टीव्ही साठी हट्ट करतं असाच त्याने चाकू खेळायला मागितला,
कडीपेटी मागितली, किंवा गॅसशेगडी सोबत खेळणार असं म्हटलं तर तो आपण देऊ का? मुलाला
या गोष्टी खेळायला मिळणार नाहीत हे आपण विविध
प्रकारे समजावून सांगितलं आहे, व मुलांना ते समजलं आहे, म्हणून मुलं त्यासोबत खेळत
नाहीत. अशी कोणतीही गोष्ट जी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेची आहे, ती आपण
त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि अशा गोष्टी आपण त्यांना देत नाही. आपली ही भूमिका मुलांनाही
कळते त्यामुळे तेही या गोष्टी मागत नाहीत. मग जी भूमिका चाकू इत्यादीबाबत घेणं जर आपल्याला
शक्य आहे तर तशीच भूमिका मोबाईल, टीव्ही किंवा इतर गोष्टींबद्दल घेणं काय अवघड आहे?
आपल्याला हे जमलं की प्रश्न सुटणार आहेत. बाहेरच्या जगात विविध प्रकारची प्रलोभनं मुलांसाठी
आहेत. त्यासाठी ठाम भूमिका व वेळोवेळी मुलांसोबत संवाद साधणं आवश्यक आहे... पालक म्हणून
मला हे शिकणं गरजेचं आहे...
chhaya.golatgaonkar@gmail.com
आनंदघर लेख - २७ ' एकेरी पालकत्व...'
आनंदघर लेख - २७ ' एकेरी पालकत्व...'
बदलत्या
काळानुसार पालकत्वही बदलत आहे. साधारण पंचवीस-तीस वर्षांपूर्वी विविध कारणांनी विभक्त
कुटुंब पद्धती आकार घेऊ लागली. त्यावेळी बालसंगोपनाचा प्रश्न भेडसावू लागला. विभक्त
कुटुंब व आई कामासाठी बाहेर पडणं दोन्हीही मुख्य कारणं आहेत, त्याच्याही आधीपासून पाळणाघरांची
गरज भेडसावू लागली. अर्थात पूर्वीची पाळणाघरं घरगुती प्रकारची होती. काळानुरूप समाज
बदलत चालला आहे. त्यानुसार पाळणाघरांचं स्वरूपही बदलत आहे. सध्याच्या काळात व्यवसायिक
पाळणाघरं, बालसंगोपन केंद्र यांची गरज भेडसावत आहे. विभक्त कुटुंबाबरोबरच स्त्रिया
पूर्णवेळ काम स्वीकारत आहेत. मोठ मोठे पद भूषवत आहे, जबाबदाऱ्या घेत आहे अशा परिस्थितीत
पर्यायी पालकत्वाची गरज निर्माण झाली आहे. म्हणजे बालसंगोपनाबरोबरत त्यांच्या वाढीचा,
विकासाचा विचार करून, अभ्यास करून काम करणं. पालकांच्या गैरहजेरीत पालकांची भूमिका
निभावणं, तीही अभ्यासपूर्ण. याप्रकारे मुलांसोबत काम करण आवश्यक आहे... अनेक कारणांपैकी
एक महत्त्वाचं कारण म्हणजे एकेरी पालकत्व.
काळानुरुप
समाज बदलतो आणि त्याच्या गरजा सुद्धा बदलत आहेत. नोकरी-व्यवसायानिमित्त कित्येकदा आई
आणि बाबा वेगवेगळ्या शहरात काम करत आहेत किंवा घटस्फोट झाला आहे किंवा दोघांपैकी एकाचा
मृत्यू झाला आहे अशा विविध कारणांनी एकेरी पालकत्वाचे उदाहरण समोर येत आहेत. अशा पालकांना
काही वेळा कुटुंबाचा आधार मिळतो, तर काही वेळा मिळत नाही. असंही घडतं की कुटुंबाचे
सगळीच जबाबदारी एकट्या पालकावर येऊन पडते. यात अर्थार्जनाबरोबरच मुलं, घर, स्वतःची
नोकरी-व्यवसाय, घरातील वयोवृद्ध माणसं व इतर अवलंबून असलेले माणसं, यांच्यासहित सर्व
सांभाळावं लागतं. एकट्या पालकासाठी तर ही प्रचंड मोठी तारेवरची कसरत आहे. दोघांचं काम
जबाबदाऱ्या एकट्याने पार पाडणं आव्हानात्मकच आहे. यातली ओढाताण, ताणतणाव घुसमट अस्वस्थता
मुलांपर्यंतही पोहोचत असते.
सिद्धार्थ अगदी आनंदी मूल. घरातले ताणतणाव वाढले
तसा सिद्धार्थ उदास राहू लागला. भांडणं इतकी विकोपाला गेली की एकमेकांवरची हिंसा व
त्यानंतर कोर्ट केसेसही बऱ्याच झाल्या. या सर्व घटना चिमुकल्या सिद्धार्थ समोर घडल्या.
तो अत्यंत सैरभैर झाला. कित्येकदा आनंदघरी तो एका ठिकाणी बसत नसे. सतत अस्वस्थ होऊन
फिरायचा. मधेच रडायला लागायचा, मधेच व्याकूळ व्हायचा. इतर मुलं, ताई मावशी यांना रागवायचा,
मारायचा, घरातली भांडणं सांगायचा. त्याच्यावरचा ताण, त्याची अस्वस्थता जाणवायची. मधेच
खेळता-खेळता रडायचा, हसत हसत रागवायचा. त्याच्या आईसोबत जेव्हा बोलणं झालं. तेव्हा
त्याची परिस्थिती कळली. तो जे काही सांगत होता ते खरं होतं. त्याच्यावरचा ताण कमी व्हावा
यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो, त्यामुळे जास्तीत जास्त त्याच्या कलानं घेणं चालू होतं.
अधूनमधून माझ्याजवळ येऊन बसायचा, त्याला खूप काही सांगायचं असायचं, भरपूर बोलायचा आणि
माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवायचा. त्याची ही स्पर्शाची भूक होती, जी प्रत्येक मुलात
असते. ताईंनी मावशींनी जवळ घेणं, प्रेमानं हात फिरवणं, दुपारी झोपताना थोपटणं हे मुलांना
अगदी हवं असतं. काही मुलांची सकाळी 9 ते संध्याकाळी 7 एवढा मोठा काळ मुलांची व पालकांची
भेट होत नाही, त्यामुळे ती स्पर्शाची गरजही पूर्ण होत नाही. म्हणूनच ताई आणि मावशींची
ही जबाबदारी आहे की प्रेमाचा मायेचा स्पर्श मुलांना द्यायला हवा.
सौरभचे बाबा मुंबईमध्ये, आई पुण्यात दोघेही नोकरी करत होते. न्यायालयात घटस्फोटाची केस चालू. घरातील हा ताणतणाव सौरभपर्यंत पोहोचत होता. त्याचे व्हायचे ते परिणाम दिसत होते. तोही अस्वस्थ होता, जास्तीत जास्त वेळ कम्प्युटर, टीव्ही, मोबाईल यात घालवत होता. कोणाचही ऐकत नव्हता, त्याच्या आईची तर पार तारांबळ उडत होती. एकीकडे कोर्टात केस चालू, तर दुसरीकडे स्वतःची नोकरी सांभाळून मुलाची जबाबदारी. नोकरीमुळे मुलाकडे फारसे लक्ष देता येत नव्हतं, सततची काळजी, ताणतणाव...
असे एक पालक नाही, आणखीही काही पालक भेटले.
निधी, निलेश दोन मुलांची आई अशीच कसरत करत होती. घटस्फोटाची केस, दोन्ही मुलं आणि नोकरी... दोन्ही मुलं वयाने लहान असल्यामुळे खूपच धावपळ व्हायची.
घटस्फोटातून येणारं एकेरी पालकत्व खूपच त्रासदायक ताणतणावाचं... पती-पत्नी म्हणून जरी दोघांमध्ये मतभेद असले भांडणं असली तरी त्या मुलाचे ते कायम आई-बाबा असतात आणि मुलांना दोघेही हवे असतात, ती त्यांची नैसर्गिक गरज आहे.
एकेरी पालकत्वाचा ताण प्रचंड असतो. कारण दोघांनी
पार पाडायच्या जबाबदाऱ्या एकावर येऊन पडतात. त्यातही आई पालक असेल तर ताणाची तीव्रता
जास्त असते. एकीकडे घर तुटल्याचं दुःख, घटस्फोटाचा सोशल स्टीगमा, सासरी माहेरी आधार
मिळतो किंवा मिळत नाही, मुलांची जबाबदारी अर्थार्जन, सामाजिक स्थान, मानसिक- भावनिक
गुंतागुंत अशा एक ना अनेक बाबी असतात... अशा तणावग्रस्त वातावरणात जगणं चालू असतं.
अशा परिस्थितीत मुलांचे दुखणं खुपणं असेल, वर्तन समस्या असतील तर ती आई पार हवालदिल
होऊन जाते. आनंदघरच्या वातावरणात विविध पद्धतींनी हे ताणतणाव दूर करण्याचा प्रयत्न
केला जातो.
एकेरी पालकत्व एखाद्याच्या मृत्यूमुळे (आई-बाबा)
येतं. यातही वरीलप्रमाणेच बरेचसेच ताणतणाव असतात आणि आई किंवा बाबा नसण्याचं अतीव दुःख
असतं. याही परिस्थितीत कोणाचा आधार मिळतो किंवा मिळतही नाही. सर्व जबाबदाऱ्यांसोबत
मुलांचे चांगले संगोपन तारेवरची कसरतच असते. त्यात मुलांसोबत मृत्यू म्हणजे काय? याविषयी
संवाद साधणं आवश्यक असतं. अशावेळी मृत्यूबद्दलच्या खोट्या, भ्रामक कल्पना न सांगता
मुलांच्या वयानुसार त्यांच्याशी मृत्यूविषयी बोलावं. मृत्यू बघणं, अनुभवणं मुलांच्या
भावविश्वात मोठीच उलथापालथ करतो. असंख्य प्रश्न मनात असतात संयमानं या प्रश्नांना
उत्तर द्यायला हवेत.
काही प्रश्न मुलं खूप थेट विचारतात.
'ते
मेले का'?,
'त्यांना
आग लावणार का आता'?,
'ते भूत बनणार का आता'?
'हे
सगळे एवढे का रडत आहेत'? काही विशिष्ट पद्धतीने लोक रडतात तेव्हा मुलांना हसू यायला
लागतं. मुलांच्या अशा वागण्यानं, बोलण्यानं आपण गोंधळून न जाता थोडं संयमानं त्यांना
योग्य उत्तरं द्यायला हवीत. आपली संवेदनशीलता मुलांपर्यंत नक्कीच पोहोचते. आई किंवा
बाबा नसणं हे मुलांसाठीही खूप त्रासदायक आहे.
एकेरी पालकत्वात दोघांची जबाबदारी एकट्यावर येऊन
पडते... यासाठी कुणाची मदत घेणं केव्हाही चांगलं... केवळ नातेवाईक, मित्र परिवार यावर
विसंबून न राहता मदतनीसांची मदत घेतली म्हणजे ती ओढाताण, त्याची तीव्रता नक्कीच कमी
होऊ शकेल. आई बाबा यांच्या नोकरीतील बदल, शहर बदलणं यामुळे रोज भेटणारे आई -बाबा आठवड्यातून,
महिन्यातून एकदा भेटायला लागतात. आई-बाबा आणि मुलं सगळ्यांसाठीच हा कसोटीचा क्षण असतो.
मुलं अस्थिर होतात, आठवणीनी व्याकुळ होतात. लहान मुलांना कित्येकदा काय बदल झाला आहे
हे कळत नाही. बाबा दुसरीकडे का राहतो? हेही कळत नाही. पुन्हा भेटणार की नाही हेही कळत
नाही. त्यामुळे मुलं कावरीबावरी होतात.त्यांना असुरक्षित वाटू लागतं, रडू येतं, झोपेत
शु होते...
एकदा आनंदघरी सात वर्षांचा अनिश आला व ताईला म्हणाला,
"आज मी शाळेत गेलोच नाही!"
ताई
म्हणाली," का रे"
"आज
शाळेत फादर्स डे होता.
बाबांना
घेऊन जायचं होतं पण मला तर बाबाच नाहीत, म्हणून नाही गेलो". असं म्हणून तो मित्रांसोबत
खेळायला गेला सुद्धा. असाच एकदा दहा वर्षांचा पियुष गप्प बसला होता त्याला मी विचारलं,
"काय करतोयस?
मला म्हणाला, "विचार करतोय". "म्हटलं
कशाचा?"
"माझ्या
बाबांचा! आज शाळेत 'माझे बाबा' या विषयावर निबंध लिहायला सांगितला." पियुष विचार
करणार, स्वाभाविक होतं. त्याच्या जन्माच्या आधीच त्याचे बाबा वारले होते. आई बाबांचा
मृत्यू असा एकदाच संपत नाही. तो अधून मधून भेटत राहतो मागे राहिलेल्याचं भावविश्व ढवळून
काढतो...
समाजात एकेरी पालकत्व वाढत आहे की काय... तसं दिसत
आहे. मुळात मूल असं एकेकट्यानं वाढण्यासाठी नाहीच. एका आफ्रिकन म्हणीनुसार- "एक
मूल वाढवायला एक गाव लागतं..." तेच इतर माणसांनाही लागू होतं. समाजशास्त्रीय व्याख्येनुसार
माणूस समाजशील प्राणी आहे. अवतीभोवतीच्या लोकांशिवाय तो जगू शकत नाही, एकेकटा तो राहू
शकत नाही. मुलांच्या निकोप वाढीसाठी आजूबाजूचा समाज अत्यावश्यक आहे. परंतु माणसं एकेकटी
पडत चालली आहेत. हेही सत्य आहे. त्याची कारणं अनेक आहेत. जसे की विभक्त कुटुंब, स्थलांतरण
(migration), एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि वेगवेगळ्या कारणांनी आई-बाबाही वेगवेगळ्या
शहरातून वेगळं राहणं, टोकाचा, आत्मकेंद्री (individualistic approach) विचार... अशा
बदलत्या समाजरचनेच्या गरजाही बदलतात. जसे की सगळी कामे एकट्याने शक्य नाही म्हणून मदतनीस
असणं, तयार जेवण, शाळेव्यतिरिक्त पाळणाघरं, विविध क्लासेस, मैदान आणि मुलांना सोडण्या-
आणण्यासाठी व्हॅनची व्यवस्था अशा प्रकारची नवी व्यवस्था आकार घेत आहे. यात पाळणाघरांची
गरज आणि भूमिका महत्त्वाची आहे. विशेषतः एकटा पालक असेल तर मुलांसोबत पालकांचीही एक
सपोर्टिंग सिस्टीम असायला हवी. आनंदघर बाल संगोपन केंद्र सुरूवातीपासून मुलांसोबत तर
काम करतच आहे, यासोबतच पालकांसाठी, ताया, मावशांसाठी ही एक सपोर्टिंग सिस्टीम म्हणून
उभं आहे...
अॅड.
छाया गोलटगावकर
chhaya.golatgaonkar@gmail.com